लता मंगेशकर हे नाव प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयात कोरून ठेवले आहे. या गानकोकिळेने गेली ७५ वर्षे आपल्या आवाजाने आपल्या आयुष्यात जो आनंद दिला, जे वळण दिले, हे अभूतपूर्व म्हणता येईल. भारतीय संगीतसृष्टी व चित्रपटसृष्टी यांमधील लतादीदींचे स्थान कोणीही कधीच विसरू शकणार नाही. लता मंगेशकर या नावाची आणि त्यांच्या जादुई आवाजाची मोहिनी आबालवृद्धांवर कायम आहे आणि कायमच राहील. ‘मेरी आवाज ही पहचान है’ असे त्यांचे एक गाणे त्याचा पुरावाच मानता येईल. संगीतरसिकांच्याच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणाऱ्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९0 वा वाढदिवस.प्रत्येक भारतीयाला त्या आपल्याच वाटतात, पण महाराष्ट्राला त्यांचा विशेष अभिमान आहे आणि त्याचे कारण त्या मराठी आहेत. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती अशा ३६ भारतीय प्रादेशिक तसेच विदेशी भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. लतादीदींनी आपल्या भाषेत गाणे गायले, हा प्रादेशिक भाषांतील रसिकांना वाटणारा अभिमानही अवर्णनीय म्हणता येईल. त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. पण केवळ आकडा व संख्या यांना महत्त्व नाही. त्यांच्या आवाजानेच आपल्याला गाण्यांतील शब्द, संगीत आणि मूड यांची ओळख झाली. शब्दांतील भावना नीटसपणे पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. पण लतादीदींनी त्या अतिशय सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांनी गाण्यांद्वारे प्रेम करायला शिकवले, त्यांनीच देशभक्ती शिकवली, सर्व धर्म, सर्वांचे देव आणि सारे भारतीय एकच असल्याची म्हणजे ऐक्याची भावना रुजवली, मनात भक्तिभाव निर्माण झाला, तोही लतादीदींच्या आवाजामुळे.प्रसंगी विरहाच्या भावनाही त्यांनी आपल्या केवळ आवाजातून निर्माण केल्या. पराभव न मानता कसे लढावे, हेही लतादीदींचा आवाज आणि गाण्यांनी शिकवले. आवाजातील माधुर्याचे तर काय वर्णन करावे? प्रत्येक मनोवस्थेला साजेलसा आवाज गीतांमधून व्यक्त होणे आवश्यक असते. ते लतादीदींना जसे शक्य झाले, तसे आताच्या अनेक गायकांना जमलेले नाही. भारतातील दहा महान व्यक्ती कोण, असे सर्वेक्षण झाले, तेव्हा त्यात पं. नेहरू, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, मदर तेरेसा यांच्याबरोबरच लता मंगेशकर यांचेही नाव घेतले गेले. संगीत क्षेत्रातील केवळ त्यांच्या नावाचा लोकांनी उल्लेख केला. लतादीदींचे संपूर्ण घराणेच संगीतातील. वडिलांपासून बहीण, भाऊ या सर्वांनी संगीतासाठी आयुष्य दिले. वडील मा. दीनानाथ, बहिणी आशा भोसले, मीना खर्डीकर, उषा मंगेशकर व बंधू हृदयनाथ या प्रत्येकाने संगीत क्षेत्राची सेवा केली आणि रसिकांना रिझवले. प्रत्येकाच्या आवाजात वेगळेपणा आहे. पण लतादीदी व आशा भोसले यांनीच संगीतरसिकांवर अधिराज्यच गाजविले.लतादीदींनी गेल्या काही वर्षांत गाणी गाणे बंद केले असले तरी आजही त्यांचीच गाणी सतत तोंडी येतात. अगदी त्यांची नातवंडे म्हणता येतील, अशी चिमुरडी मुलेही टीव्हीवरील संगीताच्या कार्यक्रमात त्यांचीच गाणी गातात. लता मंगेशकर यांना एकदा तरी भेटण्याची या चिमुरड्यांना इच्छा असते. कारण त्यांच्यासाठी त्या केवळ गायिका, गानकोकिळा वा गानसम्राज्ञी नसून, प्रत्यक्ष दैवत बनल्या आहेत. ‘सूर के बिना जीवन सुना’ या गीताप्रमाणे खरोखरच संगीताविना आयुष्य सुनेसुने असते. भले तुमच्याकडे गाण्याचा गळा नसो, पण गाण्याचा कान तर असतोच. तसा गाण्याचा कान तयार करण्याचे कामही लतादीदींनी आपल्या आवाज व गीतांनी केले. आजच्या घडीला शेकडो गायक-गायिका भारतात आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येक जण लतादीदींना देव मानतात, याचे कारणही हेच आहे. संत मीराबाई, संत कबीर, सूरदास यांच्याबरोबर मराठीतील अनेक संतांच्या भजनांनी आपल्यात भक्तिभाव निर्माण केला. सुंदर ते ध्यान, अरे अरे ज्ञाना झालासी, उठा उठा ओ सकळिक, रुणुझुणु रुणुझुणू रे भ्रमरा, अवचिता परिमळू अशी भक्तिगीते पूर्वी रेडिओवर लागली की, मन अतिशय प्रसन्न व्हायचे. किंबहुना ती गीते ऐकण्यासाठीच रेडिओ लावला जायचा. या संतांच्या रचनांमधील भक्तिभाव आपल्यापर्यंत पोहोचला तो लतादीदींच्या आवाजाने. मीराबाईंच्या भजनांचा ‘चाला वाही देस’ तर पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो तो केवळ आणि केवळ लतादीदींच्या आवाजामुळेच. आपल्यापर्यंत संत ज्ञानेश्वर, तुकाराम पोहोचवण्याचे कामही याच गानकोकिळेने केले.