संपूर्ण देशाने दखल घ्यावी अशा महापुरांचा उपराजधानी नागपूरचा इतिहास नाही. ती संकटे पूर्वेकडील अधिक पावसाच्या वैनगंगा खोऱ्यात वारंवार ओढवतात. कधीतरी वर्धा खोऱ्यात ‘मोवाड’ घडते. हवामान खात्याने गेले तीन दिवस ऑरेंज सिटीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिपावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असला तरी विजांचे महाभयंकर तांडव व त्यापाठोपाठ भयकंप घडविणाऱ्या पुराची कल्पना कुणीच केली नव्हती. शनिवारी पहाटे ही आपत्ती शहरावर कोसळली. त्यात पाच बळी गेले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविल्याने शेकडो लोकांचे प्राण वाचले. आर्थिक हानी मात्र मोठी आहे. किमान दहा हजार घरांना फटका बसला. शेकडो वाहनांचे नुकसान झाले. नागपूरकरांनी निसर्गाचा रुद्रावतार अनुभवला. जवळपास तीन तास थरकाप उडावा, असा विजांचा थयथयाट सुरू होता. त्या मानाने पावसाचा जोर फार नव्हता. तीन-चार पर्जन्यमापक केंद्रांवर जेमतेम शंभर-सव्वाशे मिलिमीटर इतकीच नोंद चार तासांत झाली. तरीदेखील नाग नदीच्या पुराने हाहाकार का उडवला, यावर गंभीर चिंतन करण्याची गरज आहे.
नागपूरच्या पश्चिमेकडे उगम पावून शहराच्या मधोमध वाहत जाणाऱ्या नाग नदीवर पश्चिम टोकावरच अंबाझरी हा प्रसिद्ध तलाव आहे. त्याच्या पाणलोटात अधिक पाऊस पडल्याने हा तलाव ओसंडून वाहिला. अंबाझरीच्या सांडव्यावर स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याजवळचा प्रवाह अंगावर काटा आणणारा होता. टोलेजंग इमारती, त्यापैकी काही अतिक्रमणे, सिमेंटचे रस्ते, भव्यदिव्य मेट्रो मार्ग असा विकास अंगाखांद्यावर खेळविणाऱ्या या भागात आता नदीचा नाला बनला आहे. सुशोभिकरणाच्या नावाखाली त्यावर जागोजागी बांधलेल्या भिंतींनी अडथळे तयार झाले आहेत. याच नालावजा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी दीड-दोन हजार कोटींची योजना आखण्यात आली आहे. कधीतरी नदीतून बोटी चालतील, अशी स्वप्ने नागपूरकर बघत आहेत. पण, काल, अंबाझरी तलावातील विसर्गाचा भार या नाल्याला पेलवला नाही. असेच पिवळी नदीबाबत घडले. पाण्याने नद्यांचे पात्र सोडले आणि वस्त्यावस्त्यांमध्ये हाहाकार उडाला. नागपूरचा पश्चिम भाग अधिक विकसित, पुढारलेला आहे. अनेक नामवंत व प्रतिष्ठित या भागात राहतात. त्यांच्या आलिशान गाड्या पाण्यात तरंगत असल्याची आणि त्यातून आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी चालत असल्याची दृश्ये संपूर्ण देशाने पाहिली. हे असे कसे घडले, या प्रश्नाचे उत्तर आहे अतिरेकी काँक्रीटीकरण. जलविज्ञानाची साधी साधी तत्वे दुर्लक्षित करून दिसेल तिथे सिमेंटचा मारा केल्यामुळे नैसर्गिक जलस्रोत, नैसर्गिक प्रवाह नष्ट झाले. अलीकडे नागपूर विकासाच्या मार्गावर आहे म्हणजे काय, तर सगळे रस्ते सिमेंटचे झाले किंवा होत आहेत. उड्डाणपुलांचे जाळे तयार होत आहे. एकाच मार्गावर रस्ता, उड्डाणपूल व इलेव्हेटेड मेट्रो यांचे विक्रम वगैरे नोंदले जात आहेत. काही ठिकाणी एकाच रस्त्यावर सिमेंटचे दोन-तीन थर चढविण्यापर्यंत हा विकास गतिमान झाला आहे. परिणामी बहुतेक सगळे रस्ते उंच आणि वस्त्या सखल भागात असे चित्र आहे. या रस्त्यांमुळे अपघात वाढलेच. शिवाय पावसाचे पाणी मुरण्यासाठी आवश्यक जमिनीची सछिद्रता संपुष्टात आली. नैसर्गिक जल पुन:र्भरण थांबले. केवळ नद्या व नालेच नव्हे तर विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे तहान भागविणाऱ्या विहिरींचे जाळे नष्ट झाले.
गेल्याच आठवड्यात नऊशेपैकी दीडशेहून अधिक विहिरी बुजल्याची माहिती महापालिकेनेच उच्च न्यायालयात दिली. हा असा सगळा उलटा प्रवास सुरू असताना जेमतेम चार-साडेचार इंच पावसाने आपल्या विकासाच्या धोरणाची लक्तरे वेशीवर मांडली. हे केवळ नागपुरात घडले किंवा घडत आहे, असे अजिबात नाही. मुंबईत ते मिठी नदीबाबत वारंवार घडते. पुण्यात मुळा व मुठा, सांगलीत कृष्णा, कोल्हापुरात पंचगंगा, नाशिकमध्ये गोदावरी अशा सगळ्या नद्यांचे श्वास सिमेंटच्या माऱ्यामुळे पुरते कोंडले गेले आहेत. सिमेंटची जंगले निसर्ग गिळंकृत करीत आहेत. निसर्गाची ही ओरबड कधी ना कधी संकट बनून माणसांवर हल्ला करणार हे नक्की. महापुरासारखे असे संकट आले की, तेवढ्यापुरती चर्चा होते. दीर्घकालीन उपायांची आश्वासने दिली जातात. ती कधीच पूर्ण होत नाहीत. कारण काँक्रीटीकरणाचा सोस वाढतच असतो. त्यामागे कंत्राटांचे अर्थकारण असते. नेते, अधिकारी, धोरणकर्ते आदींचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतात. विकासाच्या नावाने रचला गेलेला हा चक्रव्यूह आहे. त्यातून शहरांना बाहेर काढण्याची चर्चा सगळेच करतात. मार्ग मात्र कुणालाच सापडत नाही, हे दुर्दैव!