दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:23 AM2019-08-05T03:23:59+5:302019-08-05T03:27:34+5:30

परवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी जाहीर झाले. त्यांचे पत्ते कोणते? ते आहेत कुठे? ते छायाचित्रातून बाहेर पडणार कधी आणि जनतेला आपली छबी दाखविणार केव्हा? या पदाधिकाऱ्यांतही अनेक जण परवाच्या निवडणुकीत पडलेले व जखमी झालेले आहेत.

editorial on maharashtra congress situation and its internal conflict | दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

Next

लोकसभेत पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुका समोर आल्या. भाजप-सेना यांच्यात जागावाटप होऊन त्या पक्षांचे नेते जनसंपर्काच्या यात्रा करू लागले आहेत. अजून वाट आहे ती काँग्रेसच्या बाहेर पडण्याची. त्या पक्षातील पुढाऱ्यांत एकमत होण्याची. परस्परांविषयी अतिशय टीकात्मक व वाईट बोलणे थांबण्याची. त्यांचा पक्ष नसावा आणि ते एकेकटेच आपली लढाई लढवीत किंवा दुसऱ्यांची टिंगल टवाळी करीत असावे, असे त्यांचे वागणे आहे. आपले फोटो लोकांना दाखविले आणि त्यामागे राहुल व सोनियाजींची छायाचित्रे लावली की, आपले काम फत्ते झाले, या भ्रमातून त्या लोकांना अजून बाहेर पडता आले नाही.
 



आपण पडू शकतो (पडलोही आहोत), आपली मुलेही निवडून येत नाहीत, आपण विजयासाठी कोणतीही हालचाल व प्रयत्न करीत नाही, याच्याही जाणिवा त्या पक्षात दिसत नाहीत. साध्या बैठकी नाहीत, चर्चा नाहीत, जनसंपर्क नाही आणि जुनी पुण्याईही आता पातळ झाली आहे. हे या शहाण्या माणसांना कळत नसेल, तर त्यांना कोण तारणार आणि कोण मते देणार? प्रत्येक जिल्ह्यात भांडण, प्रत्येक मतदारसंघात हाणामारी, माणसे एकमेकांची तोंडे पाहत नाहीत आणि एकाने बोलाविलेल्या सभेत दुसरे येत नाहीत. ‘तो येणार असेल तर मी येणार नाही,’ असे म्हणण्यापर्यंत या एकाच पक्षातील कार्यकर्त्यांची भाषा जात असते. परिणामी, कुठेही प्रभावी नेतृत्व नाही, असलेल्याचा विश्वास नाही आणि परवाच्या महापक्षांतरानंतर पक्षाचा पुढाऱ्यांवरील व कार्यकर्त्यांवरील विश्वासही राहिला नाही.



काँग्रेसबाबत सारे आभाळच फाटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विजयाचा काही वारा यांनाही लागेल आणि त्यामुळे तरी त्यांच्यात एकजूट होईल, असा काहींचा समज होता, पण पुढाऱ्यांनी त्यांच्या वर्तनाने व निष्क्रियतेने तोही खोटा ठरविला आहे. एके काळी पक्ष जनतेचा होता. सरदार पटेल म्हणायचे, ‘आमच्या तिकिटावर विजेचा खांबही निवडून येईल.’ आता पटेल गेले आहेत, नेहरूही नाहीत, इंदिरा गांधीही गेल्या आणि पवार ते कुठे आहेत, याचा त्यांनाही पत्ता नाही. पवारांचे सोडा, ते तर कधीचेच दूर गेले आहेत, पण तुमचे नेते तरी जनतेत कुठे दिसत नाहीत. परवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी जाहीर झाले. त्यांचे पत्ते कोणते? ते आहेत कुठे? ते छायाचित्रातून बाहेर पडणार कधी आणि जनतेला आपली छबी दाखविणार केव्हा? या पदाधिकाऱ्यांतही अनेक जण परवाच्या निवडणुकीत पडलेले व जखमी झालेले आहेत. ते आपली प्रकृती कधी दुरुस्त करणार आणि पक्ष बांधणीच्या कामाला कधी लागणार?



आणखी महत्त्वाची बाब ही की, तुमचे तेच ते चेहरे पाहून लोकही कंटाळले आहेत. जरा नवीन माणसे द्या. चांगले काम करणारी व लोकांच्या विश्वासाला पात्र असणारी तरुण मुले फार आहेत. ती तुमच्या सेक्युलर विचारांचीही आहेत. त्यांना बळ द्या. सोनिया गांधींची मुले लोकप्रिय होतात, तशी आपलीही मुले होतील वा होतात, या भ्रमातून बाहेर पडा. आणि हो, ज्या पक्षाने आजवर भरभरून दिले, मुख्यमंत्रीपदापासून मंत्रीपदापर्यंत, खासदारकीपासून आमदारकीपर्यंत, कमिट्या दिल्या, समित्या दिल्या, नावे दिली आणि आणखीही बरेच काही दिले. किमान त्याला जागा आणि बाहेर पडा. विरोधक फार दूरवर गेले आहेत. फार लांबचा पल्ला त्यांनी गाठला आहे. त्यांची अपरिचित माणसेही त्यांनी निवडून आणली. आणि तुम्ही? तुम्हाला तुमच्या खुर्च्या, घरे व आराम अजून सोडवत नाही.



एकटे राहुल गांधी फिरणार, साऱ्या भाजपच्या व त्याच्या विषारी प्रचाराचा मारा ते एकटे अंगावर घेणार आणि त्यांच्यामुळे आपल्यावरचा मारा चुकतो, म्हणून तुम्ही गप्प राहणार? याला राजकारण म्हणत नाहीत. हे नेतृत्वही नाही आणि कार्यकर्तेही नाहीत. सव्वाशे वर्षांचा पक्ष अवघ्या पाच वर्षांत आपल्या निष्क्रियतेने या लोकांनी बुडविला आहे. त्याला वर आणायला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. झालेच तर आजवरच्या कमाईचा वाटाही त्यात गुंतवावा लागणार आहे. हे करण्याची किती जणांची तयारी आहे. साऱ्यांची तोंडे अजून दिल्लीकडे लागली आहेत आणि ही अवस्था त्यांना जनतेजवळ जाऊ देणारी नाही.

Web Title: editorial on maharashtra congress situation and its internal conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.