कर्नाटकात भाजपचे घोडे न्हाले आहे. तेथे सत्तारूढ असलेले जेडीएस व काँग्रेसचे सरकार १८ महिन्यांच्या कालावधीनंतर उलथविण्यात व त्या जागी आपण खरेदी केलेल्या दोन पक्षांच्या आमदारांच्या मदतीने आपले सरकार स्थानापन्न करण्यात तो पक्ष यशस्वी झाला आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तरी बहुमताला आवश्यक एवढे आमदार त्याच्याजवळ नव्हते. तरीही तेथील राज्यपालांनी भाजपच्याच येडियुरप्पांना त्यांचे सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले. १५ दिवस सत्तेवर राहून ते सरकार अपेक्षेप्रमाणे पडले व काँग्रेसने, आपला पक्ष मोठा असतानाही, जेडीएसच्या कुमारस्वामींना पाठिंबा दिल्याने त्यांचे सरकार सत्तेवर आले.
१८ महिन्यांत या सरकारवर कोणताही मोठा आरोप नव्हता वा त्याच्या कोणत्याही चुका दाखविणे भाजपला जमले नव्हते, परंतु सत्तेवाचून तळमळणारे त्याचे पुढारी येडियुरप्पा थेट पहिल्या दिवसापासून कुमारस्वामींचे सरकार पाडण्यास व त्यासाठी वाटेल ती किंमत मोजून आमदारांची खरेदी करण्याच्या तयारीला लागले होते. सारा देश आपल्या झेंड्याखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षेने ग्रासलेल्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचाही अर्थातच त्यांना पाठिंबा होता. मग त्यांनी फोडलेले आमदार पळविले. त्यांना प्रथम मुंबईत व नंतर गोव्यात नेऊन त्यांची सरबराई केली. तशाही आपल्या आमदार व खासदारांच्या पक्षनिष्ठा आता विकाऊच झाल्या आहेत. त्यांना मतदारांची भीती नाही आणि त्यांच्यावर पक्षाच्या नेतृत्वाचे वजन नाही. त्यामुळे पक्ष कोणताही असला, तरी आपल्या लहरीनुसार फुटणे व आमिषांना बळी जाण्याची त्यांना फारशी शरम राहिली नाही. या बेशरमपणावर येडियुरप्पा यांना आपले सरकार आणण्याचा विश्वास वाटत होता व तो खराही ठरला.
त्यातून जेडीएस पक्षाचे ज्येष्ठ नेते एच.डी. देवेगौडा यांचे पक्षातील वजन आता कमी झाले आहे. एकेकाळी पंतप्रधान राहिलेल्या या नेत्याची आजची स्थिती जेवढी दयनीय तेवढीच हास्यास्पद आहे. काँग्रेसचे कानडी नेते सिद्धरामय्या हे एक यशस्वी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या वाट्याचे मुख्यमंत्रिपद कुमारस्वामींना, त्यांचा पक्ष लहान असतानाही देऊ केला. त्यांच्यावर पक्षाचा विश्वास होता. मात्र, त्यांचेही काही आमदार घोडेबाजारात उतरले व येडियुरप्पाच्या कारस्थानात सामील झाले. त्यामुळे कर्नाटकात जे घडले ते राजकारण नाही, ते कारस्थान आहे. सत्तेवरील चांगले काम करीत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांना आमिष दाखवून फोडणे हा घडवून आणलेला अपघात आहे. दुर्दैवाने अशा अपघातापासून आपला एकही पक्ष दूर राहिला नसल्याने, येडियुरप्पा यांचे याबाबतचे पाप सार्वत्रिक म्हणावे असे आहे. देशात लोकशाही टिकविण्यासाठी राजकीय पक्ष आहेत, पण ते पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकणार आहे. त्याचे सभासद असे स्वत:ला बाजारात मांडून बसले आणि मिळेल, त्या मोबदल्यात विकले जाऊ लागले, तर पक्ष आणि लोकशाहीही टिकणार नाही.
या संपूर्ण प्रकारात येडियुरप्पांची महत्त्वाकांक्षा विजयी ठरली. त्यांनी कुमारस्वामींचा पराभव केला नाही, तर जेडीएस व काँग्रेससह लोकशाहीचाही पराभव केला आहे. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या पक्षाला त्याची कारस्थाने अशीच यशस्वी ठरावी, अशा शुभेच्छाही दिल्या पाहिजेत. काँग्रेस व जेडीएस दोन पक्ष आपले आमदार राखण्यात व त्यांची मर्जी सांभाळण्यात अपयशी झाले किंवा कमी पडले, याचा त्यांनाही दोष द्यावा लागेल. मात्र, त्याच वेळी त्या दोन्ही पक्षांची आर्थिक ताकद केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या तुलनेत कमी आहे. तात्पर्य, आपल्या लोकशाहीचे वारू असेच रखडत व लंगडत चालणार आहे. त्याचे हे दुबळेपण जावे, आपले लोकप्रतिनिधी अधिक पक्षनिष्ठ व लोकनिष्ठ व्हावे आणि त्यांनी आपली लोकशाही आजच्यासारखी अस्थिर न ठेवता स्थिर व दृढ करावी, ही अपेक्षा भविष्याबाबत व्यक्त करणे आवश्यक आहे. लोकांनी निवडलेली सरकारे काही माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे पडणार असतील, तर लोकशाहीला फारसे भवितव्य उरत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.