भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांच्या नेतृत्वाने गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिका आणि घेतलेले निर्णय हा नवा अध्याय असू शकेल का? अशी चर्चा आशिया राष्ट्रांमधील संबंधावर विचारमंथन करणाऱ्या विचारवंतांच्यामध्ये चालू झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेली फाळणी आणि काश्मीर प्रश्नांवरून शेजारील दाेन्ही देशांमध्ये झालेल्या तीन युद्धांची पार्श्वभूमी पाहता या घडामाेडीवर तातडीने विश्वास बसत नाही, असे अनेकांना वाटते आहे. पाकिस्तानने परवा (मंगळवार, २३ मार्च राेजी) राष्ट्रीय दिन साजरा केला.
लाहाेर येथे २३ मार्च १९४० राेजी मुस्लीम लीगच्या पुढाकाराने घेतलेल्या अधिवेशनात सर्वप्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यानंतरच स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे आली आणि स्वातंत्र्याच्या पहाटे देशाची फाळणी झाली. ताे दिवस पाकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळण्यात येताे. राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या हाेत्या. त्याचवेळी गेली दाेन वर्षे न झालेली भारत-पाकदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वाटपासाठी १९६० मध्ये स्थापन केलेल्या इंडस पाणी आयाेगाची बैठक सुरू झाली. दाेन्ही देशांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी वापरावर चर्चा करण्यास सुरू झाली आहे. तत्पूर्वीही भारत-पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवर हाेणाऱ्या चकमकींना विराम देण्याचा निर्णय घेतला हाेता. तेव्हाच आश्चर्य व्यक्त केले जात हाेते. तसेच पंतप्रधान इम्रान खान यांनी उभय देशांमधील संबंध सुधारण्यावरही वक्तव्य करून या चकमकीच्या विरामाचे स्वागत केले हाेते.
पाकिस्तानात लाेकनियुक्त सरकार सत्तेवर असले तरी लष्कर आणि लष्करप्रमुखाची भूमिका काय राहते, याला महत्त्व असते. कारण आजवर लाेकनियुक्त सात पंतप्रधानांपैकी सर्वांनाच पदच्युत व्हावे लागले आहे किंवा त्यांची हत्या झाली आहे. हा पाकिस्तानमधील लाेकशाहीचा काळा इतिहास आहे. मात्र, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी इस्लामाबादेत एका परिसंवादात बाेलताना भारत-पाकिस्तानने भूतकाळातील घटना विसरून पुढे गेले पाहिजे, काश्मीर प्रश्नासह सीमेवर शांतता नांदेल याचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका मांडली, तेव्हाही सर्वांना थाेडे आश्चर्य वाटले हाेते. गेल्या दाेन महिन्यांतील या घटनांनी उभय राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी पाेषक वातावरण निर्मिती झाली आहे, हे तरी मान्य केले पाहिजे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काेविडबाधित झाल्याचे समजताच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करीत पंतप्रधान माेदी यांनी खास पत्र पाठवून राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सीमेवरील चकमकीस विराम, उभय देशांच्या पंतप्रधानांची जाहीर भूमिका आणि लष्करप्रमुखांचे वक्तव्य पाहता पाकिस्तानची भारताबराेबरच्या संबंधात सुधारणा करण्याची तयारी दिसते. त्याची दाेन प्रमुख कारणे दिसतात. ती म्हणजे अमेरिकेतील सत्तांतर आणि काेराेना महामारीने अर्थव्यवस्थेला बसलेला फटकाही आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जाे बायडेन निवडून आल्यानंतरच्या या घडामाेडी आहेत, हे नाकारता येणार नाही. पंतप्रधान माेदी यांनी डाेनाल्ड ट्रम्प यांची बाजू उचलून धरली असली तरी बायडेन यांच्या सरकारची भूमिका भारताला मदत करणारीच राहणार आहे, हे आता पाकिस्तानने ओळखले आहे. यात अमेरिकेच्या हितसंबंधांचा भाग असला तरी पाकिस्तानचे चीनच्या बाजूने झुकलेले अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीमध्ये बसत नाही, हे उघड सत्य आहे. चीनचे आर्थिक धाेरण पूर्णता व्यावसायिक आहे. याउलट अमेरिकेने पाकिस्तानची अफगाण युद्धात मदत घेताना भरभरून आर्थिक हातभार पाकिस्तानला लावला हाेता. चीनच्या उद्देशात हा विषयच येत नाही.
दक्षिण आशियातील सत्तासमताेलात आणि आर्थिक हितसंबंधात अमेरिकेचा कल भारताच्या बाजूने दिसताच पाकिस्तानच्या भूमिकेत हा झालेला बदल दिसताे. इंडस पाणी आयाेगाची दाेन वर्षे न झालेली बैठकही त्याचाच भाग आहे. अन्यथा चेनाब नदीच्या खाेऱ्यातील मरूसुदर या उपनदीवरील एक हजार मेगावॉटचा प्रकल्प पाकिस्तानला न विचारता बांधण्याचा निर्णयही माेदी सरकारने घेतला आहे. ताे या बैठकीत मान्य करण्यात येईलच. विशेषत: काश्मीरसाठी खास असलेले ३७०वे कलम रद्द करून ताे भाग केंद्रशासित केल्यानंतरच्या या घडामाेडी महत्त्वाच्या आहेत. यानिमित्त मांडलेल्या भूमिका आणि विविध पातळीवर हाेणाऱ्या चर्चेतून उभय राष्ट्रांतील तणाव निवळत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. नरेंद्र माेदी यांनीही दिलेला प्रतिसाद खूप सकारात्मक आहे.