कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पोर्तुगालने जिवंतपणी आख्यायिका बनलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो या दिग्गज खेळाडूला बाहेर बसविले. आक्रमण फळीत रोनाल्डोऐवजी खेळलेल्या गोन्कालो रामोस याने स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदविली आणि अंतिम सोळा संघांमध्ये स्थान मिळविताना पोर्तुगालने ६-१ असा दणदणीत विजय नोंदविला. पोर्तुगीज प्रशिक्षक फर्नांडो सान्तोस यांच्या या निर्णयाने क्रीडा जगताला हादरा बसला.
रोनाल्डोलाही बाहेर बसविले जाऊ शकते, हा संदेश सान्तोस यांनी फुटबॉल विश्वाला दिला. नंतर बातमी आली, की संतापलेल्या रोनाल्डोने शनिवारी होणाऱ्या मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडण्याची धमकी दिली म्हणे. पोर्तुगीज फुटबॉल संघटनेने व आता रोनाल्डोनेही त्याचा इन्कार केला. सान्तोस यांच्या पाठीशी संघटना तसेच संपूर्ण पोर्तुगाल उभा राहिल्याचे चित्र दिसले. याचवेळी क्रिकेटची एक महाशक्ती असलेल्या भारतालाबांगलादेशात सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. हातातून निसटलेला दुसरा सामना जिंकण्यासाठी मोडलेला अंगठा व त्यावर भलेमोठे बँडेज, अशा अवस्थेत कर्णधार रोहित शर्मा शेवटी मैदानावर आला व त्याने प्रयत्नांची शिकस्त केली. त्याच्या जिद्दीला सलाम. पण शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार त्याला मारता आले नाहीत.
भारत मालिका हरला. गेल्या महिन्यात टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडकडून दहा गडी राखून नामुष्कीजनक पराभव झाला. क्रिकेटरसिक हळहळले, संतापले. परंतु अपयशी खेळाडूंना रोनाल्डोसारखे बाहेर बसविण्याची हिंमत क्रिकेट नियामक मंडळाने दाखविली नाही. उलट, वर्ल्डकपमध्ये जोरदार कामगिरी केलेल्या सूर्यकुमार यादवला बांगलादेश दौऱ्यातून वगळले. पोर्तुगालचे फुटबॉल कोच सान्तोस यांच्यासारखी हिंमत भारताच्या क्रिकेट प्रशिक्षकांना किंवा बीसीसीआयला का दाखवता येत नाही, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. अशी कल्पना करा, की सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा महेंद्रसिंग धोनीसारख्या स्टार खेळाडूला कामगिरीच्या आधारे सामन्यांतून वगळले किंवा बारावा खेळाडू म्हणून इतर खेळाडूंसाठी पाणी घेऊन मैदानावर पाठवले तर चाहत्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या.
हा एकूणच आपण आणि क्रीडा वैभवी देशांमधील जिंकण्याची विजिगिषू वृत्ती, शंभर टक्के व्यावसायिक दृष्टिकोनाचा फरक आहे. याचा अर्थ असे कधी घडले नाही. असे नाही. अनेकांना अडतीस वर्षांपूर्वीची, १९८४ मधील इंग्लंडविरुद्धची क्रिकेट मालिका आठवत असेल. एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कपिल देवला कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोलकता कसोटीतून वगळले होते. निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे व गावस्कर यांच्याविरुद्ध क्रिकेटप्रेमींचा संताप उफाळून आला होता. नो कपिल, नो टेस्ट, अशा घोषणा दिल्या गेल्या. परंतु असे प्रसंग भारतीय क्रीडा इतिहासात अपवादानेच, उलट क्रिकेटपटूच्या व्यक्तिपूजेचे प्रस्थ वाढत गेले. आपल्या लाडक्या खेळाडूंवर एका शब्दाची टीकादेखील सहन न करण्याइतपत त्या प्रेमाचा अतिरेक झाला.
दुसऱ्या बाजूला खेळाडूंकडून मैदानावरच्या कामगिरीत काही कमतरता राहिली की त्यांच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत काहींची मजल गेली. खेळाचा चाहता, रसिक म्हणून असे प्रेम किंवा संताप व्यक्त करायला हरकत नाही, परंतु त्यामुळे देशाचे, क्रीडा क्षेत्राचे, त्या विशिष्ट खेळाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. खेळाडू देखील माणसे आहेत आणि त्यांच्या अंगात देवी शक्ती वगैरे नसते, ते देखील चुकू शकतात किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी त्यांची कामगिरी खालावू शकते, हे लक्षात घेऊन रसिकांनी वागायला हवे. ते तसे वागले तरी या खेळांचा कारभार पाहणाऱ्या संघटना व संस्थांनी मात्र एक अत्यंत उच्च दर्जाची व्यावसायिकता अंगी बाळगणे देशासाठी गरजेचे असते. लोकांनी खेळाडूंचे महात्म्य वाढविले व त्यांना देव मानले तरी या संस्थांनी, प्रशिक्षकांनी मात्र कायम देशहित नजरेसमोर ठेवणे अपेक्षित असते.
पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी व फुटबॉल संघटनेने तसे केले म्हणून, त्यांना सलाम आणि तीन दिवसांनंतर का होईना प्रशिक्षकाचा तो अधिकार मान्य करून उडालेली धूळ खाली बसविणारी समंजस भूमिका घेतली म्हणून रोनाल्डोचेही कौतुक. अशाच गुणांमुळे खेळाडू दिग्गज बनतात. मैदानाबाहेरचा इतिहासही त्यांची योग्य ती नोंद घेतो. भावनेऐवजी व्यावसायिक दृष्टिकोन अंतिमतः एखाद्या देशाला क्रीडा वैभव मिळवून देतो.