चीन पुन्हा चर्चेत आहे. तिथे कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. तिथल्या ‘लॉकडाऊन’च्या विरोधात संतप्त मोर्चे निघाल्यानंतरच चीनमध्ये एवढे कडक ‘लॉकडाऊन’ असल्याचे जगाला समजले होते. चीनमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असून, सुमारे वीस लाख लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अर्थात, ही बाहेर आलेली बातमी. अधिकृतपणे चीन काहीच भाष्य करत नाही. आकडे लपविण्यासाठी आणि एकूणच बरेच काही लपविण्यासाठी चीनची ख्याती आहे. चीनच्या भिंती एवढ्या पोलादी आहेत की बाहेरच्या जगाला काहीच समजत नाही. पण, अशा गोष्टी लपविल्याने धोका कमी होत नाही, उलटपक्षी वाढतो.
२०१९मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आणि तो जगभर पसरला. जागतिकीकरणानंतर काहीच स्थानिक राहात नाही. मग ती माहिती असो की विषाणू. आता पुन्हा जगभर असा उद्रेक झाला तर काय होईल, या काळजीने जगाची झोप उडाली आहे. चीनच्या शांघाय आणि अन्य काही शहरांमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ८५ ते ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या असून, रुग्णांवर जमिनीवर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या कमी झाली आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. चीन सरकार काहीच बोलत नाही. मात्र, सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होणारे व्हिडीओ धक्कादायक आहेत. तीन महिन्यांत स्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यांत चीनमधील सुमारे ८ कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकते, असे भाकीत अभ्यासकांनी केले आहे. तिथली स्थिती भयंकर आहे. कोरोना पसरल्यामुळे चीनमधील रस्ते ओस पडले आहेत. चीन सरकारने अगोदरच लॉकडाउन लागू केले आहे. शांघाय रेल्वे स्थानकावर आणि विमानतळावर नागरिकांची गर्दी उसळली आहे. दुसऱ्या शहरात लोकांचे पलायन होत असून, प्रामुख्याने शांघायमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने जगाचे अर्थकारण कोलमडले. आता कुठे जग पूर्वपदावर येत असताना, चीनमधील ही बातमी काळजी वाढविणारी आहे. अर्थात, आता ‘कोरोना’वर पुरेसे संशोधन झाले आहे. त्यामुळे तशी हानी होणार नाही. मात्र, सावध राहावे लागणार आहे.
चीनमध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता अदर पूनावाला यांनी जे म्हटले आहे, ते महत्त्वाचे आहे. ‘चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोरोना पुन्हा वाढत आहे, हे चिंताजनक आहे. पण आपली यशस्वी लसीकरण मोहीम आणि आजवरचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून आपण नियमांचे पालन केले पाहिजे,’ असे पूनावाला यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे की, कोरोना अजूनही संपलेला नाही. कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहा. भारतातदेखील पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या आरोग्य मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमध्ये आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, भारत आपल्या पाच टप्प्यांच्या उपाययोजनेच्या माध्यमातून संसर्ग रोखण्यासाठी सक्षम आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण आणि कोविडसंबंधीच्या नियमांचे पालन करून हा संसर्ग आटोक्यात ठेवता येऊ शकतो. त्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. मात्र, स्वस्थ बसूनही चालणार नाही. त्यावर योग्य त्या उपाययोजनाही केल्या पाहिजेत. चीन, हाँगकाँग, जर्मनी, जपान, ब्राझील, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. त्याचा वेग चिंता करण्यासारखाच आहे. गेल्या सात दिवसांत दहा हजार मृत्यू झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिवांच्या मते, सर्व पॉझिटिव्ह केसेसचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करायला हवे. व्हेरिएंट कोणते आहेत, हे त्यामुळे समजू शकेल. भीती हे कोरोनावरचे उत्तर नाही. योग्य दक्षता आणि उपाययोजना हाच खरा मार्ग आहे. काळजी करायची नाही हे खरे असले तरी काळजी घ्यावी लागणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण सज्ज झालेले असताना, कोरोना येत असल्याच्या बातम्या येत आहेत. येणारा काळ आपली पुन्हा परीक्षा घेणार आहे.