`बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 08:53 AM2022-02-26T08:53:40+5:302022-02-26T08:54:41+5:30

शांततामय सहजीवन ही कितीही सुंदर संकल्पना असली तरी, प्रत्यक्षात `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य असल्याचे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

editorial on russia ukraine crisis whos no is next china taiwan america un nato forces | `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी?

`बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी?

Next

‘‘आमचा देश वाचविण्यासाठी आम्हाला एकटं सोडून देण्यात आलंय. आमच्यासोबत लढायला कोण तयार आहे? प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, मला कुणीही दिसत नाही!’’ हे अगतिक उद्गार आहेत, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे! शांततामय सहजीवन ही कितीही सुंदर संकल्पना असली तरी, प्रत्यक्षात `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य असल्याचे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मनुष्य स्वत:ला इतर सजीवांच्या तुलनेत खूप प्रगत समजत असला तरी, जो शक्तिशाली तोच टिकेल, हे प्राणीजगतात लागू पडणारे तत्त्वच एकविसाव्या शतकातही मनुष्यजगतास देखील लागू पडत असल्याचेच ताज्या घटनाक्रमामुळे सिद्ध झाले आहे. 

मनुष्य अजूनही आदिम अवस्थेतून बाहेर पडू शकला नसल्याचेच हे द्योतक! युद्धास तोंड फुटेपर्यंत युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा करणारी अमेरिका व तिचे मित्रदेश, युद्ध सुरू होताच युक्रेनला वाऱ्यावर सोडून मोकळे झाले. त्यामागेही भय ही आदिम प्रेरणाच कारणीभूत होती. विस्तारवादी, साम्राज्यवादी भूमिकांमुळे जगाने अत्यंत विध्वंसक अशी दोन महायुद्धे अनुभवली. त्यापासून धडा घेऊन मनुष्य यापुढे तरी शांततामय सहजीवनाचे तत्त्व अंगिकारेल, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरत आहे. ताज्या संघर्षाने त्यावर  शिक्कामोर्तब तर केलेच; पण हा संघर्ष निकटच्या भविष्यात इतरांसाठी प्रेरक ठरण्याची भीतीही निर्माण केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जग अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये विभाजित झाले. भारत, इजिप्त व युगोस्लाव्हियाच्या पुढाकाराने, त्या दोन्ही गटांशी संलग्न नसलेल्या देशांची अलिप्त राष्ट्र संघटना अस्तित्वात आली होती खरी; पण मुळातच त्या देशांची शक्ती खूप क्षीण होती. अमेरिका व रशिया या दोन्ही देशांच्या नेतृत्वाखालील गटांना एकमेकांविषयी जो भयगंड वाटत होता, त्यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धेस अतोनात चालना मिळाली, पण परस्परांविषयीच्या त्या भयगंडामुळेच तिसऱ्या महायुद्धास तोंड फुटले नाही, हेदेखील तेवढेच खरे! 

गत काही वर्षांत अमेरिकेच्या आर्थिक शक्तीस व जगभरातील प्रभावास जी ओहोटी लागली, त्याची परिणती अमेरिकेबद्दलचा धाक कमी होण्यात झाली. त्याचेच प्रतिबिंब अमेरिका व `नाटो’ देशांच्या इशाऱ्यांना भीक न घालता युक्रेनवर हल्ला चढविण्याच्या रशियाच्या निर्णयात उमटलेले दिसते. अमेरिका व `नाटो’ने काढता पाय घेतल्याने युक्रेन अगदी हतबल बनला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एक तर संपूर्ण युक्रेन रशियाचा भाग होऊन, अथवा त्याचे दोन तुकडे होऊन, युद्ध संपुष्टात येईल; पण अमेरिका व `नाटो’ची भीती बाळगण्याचे काही कारण नाही, हा जो संदेश गेला आहे, तो खूपच धोकादायक आहे. आजही जगातील काही विस्तारवादी शक्ती इतर देशांच्या भूभागांचा घास घेण्यास टपून बसल्या आहेत, अशा शक्तींना ताज्या घडामोडीमुळे चेव चढू शकतो. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे चीन व तैवान! गुरुवारीच चीनची नऊ लढाऊ विमाने आपल्या हवाई हद्दीत घुसल्याचा आरोप तैवानने केला. आतापर्यंत अमेरिका व `नाटो’ तैवानच्या मदतीला धावून येण्याच्या धास्तीमुळे चीनने लष्करी बळाचा वापर करून तैवान बळकावला नव्हता; पण आता चीन किती काळ कळ काढेल, याची शंकाच वाटते. त्याशिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेने जपानसारख्या ज्या पराभूत देशांना सुरक्षा पुरविण्याचे करार केले होते, त्यांनी आता अमेरिकेवर कितपत विसंबून राहावे, हादेखील प्रश्नच आहे. 

शिवाय युक्रेन घशात घातल्यावर पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघातून फुटून निघालेल्या आणखी काही देशांकडे रशियाची नजर वक्र होण्याचा धोकाही आहेच! चीनच्या सीमेवरील आगळीकींना आणि हिंद महासागरातील विस्तारवादी धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिकेवर आणि `क्वाड’वर कितपत अवलंबून राहायचे, याचा निर्णय भारतालादेखील घ्यावा लागेल. बांगलादेश युद्धाच्यावेळी सोव्हिएत रशियाने भारतासोबतच्या मैत्री कराराचे पालन करीत, भारताला संपूर्ण राजकीय व लष्करी समर्थन दिले होते. अमेरिकेने युक्रेनला सोडले, तसे वाऱ्यावर सोडले नव्हते! गत काही वर्षांपासून भारत-रशिया मैत्रीत अंतर पडत आहे आणि भारत-अमेरिका जवळीक वाढत आहे; मात्र युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नेतृत्वाला उभय महाशक्तींसोबतच्या द्पिवक्षीय संबंधांचा आढावा घ्यावा लागेल. एकंदरीत निकट भविष्यात जगाच्या भौगोलिक-राजकीय चित्रात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: editorial on russia ukraine crisis whos no is next china taiwan america un nato forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.