दारे-खिडक्या गच्च लावलेल्या बंद खोलीत डोळ्यात बोट घातले तरी दिसू नये, अशा अंधारल्या अस्वस्थतेशीच कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन, टाळेबंदीच्या वर्षपूर्तीची तुलना करावी लागेल. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचे जेमतेम पाचशे रुग्ण व पन्नास बळी असताना, जगात ज्या वेगाने ही महामारी पसरत होती, तिचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार २२ तारखेला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी सायंकाळी राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली तर पंतप्रधानांनी २४ तारखेच्या मध्यरात्रीपासून एकवीस दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले.
एकशे अडतीस कोटी लोकसंख्येच्या देशात सामान्य जनजीवन तीन आठवडे ठप्प झाले. “हे एकवीस दिवस संयम बाळगला की आपण विषाणूवर विजय मिळविलाच समजा,” अशी खात्री पंतप्रधानांसह सगळ्यांनीच दिलेली असल्याने तो पहिला टप्पा कोट्यवधींनी अक्षरश: साजरा केला. पण, तो विजय अजूनही दृष्टिपथात नाही. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी लॉकडाऊनची आवर्तने झाली. नंतर अनलॉक किंवा बीगिन अगेनच्या नावाने तेच निर्बंध पुन्हा पुन्हा लादले गेले. ...आणि आता पहिल्या लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या वेळी देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. लाखो, कोट्यवधींसाठी एखादे दु:स्वप्न ठरावे असे हे वर्ष गेले. अनेकांच्या हाताचे काम गेले, उपासमारीची वेळ आली, पडेल ते काम करण्यासाठी घरातल्या स्त्रीयांनाही बाहेर पडावे लागले. पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान एप्रिल महिना कसाबसा निघाल्यानंतर लाखो, कोट्यवधी स्थलांतरित मजुरांनी रोजगार देणारी शहरे सोडली आणि पायी, सायकल किंवा मिळेल त्या वाहनांनी आपली गावे गाठली. दरम्यान, सुखवस्तू या व्याख्येचे तपशील बदलले. ताज्या अहवालानुसार, भारतात वर्षभरात जवळपास सव्वातीन कोटी लाेक मध्यमवर्गातून गरिबीच्या खाईत लोटले गेले. दिवसाला जेमतेम दीडशे रुपये कमावणाऱ्यांची संख्या साडेसात कोटींनी वाढली. छाेटेमोठे व्यवसाय अडचणीत आले. उद्योगांमधील उत्पादनांना फटका बसला.
मार्च महिना तर गेल्या वर्षीच्या मार्चपेक्षा चिंताजनक स्थितीत पोचला. बहुतेक गावे, शहरे, राज्य व देशाच्या पातळीवर ऑगस्ट-सप्टेंबरमधील नव्या रुग्णांचे आकडे विक्रम ओलांडते झाले. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध असताना, लोकांना या विषाणूच्या संक्रमणाविषयी बऱ्यापैकी माहिती झालेली असताना वाढणारे हे संक्रमण म्हणजे महामारीची दुसरी लाट आहे. हा नवा विषाणू आधीच्यापेक्षा कमी बळी घेणारा आहे, असे सुरुवातीला वाटत होते. परंतु, आता बळींचे आकडेही वाढू लागले आहेत. अशा विषाणूजन्य रोगांच्या साथीची दुसरी लाट पहिलीपेक्षा अधिक तीव्र असते, हा अनुभव पुन्हा येऊ लागला आहे. हा असा श्वास कोंडून टाकणारा, जबरदस्तीचा एकांतवास देणारा, निद्रानाशाचे कारण ठरणारा, पोटापाण्याची चिंता वाढविणारा, मुलाबाळांच्या भविष्याविषयी हळवे बनविणारा लॉकडाऊनचा अंधार शारीरिक व मानसिक आजाराचे कारण ठरला नसता तरच नवल. तरीदेखील, महामारीच्या पहिल्या दिवसापासून उच्चारले जाणारे, “या विषाणूसोबतच आयुष्य काढायचे आहे,” हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. या वर्षाने सगळीकडे अंधार व नैराश्यच पसरवले असे नाही. प्रत्येकाला आयुष्याची, भावभावनांची, मानवी नातेसंबंधांची, जीविका व स्वप्ने, आशाआकांक्षांची फेरमांडणी करायला लावली. त्यात अंधारात कवडसे वाटावेत असे बरेच सकारात्मकही आहे. व्यवस्थेच्या पातळीवर गेल्यावर्षी १६ मार्चपर्यंतच्या ९ हजार कोरोना चाचण्यांच्या तुलनेत आता रोज जवळपास ९ लाख चाचण्या, विषाणूच्या संक्रमणाची तपासणी करणाऱ्या शंभर प्रयोगशाळांच्या जागी जवळपास अडीच हजार लॅबची व्यवस्था, वर्षभरात जवळजवळ साडेतीन कोटी लोकांची चाचणी अन् गेल्या १६ जानेवारीपासून गेल्या रविवारपर्यंत साडेचार कोटी लोकांचे लसीकरण, अशा बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत.
आरोग्य, तंत्रज्ञान, ओटीटी प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स वगैरे नवी क्षेत्रे विकसित होऊ लागली आहेत. काही लोक बेफिकीर असले तरी बव्हंशी सगळ्यांना महासंकटाचे गांभीर्य समजले आहे. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन लोक एकमेकांना आधार देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत आपण “जग जवळ आले” असे म्हणत होतो. कोरोना महामारीने “माणूस जवळ आला” असे म्हणता येईल. ही जवळीक अधिक घट्ट करावी लागेल. तरच विषाणूच्या फैलावाची दुसरी लाट व एकूणच या संकटाचा सामना सुसह्य होईल.