कोविड नावाच्या श्वास गुदमरून जीव घेणारा महाभयंकर विषाणू आढळल्याच्या, लागण झालेला पहिली व्यक्ती निष्पन्न झाल्याच्या घटनेला परवा, मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. चीनमधील वुहान शहरात बाधित आढळलेली हुबेई प्रांतातील ती ५५ वर्षांची व्यक्ती ‘पेशंट झिरो’ असल्याचा दावा काहींना मान्य नाही हे खरे. पण, गेले वर्षभर पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येकाने भीतीच्या छायेखाली एकेक दिवस वर्षासारखा कंठला असल्याने नोव्हेंबर की डिसेंबर महत्त्वाचे नाहीच. देश-प्रदेश, जात-धर्म, भाषा-संस्कृती असा कशाकशाचा भेदाभेद न मानणाऱ्या विषाणूच्या संक्रमणाने बेफिकीर होऊन हवेत उडणाऱ्या माणसांना एका झटक्यात जमिनीवर आणले.
व्यक्ती ते समष्टी असा जगण्याचा सगळा पट बदलून टाकला. दैनंदिनी, खाणेपिणे, आहार-विहार, सवयी, उपजीविका, इतकेच कशाला मानवी नातेसंबंध, कुटुंब, समाज वगैरेचा फेरविचार करायला लावला, हे अधिक महत्त्वाचे. चीनमधून निघालेला हा विषाणू साधारणपणे मार्चपर्यंत हळूहळू जगाच्या कानाकोपऱ्यात गेला. युरोप, अमेरिकेच्यासारख्या महासत्तांना त्याने झुकायला लावले. भारतासारख्या खंडप्राय, प्रचंड लोकसंख्येच्या देशाला त्याने धडा शिकवला. असह्य वेदना दिल्या. आजही त्यातून अनेकजण सावरलेले नाहीत. कोट्यवधी स्थलांतरित मजूर, बायाबापड्या व चिमुकल्यांची जीवघेणी पायपीट देशाने अनुभवली. कोट्यवधींच्या पोटापाण्याची साधने संकटात आली. उद्योग, व्यवसायाची घडी विस्कटली. अर्थव्यवस्थेला प्रचंड धक्का बसला. ती रुळावर आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केल्यानंतर दसरा-दिवाळीच्या काळात काही चांगल्या गोष्टी घडताना दिसल्या तरी अजून खूप अंतर कापायचे आहे.
ही विषाणूविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. त्यावर विजय मिळविण्याचा ध्यास मानवी समुदायाने घेतला आहेच. इस्रायली लेखक युवाल नोआ हरारी यांनी त्यांच्या होमो डिअस पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, भूक, युद्ध व रोगराई या तीन शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचा मोठा वारसा मानवजातीला आहे आणि त्याचा मार्ग विज्ञानावरील विश्वासातूनच जातो. कोणी कितीही भाकडकथा सांगितल्या तरी महामारीवर मात करण्याचा मार्ग विज्ञानच असल्याचे प्रत्येकाला मनोमन कळून चुकले आहे. थोडक्यात यानिमित्ताने विज्ञानाची महती मानवी मनांवर ठसवली गेली. तरीही धोका कायम आहे. किंबहुना तो अधिक वाढला आहे. युरोपमध्ये दुसरी लाट भयावह स्थितीत पोहोचली आहे. अमेरिकेतही स्थिती गंभीर आहे. इकडे दिल्लीत तिसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. विषाणूची भीती पाठीवर टाकून हातावर पोट असणारे लोक पुन्हा कामावर परतले आहेत. अनलॉक किंवा ‘मिशन बिगिन अगेन’ नावाने एकेक सार्वजनिक व्यवस्था खुली केली जात आहे. देवालये उघडली आहेत व ज्ञानालये उघडण्याची तयारी सुरू आहे. पण, हे करताना कमालीची दक्षता बाळगण्याची गरज आहे. एकमेकांपासून पुरेसे अंतर, मास्क व सॅनिटायझर हेच सध्या तरी या सावधगिरीचे उपाय आहेत. कारण, संक्रमणाची ही आवर्तने सुरूच राहतील. डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या विषाणूंप्रमाणे कोरोनासोबतही जगण्याची मानसिक तयारी सगळ्यांनी केली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. महिनाभरात ती आली तरी सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी बरेच महिने लागतील. सध्या संसर्गाने अंधारलेल्या क्षितिजावर सूर्योदयापूर्वीचे झुंजुमुंजु झाले, इतकेच म्हणता येईल.