नव्या केमिस्ट्रीने जुन्या गणिताची धूळधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:05 AM2019-06-08T03:05:56+5:302019-06-08T03:06:19+5:30
मोदींच्या त्सुनामीची सर्वांत मोठी ताकद नेतृत्वाची आहे. ही निवडणूक फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींची निवडणूक होती. लोकांनी त्यांना आणि त्यांच्या नावालाच मतदान केले!
पवन वर्मा
आताच्या निवडणुकीत मोदी त्सुनामीने १९७१ सालानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात संपूर्ण बहुमतासह सत्तेत येऊन नवा विक्रम केला. या विजयाचा अर्थ विरोधकांनी समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला केवढ्या मोठ्या आव्हानाचा सामना करायचा आहे हे त्यांना त्यामुळे समजून येईल. त्यांनी त्याकडे कानाडोळा करण्याचे ठरविले किंवा या नव्याने उद्भवलेल्या राजकीय स्थितीला समजून घेणे टाळले, तर त्यांचेच नुकसान आहे. या निकालातून दोन गोष्टींचा बोध घेण्यासारखा आहे. पहिला बोध हा की वारसा हक्काने चालत आलेल्या राजकारणाला या निकालाने हादरा दिला. त्याचा सर्वांत मोठा फटका काँग्रेसला बसला. गांधी कुटुंबाचे प्रमुख असलेले राहुल गांधी हे या पक्षाचे अध्यक्ष असल्याने त्यांनाही याची झळ पोचली. स्वत: राहुल गांधींचा अमेठी मतदारसंघात पराभव झाला. त्यांच्या पक्षाच्या पूर्वी ४४ जागा होत्या. या निवडणुकीनंतर त्यात अवघ्या आठ जागांची भर पडली. या पराभवाचे काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्या पक्षाने नवा नेता शोधण्याची आणि नवीन धोरण स्वीकारण्याची गरज आहे.
देशातील अन्य राजकीय घराण्यांची अवस्थासुुद्धा वाईट झाली आहे. मुलायमसिंह यादव यांचा मुलगा या नात्याने समाजवादी पक्षाची जबाबदारी अखिलेश यादव सांभाळत आहेत. त्यांच्या पत्नीचा तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांचा निवडणुकीत पराभव झाला. चौधरी चरणसिंगांचे चिरंजीव अजित सिंग आणि जयंत सिंग हे दोघेही पराभूत झाले. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव या नात्याने बिहार राज्यात राष्ट्रीय जनता दलाची धुरा सांभाळणारे तेजस्वी यादव यांचा पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही. हरियाणात एकेकाळचे राजकारणातील खंदे वीर समजल्या जाणाऱ्या चौटाला, हुडा आणि भजनलाल यांच्या वंशजांनाही मतदारांकडून धूळ चाखावी लागली. बिजू पटनायक यांचे चिरंजीव या नात्याने नवीन पटनायक हे ओडिशात सत्तेत आहेत. ओडिशातील बहुसंख्य जागा त्यांच्या पक्षाने जिंकल्या असल्या तरी भाजपची घुसखोरी त्यांना रोखता आली नाही. काही घराणी या त्सुनामीत टिकून राहिली हेही खरे आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन रेड्डी यांचे चिरंजीव जगन रेड्डी हे निवडून आले. त्यांनी सत्ता मिळवली. तामिळनाडूत करुणानिधींचे सुपुत्र स्टॅलीन यांनीही चांगली कामगिरी केली.
व्यक्तिगत पातळीवर जे खासदार निवडून आले आहेत ते प्रभावी राजकारण्यांच्या घराण्यातीलच आहेत. तथापि, घराण्याच्या पाठबळावर घराण्यातील व्यक्ती निवडून येते, त्या समजाला धक्का मिळाला. जातीची जुनी गणिते यापुढे चालणार नाहीत हा या निवडणुकीने दिलेला दुसरा धक्का. त्याची जागा नव्या राजकीय केमिस्ट्रीने घेतली. उत्तर प्रदेशात अशी धारणा झाली होती की यादव, दलित, जाट आणि मुस्लीम यांचे महागठबंधन हे अजिंक्य राहील. पण त्याची वाताहत झाली. बिहारमध्ये राजदला वाटत होते की मुस्लीम-यादव यांची आघाडी मोठे आव्हान निर्माण करील. पण ती आघाडीसुद्धा नव्या केमिस्ट्रीने मोडून पडली. आपल्या जातीचे लोक जातीभेद डावलून स्वतंत्र विचाराने आपल्या इच्छेप्रमाणे मतदान करतील अशी कल्पनाच कुणी केली नव्हती. जातीच्या आधारे दोन अधिक दोन चार असे गणित मांडणाऱ्यांना नव्याने विचार करणे भाग पडले आहे.
मोदींच्या त्सुनामीची सर्वांत मोठी ताकद नेतृत्वाची आहे. ही निवडणूक फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींची निवडणूक होती. लोकांनी त्यांना आणि त्यांच्या नावालाच मतदान केले! कुणी मान्य करो अथवा न करो पण त्यांच्यात आपल्या परंपरांशी घट्ट जुळलेली नाळ जशी लोकांना पाहायला मिळाली तसा करिश्मा, अदम्य उत्साह, दूरदृष्टी, इच्छाशक्ती, निर्णयक्षमतेचा एकत्रित आविष्कारही पाहायला मिळाला. त्यांच्याविषयी वाटणाºया या आव्हानात्मक आकर्षणापर्यंत पोचण्याची क्षमता विरोधकांपैकी कुणामध्येही पाहावयास मिळाली नाही.
लोकांसमोर देशाचे एक चित्र उभे करणे हेही महत्त्वाचे असते. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारे जे निर्णय त्यांनी घेतले, त्यामुळे स्वत:च्या जीवनाचा दर्जा सुधारण्याच्या लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. दुसरे म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शहाबानो प्रकरणापासून व्होटबँकेच्या राजकारणातून मुस्लिमांचे जे तुष्टीकरण चालवले होते, त्याविरुद्ध लोकांचा संताप होता. तिसरे कारण हे की बालाकोटच्या हल्ल्यानंतर राष्ट्रप्रेमाची भावना उफाळून आली आणि देशाच्या सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटले. नव्या भारताच्या निर्मितीच्या घोषणेकडे तरुण वर्ग आकर्षित झाला. भारतात ३५ वर्षांखालील लोकसंख्येचे प्रमाण ६५ टक्के असल्याने त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची होती. तरुणांना विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील असे वाटू लागले. हे सर्व मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात पक्षाध्यक्ष अमित शहा, त्यांचे शिस्तबद्ध कार्यकर्ते यशस्वी ठरले.
एवढ्या मताधिक्याने जिंकल्यावर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि सरकारची जबाबदारीही. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न रालोआकडून करण्यात येईल अशी अपेक्षा करू या. द्वेषाचे आणि विभाजनवादी प्रवृत्तीचे राजकारण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘समाजात सुसंवादाची भावना जितकी मजबूत असते तितके ते राष्ट्रही मजबूत असते’ या चाणक्याच्या वचनाचा त्यांनी कधीही विसर पडू देऊ नये!
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)