Editorial: युद्धस्य कथा दाहक! कोरोना नंतर इंधन महागाईचा लोळ, ओघाने आलेच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 07:50 AM2022-03-09T07:50:54+5:302022-03-09T07:52:13+5:30
युद्धाचे चटके आता सर्वांनाच जाणवू लागले आहेत. युद्ध सुरू झाले तेव्हाच महागाईचा भडका उडणे निश्चित झाले होते; पण ज्या प्रकारची चिन्हे आता दिसू लागली आहेत, ते कल्पनातीत आहे! खनिज तेलाचा दर युद्धापूर्वी ९९ डॉलर प्रतिबॅरल होता.
युद्धस्य कथा रम्या! संस्कृतमधील एका सुभाषिताचा हा अंश! आपल्या मायमराठीतील ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीशी जवळीक साधणारा! युद्धाच्या कथाही ऐकायलाच चांगल्या, हा त्याचा अर्थ! रशिया-युक्रेन युद्धास तोंड फुटताच भारतीयांनाही त्या युद्धाच्या बातम्यांची गोडी लागली; पण आता उपरोल्लेखित सुभाषिताची अनुभूतीही होऊ लागली आहे. युद्धाचे चटके आता सर्वांनाच जाणवू लागले आहेत. युद्ध सुरू झाले तेव्हाच महागाईचा भडका उडणे निश्चित झाले होते; पण ज्या प्रकारची चिन्हे आता दिसू लागली आहेत, ते कल्पनातीत आहे! खनिज तेलाचा दर युद्धापूर्वी ९९ डॉलर प्रतिबॅरल होता.
अवघ्या १३ दिवसांत तब्बल १४० डॉलरच्या घरात जाऊन पोहोचला आहे. त्यातच आता अमेरिका व तिच्या मित्र देशांनी रशियाच्या खनिज तेलावर बंदी घालण्याची भाषा सुरू केली आहे. तसे प्रत्यक्षात घडल्यास खनिज तेलाचा दर थेट १५० डॉलरवर जाऊन पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. भारताला तर दुहेरी मार बसणार आहे. युद्धामुळे डॉलरचा दरही चांगलाच वधारला असून, आता एका डॉलरसाठी तब्बल ७७ रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे एकीकडे खनिज तेलासाठी जास्त डॉलर मोजायचे आणि दुसरीकडे डॉलरसाठी जास्त रुपये मोजायचे! पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका आटोपल्यामुळे लवकरच पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे १५ ते २० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इंधन दर भडकण्याच्या भीतीपोटी उत्तर भारतातील काही शहरांमध्ये साठेबाजी सुरू झाली आहे. रशियाच्या खनिज तेलावर बंदी लादण्यात आलीच तर मग इंधनाचे दर कुठे पोहोचतील, याची कल्पनाही करवत नाही. एकदा का इंधन महागले, की वाढत्या वाहतूक खर्चामुळे सर्वच वस्तू महागणार, हे ओघाने आलेच!
खाद्यतेलाच्या दरांना आधीच आग लागली आहे. एकदा का डिझेल महागले, की खाद्यतेलांसोबत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भडका उडणे अपरिहार्य आहे. रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात महागाई किंवा चलनवाढीचा दर चार टक्क्यांच्या थोडाच वर राहण्याचा अंदाज वर्तविला होता; मात्र आता त्याला काहीही अर्थ उरलेला नाही. तो दुहेरी आकड्यात पोहोचतो की काय, अशी भीती आता वाटू लागली आहे. युद्धाची व्याप्ती वाढली आणि त्यामुळे जगभरातील पुरवठा साखळी दीर्घकाळासाठी ठप्प झाली, तर मात्र महागाईचा दर अंदाजापेक्षाही खाली जाऊ शकतो. अर्थात ते अर्थव्यवस्थेसाठी सुचिन्ह नव्हे, तर दुश्चिन्ह असेल! भयंकर आर्थिक मंदीचा फेरा सुरू झाला असा त्याचा अर्थ असेल! अर्थव्यवस्था काही नेहमीच उभारीच्या स्थितीत नसते. उभारी आणि मरगळ असे चक्र सतत सुरू असते. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासण्यास प्रारंभ केला होता. त्यातच कोविड-१९ महासाथीचे संकट कोसळले आणि अर्थव्यवस्था पार कोलमडली. कोविड आजाराने जेवढी कुटुंबे उद्ध्वस्त केली, त्यापेक्षा किती तरी पट कुटुंबे कोविडने अर्थव्यवस्थेला दिलेल्या प्रचंड तडाख्यामुळे उद्ध्वस्त झाली. नुकतीच कुठे अर्थव्यवस्था त्या तडाख्यातून सावरू लागली होती. तेवढ्यातच रशिया-युक्रेन युद्धाचे संकट विद्युलतेच्या लोळाप्रमाणे अर्थव्यवस्थेवर कोसळले आहे. एकापाठोपाठ एक बसलेल्या या तडाख्यांमधून सावरण्यास बराच काळ लागू शकतो.
युद्ध जेवढे लांबत जाईल, तेवढे हे संकट आणखी गडद होत जाईल. त्याची चिन्हे दिसूही लागली आहेत. विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारांमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक रोजच आपटू लागले आहेत. कोणत्याही संकटाच्या वेळी मनुष्याला आठवण येते ती सोन्याची! आताही गुंतवणूकदार सुरक्षिततेच्या दृष्टीने सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागले आहेत. त्यामुळे सोन्याचा दर दररोज नवा विक्रम नोंदवित आहे. या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक वाढीवर होणे अपरिहार्य आहे. येत्या ३१ मार्चला संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ९.२ टक्के दराने वाढणे अपेक्षित होते; मात्र ताज्या अंदाजानुसार वाढ केवळ ८.९ टक्के एवढीच असेल. पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था वाढीचा वेग दुहेरी आकड्यात असण्याची अपेक्षा आता विसरलेलीच बरी! त्याचा थेट परिणाम पायाभूत सुविधांची उभारणी, रोजगारनिर्मिती, लष्करी सिद्धतेवर होणार आहे. सामान्यांचे जिणे अधिक दुर्धर होईल. थोडक्यात काय, तर एक काळाकुट्ट कालखंड आ वासून आपल्यासमोर उभा आहे. तो किती लवकर संपुष्टात येतो, याची प्रतीक्षा करण्याखेरीज आपल्या हाती काही नाही!