दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांचे गोव्यावर विशेष लक्ष आहे. केंद्र सरकारच्या विविध यंत्रणा केजरीवाल यांना घेरू पाहत आहेत. सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणाच्या विषयावरून सीबीआयनेदेखील केजरीवाल यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. व्यक्तीश: केजरीवाल यांना चौकशीच्या घेऱ्यात अडकविण्याचा केंद्राचा विचार दिसतो. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरणावर खर्च करत असतात. गोव्यातील बंगल्यावर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांपासून आता प्रमोद सावंत यांंच्यापर्यंतच्या काळात किती खर्च झाला ते पाहिले तर काहीजणांना धक्का बसेल. गोव्यात मंत्र्यांच्या बंगल्यांवरही खूप खर्च झाला आहे. अहो आम्ही हे बंगले काही घरी घेऊन जाणार नाही, ते सरकारी आहेत, ते आमचेे नाहीत, आम्ही फक्त त्यात सध्या राहतो, असे भाजपचे अनेक मंत्री आपल्या उधळपट्टीचे समर्थन करताना सांगतात. केंद्रीय चौकशी यंत्रणा आम आदमी पक्षाच्या सर्वच नेत्यांच्या मागे लागल्या आहेत. गोव्यात पोलिसांनी एका वाहन अपघात प्रकरणी वाहन मालकाला अटक केली नाही. चक्क वकील अमित पालेकर यांना अटक केली होती. पालेकर हे आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष आहेत. कुणाला पकडावे, कुणाला पकडू नये हे यंत्रणांना कळते. असो. केजरीवाल यांच्या आप पक्षाने दिल्लीत कथित अबकारी धोरण घोटाळ्यातून मिळविलेला निधी गोव्यात निवडणुकीसाठी वापरला, असा दावा मध्यंतरी एका यंत्रणेने केला होता. काही चौकशी अधिकारी गोव्यातही येऊन गेले होते. केंद्र सरकारने मनीष सिसोदियासारख्या कल्पक व शिक्षित नेत्याला तुरुंगात पाठवले. आता केजरीवाल यांच्या दारापर्यंत यंत्रणा पोहोचली आहे, असे चित्र देशात उभे केले जात आहे. लोकसभा निवडणूक अगदी जवळ आल्यानंतर चौकशी यंत्रणांच्या कामाला वेग येईल. विरोधी इंडिया आघाडी कधीच मजबूत बनू नये याची काळजी केंद्र सरकार घेईलच. केजरीवाल यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे. एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधी यांना ज्या स्थितीतून जावे लागले होते, त्या स्थितीतून सध्या केजरीवाल किंवा आपचे अन्य काही राष्ट्रीय नेते जात आहेत.
गोव्यात आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढविण्यावर केजरीवाल यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुतांशवेळा केजरीवाल गोव्यात येऊन गेले. त्यांनी सभा घेतल्या. अनेक राजकारण्यांना आम आदमी पक्षात आणले. अनेकांना तिकीट दिले. आपचा काहीच प्रभाव नाही असे भाजप म्हणत होता, पण गोव्यात त्या पक्षाने विधानसभेच्या दोन जागा जिंकून दाखवल्या. हिंदू बहुजनांची मते मिळविण्याचा प्रयत्न आपने केला तरी, गोव्यात ख्रिस्ती मतदारांवर आपचा प्रभाव जास्त पडला. त्यामुळेच दक्षिण गोव्यातील दोन जागा हा पक्ष जिंकू शकला. अर्थात त्यात वेन्झी व्हीएगस आणि क्रुझ सिल्वा या दोन नेत्यांच्या व्यक्तीगत करिष्म्याचे योगदान आहेच.
आम आदमी पक्षाने गोव्यासाठी आपली नवी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची यादी परवाच जाहीर केली. पालेकर यांच्या नेतृत्वाखाली नवे उपाध्यक्ष, नवे सरचिटणीस वगैरे नेमण्यात आले आहेत. वाल्मिकी नायक यांच्यासारखा कार्यक्षम उपाध्यक्ष तसेच सुरेल तिळवे यांच्यासारखा सक्रिय सरचिटणीस आम आदमी पक्षाने जाहीर केला आहे. सिद्धेश भगत यांच्या रुपात नवा मुख्य प्रवक्ता नेमला गेला आहे. विशेष म्हणजे वेन्झी आणि क्रुझ सिल्वा या दोन्ही आमदारांना केजरीवाल यांनी पक्षात मोठी बढती दिली आहे. राष्ट्रीय संयुक्त सचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ते अशी दोन उच्चस्तरीय पदे त्यांना देण्यात आली आहेत. दोन्ही नेते आपल्या पदांना न्याय देऊ शकतील. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे दोन्ही आमदार दक्षिण गोव्यात अधिक सक्रिय होतील. यावेळी काही ख्रिस्ती व काही हिंदू बहुजन पदाधिकाऱ्यांना आपने पुढे आणले आहे. प्रतिमा कुतिन्हो यांनाही उपाध्यक्षपद दिले होते, पण प्रतिमाने दुसऱ्याच दिवशी आपचा राजीनामा दिला. आपमध्ये प्रतिमा राहू पाहत नाही, हे कळून येत होतेच. काँग्रेसमधून आपमध्ये प्रतिमा आल्या तेव्हा त्यांची खूप अपेक्षा होती. प्रतिमासारख्या नेत्या कुठच्याच पक्षात समाधानाने राहू शकणार नाहीत. केजरीवाल यांच्या पक्षाने पंजाब राज्य जिंकले. गुजरात, गोवा अशा विविध राज्यांत हा पक्ष प्रभाव वाढवू पाहतोय. यामुळे केंद्रातील भाजपने केजरीवाल यांना लक्ष्य बनवलेय हे सांगायला नको.