मानवी स्वभावाचे प्रतिबिंब देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातही प्रतिबिंबित होत असते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकुटुंब दोन दिवसांच्या दौऱ्यातही असेच काही झाले. समाजातील बडी असामी पाहुणा म्हणून आपल्या घरी येते त्या वेळी त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी आपली धावपळ उडते. काही उणे राहू नये आणि त्यांच्या उपस्थितीत घरात उणे-दुणे घडू नये याची काळजी घ्यावी लागते. ट्रम्प यांचा दौरा असाच पार पडला आणि या दौऱ्यात त्यांनी भारताशी संरक्षण आणि ऊर्जा या दोन क्षेत्रांत करार केले. तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करार हा महत्त्वाचा मानला जातो. यात अत्याधुनिक शस्त्रे, अपाचे आणि रोमिओ ही लढाऊ हेलिकॉप्टर भारताला मिळणार आहेत. शिवाय परस्पर संरक्षण सहकार्याचा सर्वंकष करारही केला आहे. याचा अर्थच शस्त्रास्त्रांचा पुरवठा करताना दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दोन्ही देश परस्परांना सहकार्य करतील.गेल्या चार वर्षांत, म्हणजे ट्रम्प सत्तेवर आल्यापासून अमेरिका आणि भारत हे दोन देश कधी नव्हे ते जवळ आले आणि याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी आली आणि आतासुद्धा त्याचा प्रत्यय आला. आपण एकमेकांच्या किती जवळ आहोत हे मोदी आणि ट्रम्प यांच्या देहबोलीतून जाणवत होते. दोन देशांमध्ये हा केवळ व्यापारी करार झालेला नाही, तर त्यापलीकडे संबंध प्रस्थापित झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत अमेरिकेकडून ऊर्जा क्षेत्रातील भारतात होणारी निर्यात ५०० टक्क्यांनी वाढली.स्वातंत्र्य मिळाले तो काळ जागतिक राजकारणात अमेरिका-सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या प्रारंभाचा काळ होता, आणि जगाचे विभाजन या दोन सत्ता गटांत झालेले होते. अशा वेळी पंडित नेहरूंनी जाणीवपूर्वक या दोन गटांपासून देशाला दूर ठेवत समतोल गाठणारे परराष्ट्र धोरण ठेवले. त्याच वेळी पाकिस्तान अमेरिकेच्या गटात अलगद जाऊन बसला. पुढचा सगळा इतिहास १९७१चे युद्ध, सोव्हिएत रशियाशी भारताची जवळीक आणि पाकिस्तानच्या आडून अमेरिकेने भारतीय उपखंडात खेळलेले राजकारण, त्याचे परिणाम या सगळ्यांचे आपण साक्षीदार आहोत.पुढे सोव्हिएत रशियाचे विघटन आणि शीतयुद्धाच्या समाप्तीनंतरचे बदललेले आंतरराष्ट्रीय राजकारण, त्यातून पूर्व आशियात चीनचा आर्थिक महासत्ता म्हणून उदय. अमेरिकेला प्रतिस्पर्धी होण्याचा धोका, या सगळ्या जागतिक राजकारणाच्या घडामोडीत भारताचे महत्त्व हळूहळू लक्षात आल्यामुळे अमेरिकेच्या धोरणातही बदल झाला. पूर्व आशियाचे राजकारण करताना भारताला दुर्लक्षित करून चालणार नाही याची उपरती झाल्यानंतर अमेरिकेने धोरण बदलले आणि भारत हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा घटक बनला. त्याची प्रचिती गेल्या चार वर्षांतील संबंधांतून दिसते. भारताशी संरक्षण करार करण्यामागचा हेतूही तोच आहे.दहशतवाद हा दोन्ही राष्ट्रांसाठी तितकाच काळजीचा विषय आहे. अफगाणिस्तानातील आपल्या फौजा काढून घेण्याच्या तयारीत सध्या अमेरिका आहे. भारत दौऱ्यावर निघण्यापूर्वी ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तालिबानसोबत संघर्षविहीन आठवडा सुरू केला. या आठवड्यात जर तेथे शांतता राहिली तर दोघांमध्ये शांतता करार होईल आणि त्यानंतर अमेरिका अफगाणिस्तानातील आपल्या फौजा काढून घेईल. या दोघांमध्ये चर्चेच्या वाटाघाटीसाठी पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचाच अर्थ अमेरिकेने भारताशी संबंध वाढवताना पाकिस्तानला दूर लोटलेले नाही आणि अफगाणिस्तानच्या भविष्यातील राजकारणाला आकार देण्यात पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. अतिरेकी कारवायांना आर्थिक मदत करणाऱ्या पाकिस्तानला करड्या यादीत टाकण्याच्या चीनच्या भूमिकेला अमेरिकेने साथ दिली नव्हती. या घटना अमेरिकेचे पाकिस्तानविषयीचे ममत्त्व दर्शवितात. मोठ्या असामीशी सोयरसंबंध जोडले, तर लाभ होतो, समाजात पत वाढते, त्याच वेळी आपले साथीदार, मित्र नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
अमेरिकेशी जवळीक वाढणं ठीक; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 5:41 AM