सारे काही शांत झाले असे वाटत असताना, महायुद्धाच्या भीतीपासून जगाला थोडा दिलासा मिळाला असताना रशिया - युक्रेन युद्धाला नव्याने तोंड फुटले आहे. गेल्या महिन्यात युक्रेनच्या बहाद्दर सैनिकांनी अनेक भागातून रशियन फौजांना पिटाळून लावले. त्यामुळे संतापलेल्या रशियाने युक्रेनचे लुहान्सक, डोनेस्क, झापोरिझिया व खेरसॉन हे चार प्रांत कागदोपत्री स्वत:शी जोडून घेतले. रशियाचे हे कृत्य उघडउघड दादागिरीचे व दहशत माजविणारे असल्याने युक्रेनेचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी नाटोचे सदस्यत्व घेण्याचे पाऊल उचलले. अमेरिका व इतर पाश्चात्य देश सक्रिय झाले. त्यानंतर रशिया व क्रिमिया यांना जोडणाऱ्या एकमेव पुलावर स्फोट झाला. त्यामुळे दोन्ही देशांमधील संपर्क खंडित झाला. हा स्फोट युक्रेनने घडवून आणल्याचा रशियाचा आरोप आहे आणि त्या रागापोटी परवापासून युक्रेनच्या सर्व भागांवर रशियाकडून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत.
आतापर्यंत शंभरच्या आसपास क्षेपणास्त्रे टाकण्यात आली असून, त्यात एकोणीस नागरिकांचा मृत्यू झाल्याचा, शंभरावर लाेक जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाचे युक्रेनवरील हे नवे आक्रमण गंभीर आहे. सोमवारी दिवसभरात राजधानी कीव्ह, तसेच लिव्हीव, टेर्नोपिल, दनिप्रो, खारकीव आदी सगळ्या महत्त्वाच्या शहरांवर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले झाले. प्रामुख्याने वीज उत्पादन, पाणीपुरवठा अशा मूलभूत नागरी सुविधांची केंद्रे त्यात लक्ष्य बनविण्यात आली आहेत. देशातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे साडेआठशे कामगार खाणीत अडकल्याची भीती आहे. मॉलडोव्हासारख्या देशांना होणारी विजेची निर्यात कमी करण्यात आली आहे. कीव्ह व अन्य शहरांमध्ये रस्त्यांवर आगीचे लाेळ, सैरावैरा धावणारे सामान्य युक्रेनियन असे चित्र आहे. देशभर हवाई हल्ल्यांपासून सावध राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आह. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची तातडीची बैठक हल्ल्यांनंतर चोवीस तासांत बोलावण्यात आली. जी-७ या अमेरिका, इंग्लंड अशा बड्या राष्ट्रांच्या गटातही हालचाली वाढल्या आहेत. रशियाने जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांवर हल्ले केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याने हा युद्धगुन्ह्याचा प्रकार ठरू शकतो, अशी भूमिका संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली आहे. रशियावर आणखी जाचक निर्बंध लावण्याचा विचार सुरू आहे. परंतु, रशिया अशा दबावापुढे झुकणार नाही. उलट, युक्रेन प्रकरणात अमेरिका व इतर पाश्चात्य शक्तींनी हस्तक्षेप करू नये, अन्यथा आक्रमणे वाढविली जातील, अशी तंबी रशियाने दिली आहे. भारत, टर्की वगैरे जगभरातील सगळे प्रमुख देश दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा, कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर होऊ नये, यासाठी दबाव टाकत आहेत. टर्कीचे अध्यक्ष रशिया दौऱ्यावर जात असून, अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटून युक्रेनमधील नरसंहार थांबविण्यासाठी चर्चा करणार आहेत. गेल्या आठ - नऊ महिन्यांत प्रथमच भारताने संयुक्त राष्ट्रसंघातील कामकाजात छोटीशी का होईना परंतु रशियाच्या विरोधी भूमिका घेतली.
गुप्त मतदानाच्या रशियाच्या मागणीला भारताने विरोध केला. एकंदरित युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचे प्रकरण हाताबाहेर जाताना दिसत आहे. सर्वांत मोठी भीती अण्वस्त्रांच्या वापराची आणि त्यामुळे महायुद्धाला तोंड फुटण्याची आहे. आधीच युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे खते, गहू वगैरे अनेक उत्पादनांची यंदा पूर्ण वर्षभरात जगभर मोठी टंचाई जाणवली. आधी कोरोना महामारी व नंतर युक्रेनवरील रशियाचे आक्रमण यामुळे जागतिक मंदी दरवाजावर धडका देत आहे. बहुतेक सगळ्या आर्थिक महासत्ता येत्या काही महिन्यांमध्ये मंदीचा सामना करतील, चलनाचे अवमूल्यन होईल, महागाई प्रचंड वाढेल, असा इशारा अर्थकारणातील अभ्यासक देत आहेत. मंदीच्या पाऊलखुणा काही देशांमध्ये जाणवू लागल्या आहेत. अशावेळी रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा नाटो, पाश्चात्य देशांच्या माध्यमातून जगाच्या इतर भागात भडका उडाला तर मंदीची तीव्रता भीषण अवस्थेत पोहोचेल. युद्धामुळे जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल तर मंदीचे दुष्परिणाम औद्योगिक उत्पादनांवर, बाजारपेठेवर होतील. युद्ध व मंदी या दोहोंमुळे शेवटी सामान्यांनाच हालअपेष्टा भोगाव्या लागणार आहेत. निरपराध सामान्यांचेच बळी जाणार आहेत. ते सारे टाळण्यासाठी रशिया व युक्रेनच्या बाजूने उभे राहणाऱ्या देशांनी परिस्थिती संयमाने हाताळायला हवी.