बिहारमधील विषारी दारू प्रकरणाचे गांभीर्य वाढतच चालले आहे. छपरा येथे विषारी दारूचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८२ वर जाऊन पोहोचली आहे, तर २५ जणांची दृष्टी गेली आहे. अनेक जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. काही जणांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी भीतीपोटी घाईगर्दीत अंत्यसंस्कार उरकून टाकले. काहींच्या कुटुंबीयांनी थंडीचा प्रकोप अथवा कुठल्या तरी आजाराने मृत्यू झाल्याचे सांगितल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी जास्त असण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय सीवान येथे पाच, तर बेगुसराय येथेही एका जणाचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे विरोधी बाकांवर जाऊन बसावे लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या हाती आयतेच कोलीत लागले आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारला घेरण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. त्यातच कधीकाळी नितीशकुमार यांचे लाडके असलेले प्रशांत किशोर उपाख्य पीकेदेखील त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. अशावेळी सरकारच्या प्रमुखाने डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून परिस्थितीला सामोरे जाणे अभिप्रेत असते. एरवी त्यासाठी प्रसिद्ध असलेले नितीशकुमार राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात मात्र त्यांचा तो स्वभावधर्म विसरले की काय, असे वाटू लागले आहे. विषारी दारू प्राशन करून मृत्युमुखी पडलेल्यांना कसली द्यायची नुकसान भरपाई, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे परिस्थिती आणखीच चिघळली. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयताच दारूगोळा लागला. बिहारमध्ये राजकीय भूमी तयार करण्यासाठी झटत असलेल्या प्रशांत किशोर यांनी तर नितीशकुमार यांच्या विधानावरून त्यांना घेरण्यात अजिबात कसर सोडली नाही.
नितीशकुमार यांना असंवेदनशील व अहंकारी संबोधत, त्यांचा सर्वनाश निश्चित असल्याची भविष्यवाणीच प्रशांत किशोर यांनी करून टाकली. प्रशांत किशोर काय किंवा भाजप काय, ते बोलूनचालून नितीशकुमार यांचे राजकीय विरोधकच! त्यामुळे त्यांनी संधीचा फायदा घेतला यात नवल नाही; परंतु कोणताही सुबुद्ध मनुष्य नितीशकुमार यांच्या वक्तव्याचे समर्थन करू शकणार नाही. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली आहे. त्या निर्णयाचे गुजरातमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जे झाले तेच बिहारमध्येही झाले!
ज्यांच्या खिशात पैसा आहे, त्यांना हवी ती दारू हव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होते, फक्त पैसा तेवढा जास्त मोजावा लागतो! ज्यांच्या खिशात तेवढा पैसा नाही ते मग स्वस्तात नशा करण्याचे मार्ग शोधतात आणि त्यातूनच छपरासारखे प्रकरण घडते. गत जुलैमध्येच गुजरातमध्येही विषारी दारू प्राशन केल्याने ४० जणांना जीव गमवावा लागला होता. दारू पिणे वाईटच, विषारी दारू पिणे तर त्याहूनही वाईट! त्याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही; मात्र त्यामुळे नितीशकुमार यांचे वक्तव्य योग्य ठरत नाही. नुकसान भरपाईची मागणी विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांसाठी नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी होत आहे, ही वस्तुस्थिती नितीशकुमार यांनी ते विधान करण्यापूर्वी विचारात घ्यायला हवी होती. विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, हे उघड सत्य आहे; अन्यथा ते स्वस्त विषारी दारूच्या वाटेलाच गेले नसते. जास्त पैसे मोजून बिनविषारी दारू प्यायले असते. ती बिहारमध्ये हवी तिथे आणि हवी तेवढी उपलब्ध आहे, हे नितीशकुमार यांनाही चांगलेच ज्ञात असावे.
ज्यांनी नशेपुढे स्वत:च्या जीविताचीही फिकीर केली नाही, ते तर निजधामास गेले; पण त्यांच्यापैकी अनेकांवर त्यांचे कुटुंब सर्वार्थाने अवलंबून असेल. त्यामध्ये अनेक कच्चीबच्ची असतील, कधीच घराचा उंबरठा न ओलांडलेल्या माता-भगिनी असतील. कुटुंबातील कर्ता पुरुष अवचित निघून गेल्याने सैरभैर झालेल्या त्यांनी काय करावे? कुणाच्या तोंडाकडे बघावे? काळ कुणासाठी थांबत नसतो. कालौघात ती कुटुंबे सावरतीलही; पण त्यांना तातडीच्या गरजा भागविण्यासाठी, उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तरी, मदतीचा हात लागेल की नाही? तो कुणी द्यायचा? अशावेळी सरकारकडून अपेक्षा व्यक्त होणार नाही, तर कुणाकडून? कुण्या एका व्यक्तीने चूक केली म्हणून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून द्यायचे का? नितीशकुमार यांनी हा विचार करायला हवा होता. तो त्यांनी केला नाही म्हणून कुणी त्यांना असंवेदनशील संबोधत असेल, तर त्याला चूक कसे म्हणता येईल?