भाकरी आणि भूकंप! शरद पवारांच्या निवृत्तीमागे शह-काटशहाचे राजकारण तर नाही ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 05:38 AM2023-05-03T05:38:54+5:302023-05-03T05:39:52+5:30

शरद पवारांच्या राजकीय चालींना नेहमी ‘कात्रजचा घाट’ अशी उपमा दिली जाते. समाजकारणाचा विचार केला तर पंढरीच्या वारीच्या वाटेवरील पवित्र दिवेघाटाचीही उपमा वापरता येईल.

Editorial on NCP President Sharad Pawar's retirement Annoucement and Politics in Party | भाकरी आणि भूकंप! शरद पवारांच्या निवृत्तीमागे शह-काटशहाचे राजकारण तर नाही ना...

भाकरी आणि भूकंप! शरद पवारांच्या निवृत्तीमागे शह-काटशहाचे राजकारण तर नाही ना...

googlenewsNext

पंधरा दिवसांत दोन राजकीय भूकंप होतील, असा जो दावा अनेक जण करीत होते, त्यापैकी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा हा पहिला भूकंप म्हणावा लागेल. चोवीस वर्षांपूर्वी याच मे महिन्यात श्रीमती सोनिया गांधी यांच्या विदेशातील जन्माचा मुद्दा उपस्थित केला म्हणून शरद पवार, पी. ए. संगमा व तारिक अन्वर या तीन नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. वीसेक दिवसांत तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाने नवा पक्ष स्थापन केला. कालपरवापर्यंत या पक्षाला राष्ट्रीय दर्जा असला तरी प्रत्यक्षात पवारांचा महाराष्ट्र व संगमांचा मेघालय या दोन राज्यांमध्येच प्रामुख्याने त्याचे अस्तित्व राहिले. तारिक अन्वर यांच्या बिहारमध्ये तो रुजला नाही. पवारांच्या प्रभावामुळे कधी गोवा, कधी गुजरात, कधी केरळ विधानसभेत राष्ट्रवादीने प्रवेश केला खरा. परंतु, केवळ प्रतिनिधित्वापुरताच. या मर्यादेमुळेच पक्षाला लोकसभेत कधी दोन आकडी खासदार निवडून पाठवता आले नाहीत.

२००४ च्या निवडणुकीत ७१ जागा ही राष्ट्रवादीची महाराष्ट्रातील पक्षाची सर्वोच्च कामगिरी राहिली. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगली कामगिरी नोंदविणाऱ्या राष्ट्रवादीला मुंबई व विदर्भात मजबूत पाय रोवता आले नाहीत. अर्थात, मर्यादा असूनही शरद पवार हेच इतकी वर्षे दिल्लीतील महाराष्ट्राची ओळख आहेत. राजकीय डावपेच व प्रशासकीय कौशल्य अशा दुहेरी वैशिष्ट्यांच्या नेत्यांची तगडी फळी राष्ट्रवादीने दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्वत: शरद पवारांनी चारवेळा भूषविले आणि ते पद भूषवू शकतील, असे डझनभर नेते राष्ट्रवादीत आहेत. तथापि, काव्यगत न्याय असा की आघाड्यांच्या राजकारणात या पक्षाला सतत उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री कोण ही चर्चा महिनाभर सुरू आहे. त्यावेळी चर्चेत आलेली ही नकोशी वहिवाट मोडण्यासाठी राष्ट्रवादीने, खुद्द थोरल्या पवारांनी किंवा गेलाबाजार अजित पवारांनी कंबर कसली की काय, अशी शंका शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे यावी. निवडणुकीच्या राजकारणापासून ते आधीच दूर आहेत. आता पक्षाध्यक्षपद सोडण्यामागे काही व्यूहरचना आहे, की ते खरेच समाजकारणाला अधिक वेळ देणार आहेत, हे लवकरच कळेल.

शरद पवारांच्या राजकीय चालींना नेहमी ‘कात्रजचा घाट’ अशी उपमा दिली जाते. समाजकारणाचा विचार केला तर पंढरीच्या वारीच्या वाटेवरील पवित्र दिवेघाटाचीही उपमा वापरता येईल. निवृत्तीच्या घोषणेचे राजकारण यातील कोणत्या घाटाने जाते हे पाहावे लागेल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये  ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी केलेला निवृत्तीचा गौप्यस्फोट उत्स्फूर्त नव्हताच. आपल्या निर्णयाची पृष्ठभूमी व कारणमीमांसा करणारे त्यांचे छापील भाषण घोषणेनंतर लगेच समाज माध्यमांवर उपलब्ध झाले. आधी त्यांनी भाकरी फिरविण्याचा इशारा दिला होता. याचा अर्थ ही घोषणा पूर्वनियोजित होती. तसे असेल तर त्यामागे आणखी काही नियोजनदेखील असावे. जणू त्यांना भाकरीच काय, चुलीचीही दिशा बदलायची होती.

आपल्या आश्चर्यजनक, अकस्मात व सामान्यांना आकलन न होणाऱ्या राजकीय डावपेचांसाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार विनाकारण काही करणार नाहीत. विशेषत: गेला महिनाभर त्यांचे पुतणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अतिसक्रियता, भाजपशी त्यांची कथित जवळीक पाहता या निवृत्तीमागे काही शह-काटशहाचे राजकारण तर नाही ना, अशी शंका येणे साहजिक आहे. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी प्रमुख नेत्यांची एक समिती पवारांनी सुचविली असली तरी अजित पवार हे त्या पदाचे प्रमुख दावेदार आहेत. तसेही ते शरद पवार यांच्यानंतरचे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेतच. विशेष म्हणजे पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेने धक्का बसलेले कार्यकर्ते-नेते एका सुरात निर्णय मागे घ्यावा, यासाठी विनवण्या करीत होते, अश्रू ढाळत होते. बाळासाहेब ठाकरे यांनीही अशीच घोषणा केली होती व नंतर माघार घेतली होती, याची आठवण संजय राऊत करून देत होते, तेव्हा अजित पवार मात्र ‘साहेब शब्दाचे पक्के आहेत, तेच पक्ष आहेत आणि त्यांच्या नजरेसमोर नवा अध्यक्ष निवडला जात असेल तर तुम्हाला नको आहे का?’, अशा शब्दात कार्यकर्त्यांना दटावत होते. तेव्हा, पक्षाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे दिले तर काय आणि पवार कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष निवडून नवी वाट चोखाळली तर काय, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एव्हाना  मंथन सुरूही झाले असेल.

Web Title: Editorial on NCP President Sharad Pawar's retirement Annoucement and Politics in Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.