अशा कैक पिढ्या असतील की ज्यांनी लतादीदींच्या गाण्यांतून प्रेमाची प्रेरणा घेतली आहे. मग ते प्रेम बहीण-भावाचे असो, वडील वा आईविषयी असो किंवा प्रियकर-प्रेयसीचे असो. याच लतादीदींनी आपल्याला प्रेमही करायलाही शिकविले. प्रेमाच्या सर्व प्रकारच्या भावना त्यांच्या गीतांमधूनच आपल्यापर्यंत पोहोचल्या. पितृप्रेमासाठीचे ‘कल्पवृक्ष कन्येसाठी सोडुनिया बाबा गेला’ हे गाणे पुरेसे आहे. प्रेम आणि रोमँटिक मूड तरुण-तरुणींमध्ये रुजण्यामागेही लतादीदींची हजारो गाणी आहेत. रोमँटिक गाण्यात या गानसम्राज्ञीचा आवाज वेगळा भासतो. ’शोखियों मे घोला जाए फुलों का शबाब’ हे त्याचे उत्तम उदाहरण. ‘प्रेमस्वरूप आई’ गाण्यात लतादीदींचा आवाज वेगळा असतो, ‘मेंदीच्या पानावर’ गाण्यात तो आणखी वेगळा जाणवतो आणि ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्यात त्यांच्या आवाजातील आर्तता जाणवते. ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ ऐकताना आपोआपच आपल्यातील धर्माची बंधने तुटून पडतात. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ऐकताना त्यांच्या आवाजातील वीरश्री आपल्यापर्यंत पोहोचते. ‘जयोस्तुते’ हे गीत मंगेशकर कुटुंबीयांनी मिळून गायलेले, पण त्यातही लतादीदींचा ठसठशीत आवाज पटकन ओळखता येतो. अशी हजारो उदाहरणे देता येतील. लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने काही मोजक्या मराठी चित्रपटांना संगीत दिले. ती गाणी तर अप्रतिम आहेत. ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘अखेरचा हा तुला दंडवत’, ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’, ‘नको देवराया अंत आता पाहू’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘अपर्णा तप करते काननी’ यासारखी पुन्हा पुन्हा ऐकत राहावीत, असे वाटणारी गाणी त्यांनीच स्वरबद्ध केली आहेत. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करणाऱ्या लता मंगेशकर या पहिल्या गायिका. गीतांच्या संख्येमुळेच त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.लतादीदींनी मन्ना डे, किशोरकुमार, मुकेश, महंमद रफी, हेमंतकुमार यांच्यापासून उदित नारायण आणि अगदी अलीकडील सोनू निगम अशा अनेक गायकांसमवेत द्वंद्वगीते गायली आहेत. हेमंत कुमार व लतादीदींनी गायलेले ‘डोलकर दर्याचा राजा’ वा ‘माझ्या सारंगा’ ही कोळीगीते तर खूपच गाजली. गाण्यातील शब्दांना आवाजाचा परीसस्पर्श झाला, ते केवळ लतादीदींमुळे. अनेक गीतकार व संगीतकारही आपल्याला माहीत झाले, ते दीदींच्या आवाजामुळेच. लतादीदींच्या गाण्यांमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसला चालू शकतो, अशी त्यांना खात्री असायची आणि ती लतादीदींनी सार्थ करून दाखवली. लतादीदी व आशाताई यांची इंडस्ट्रीत मक्तेदारी होती आणि त्यामुळे अनेक गायिकांवर अन्याय झाला, अशी टीकाही त्या वेळी होत असे. पण गीतकार, संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते यांचा सारा भरोसा या दोन बहिणींवर होता. त्यामुळे या दोघींना दोष देण्यात काय अर्थ. अर्थात हा सारा इतिहास झाला. त्यामुळे त्यात नाक खुपसण्यात काही अर्थ नाही. लतादीदींची गाणी मात्र आज, वर्तमानातही तितकीच लोकप्रिय आहेत, जितकी पन्नास-साठ वर्षांपूर्वी होती. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या गीताप्रमाणे दीदींनी आपल्याला फक्त आणि फक्त आनंदच दिला. ज्यांनी कैक पिढ्यांवर भुरळ घातली, अशा दीदींना वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घायुष्य लाभावे यासाठी ‘लोकमत’ परिवारातर्फे शुभेच्छा!
जादुई आवाजाची मोहिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 4:44 AM