भारतीय राजकारणाच्या आखाड्यात सध्या एक विपरीत स्थिती दिसते आहे. सत्तारूढ आणि मुख्य विरोधी पक्ष असे दोघेही आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी शक्य तितके मित्रपक्ष कसे मिळवता येतील याची धडपड करत आहेत. एनडीएमध्ये ३८ मित्रपक्ष जोडल्याचा दावा भारतीय जनता पक्ष करतो आहे, तर काँग्रेसनेही २६ मित्रपक्ष जोडल्याचे बंगळुरूमध्ये जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त मित्र जोडण्याचा जो आटापिटा चालवला आहे याबद्दल राजकीय वर्तुळात बऱ्यापैकी आश्चर्य व्यक्त होते आहे. कारण भाजपच्या ३८ पैकी २४ मित्रपक्षांकडे लोकसभेत एकही खासदार नाही आणि सात जणांकडे केवळ एक एकच खासदार आहे. गेल्या चार वर्षांत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक घेतल्याची नोंद नाही.
२०१९ च्या विजयानंतर भाजपाला मित्रपक्षांची फारशी आठवण झालेली नाही. स्वबळावर बहुमत मिळवता यावे यासाठी मित्रपक्षांना कमकुवत करण्याचा काटेकोर प्रयत्न भाजपने राज्याराज्यांमध्ये केला असेही एक कारण यासंदर्भात दिले जात आहे. बिहार असो वा महाराष्ट्र किंवा पंजाब, भाजपने स्वबळावर मतपेढी वाढविण्याचे सर्व प्रयत्न केले; परंतु अचानक पक्षाने आपले धोरण बदलले असून, जो येईल त्याला पक्षाची दारे उघडी असल्याचे चित्र दिसते आहे.
२०२४ साली एनडीएकडे ४०० जागा असाव्यात असा मनसुबा रचला गेला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षही कामाला लागला आणि पडेल ती किंमत मोजून मित्रपक्ष जोडण्याचा आटापिटा त्याने सुरू केला. दिल्ली सेवा वटहुकुमावरून 'आप'ने केलेली मागणी मान्य करताना कड्डू झालेले तोंड काँग्रेसलाही लपवावे लागले आहे. गांधी कुटुंबीयांनी एक पाऊल मागे घेतले असून लोकसभेत तीन अंकी संख्या प्राप्त करण्याचा हेतू बाळगून अन्य विरोधी पक्षांना जागा करून दिली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत काँग्रेस नसेल हेही अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगून टाकले आहे.
'इंडिया' या नव्या संबोधनाखाली एकवटलेले आघाडीतील २६ विरोधी पक्ष लोकसभेतील संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्यातले १८ पक्ष असे आहेत की ज्यांच्याकडे एक किंवा अधिक लोकसभा खासदार आहे. भाजपच्या गोटात चिंता असण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याकडील लोकसभेच्या जागांपैकी १६० जागांची परिस्थिती सध्या दोलायमान आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत २२४ जागांवर पक्षाला ४० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आणि उरलेल्या ७९ जागांवरही बरे मताधिक्य होते, तरीही ही संख्या २०२४ साली टिकवण्याची चिंता पक्षाला आहे.
सूत्रे अमित शाह यांच्या हाती
हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या पराभवानंतर या वर्षाअखेरीस पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची सूत्रे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आपल्या हाती घेतली आहेत हे आता स्पष्ट दिसते आहे. पाच राज्यांतील पक्षप्रमुखांच्या मदतीला त्यांनी आपल्या काही निष्ठावंतांना राज्य प्रभारी म्हणून थाडले आहे.हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता पुन्हा मिळवण्याची चांगली संधी असताना पीछेहाट झाल्याने पंतप्रधान बरेच अस्वस्थ झाले होते. कर्नाटकातील पराभवानंतर मात्र अमित शाह यांनी आगळीक करणाऱ्या नेत्यांना मार्गावर आणण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांचे स्वागत करण्याचे धोरण आणि संबंध ताणले गेलेल्या मित्रपक्षांना पुन्हा आपल्या छत्रछायेत आणण्याचे प्रयत्न हा त्यांच्या योजनेचा भाग आहे.
राजस्थानमध्ये अमित शाह यांनी बऱ्याच गोष्टी मार्गावर आणल्या असून भाजपला हे राज्य जिंकण्याचा विश्वास वाटू लागला आहे. मध्य प्रदेशात मात्र मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची स्थिती चांगली नाही असे सगळे पाहणी अहवाल सांगत आहेत. भाजपसमोर मोठे आव्हान असताना नेतृत्वबदल अंगाशी येऊ शकेल हे लक्षात घेऊन शाह यांनी शिवराजसिंह चौहान यांची पाठराखण करायचे ठरवले आहे.
चौहान यांनी राज्याच्या तिजोरीची दारे खुली केली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या योजना जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. तेलंगण वगळता राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम जिंकता येईल, असा विश्वास सध्या भाजपच्या वर्तुळात दिसतो. राहुल गांधी प्रतिमा बदलाची कहाणी राहुल गांधी यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि शैलीत खूपच मोठा बदल झाला असून, आपण अगदी साधेसुधे आहोत अशी प्रतिमा तयार करण्याची त्यांची धडपड दिसते. भारत जोडो यात्रेनंतर हा बदल दिसू लागला. खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर मुदतीच्या आधीच त्यांनी सरकारी बंगला रिकामा करून दिला, काही काळासाठी सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या १० जनपथवर ते राहायला गेले. मात्र दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील गजबजलेल्या वस्तीत भाड्याचे घर शोधण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला.
आपल्याला दिल्लीत राहायला घर नाही आणि जोरबाग किंवा गोल्फ रिंग्स अशा महत्त्वाच्या श्रीमंत वस्त्यांमध्ये आपल्याला घर नकोच आहे, असे दोन संदेश त्यांनी दरम्यानच्या काळात दिले. बहुतेक लवकरच ते हुमायून उद्यानात सकाळचा फेरफटका मारताना आणि लोकांशी बोलताना दिसतील.