भारताशी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या भडका उडाला आहे. पोलीस आणि लष्कर एकमेकांविरोधात उभे ठाकले असून, त्याचे यापुढील काळात भयंकर परिणाम होऊ शकतील. हे सध्या केवळ सिंध प्रांतात घडत असले तरी शेजारच्या पंजाब, पाकव्याप्त काश्मीर गिलगिट, बलुचिस्तान येथेही हा आगडोंब पसरू शकतो. तसे झाल्यास पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीलाच सुरुंग लागेल. सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीमध्ये झालेले स्फोट हे तेथील वातावरणाचे निदर्शक असले तरी स्थिती त्याहून वाईट आहे. सिंधमध्ये भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची सत्ता आहे; पण पाक लष्कराने सरकार उलथून पाडल्यात जमा आहे आणि गव्हर्नरच्या बंगल्यापाशी शेकडो लष्करी जवान तैनात आहेत. लष्कराने पोलीस ठाण्यांचाही ताबा घेतला आहे आणि लष्कराच्या या कृतीच्या विरोधात पोलीस आक्रमक झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी कराचीच्या पोलीसप्रमुखांचेच लष्कराने पहाटे चार वाजता त्यांच्या घरात घुसून अपहरण केले आणि त्यांच्याकडून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या जावयाच्या अटकेच्या आदेशावर बळजबरीने सही घेतली. त्याआधी आणि नंतर पोलीस आणि लष्कर आमने-सामने आले, त्यांच्यात गोळीबार झाला, त्यात किमान १० जण मरण पावले. पोलीसप्रमुखांच्या अपहरणामुळे संतप्त झालेल्या तब्बल ७० पोलिसांनी सामूहिक रजेवर जाण्याची घोषणा केली, तर काहींनी राजीनामे देऊ केले. परिस्थिती फारच चिघळत चालल्याचे पाहून लष्करप्रमुख बाजवा यांनी अपहरण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही सामूहिक रजेचा निर्णय पुढे ढकलला आहे; पण सध्या तेथील रस्त्यांवर पोलीस नव्हे, तर लष्कराचेच साम्राज्य आहे. याचे कारण इम्रान खान सरकारविरोधात लोक हजारो आणि लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यांना पोलिसांची सहानुभूती आहे, असे इम्रान खान आणि लष्कराला वाटते. पण वाढती महागाई, अन्नधान्याची टंचाई, बेकारी आणि कोरोनामुळे निर्माण झालेली नवनवी संकटे यामुळे केवळ सिंध नव्हे, तर पाकिस्तानच्या सर्व प्रांतात संताप आहे. नवाझ शरीफ, बिलावल भुट्टो यांच्यासह १४ पक्षांनी एकत्र येऊन इम्रान सरकारला आव्हानच दिले आहे. त्यामुळेच हे आव्हान मोडून काढण्यासाठी इम्रान खान यांनी लष्कराचा आसरा घेतला आहे. अर्थात, इम्रान खान पंतप्रधान असले तरी देशाची सारी सूत्रे आजही लष्कराच्या हातातच आहेत.
इम्रान खान यांना विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते, असे विधान मध्यंतरी लष्करप्रमुखांनी केले होते. आता तर इम्रान खान पाकिस्तानी लष्कर आणि चीन यांच्या हातातील बाहुलेच बनले आहेत. त्यांना सत्ता हातात ठेवण्यासाठी लष्कराची आणि आर्थिक मदतीसाठी चीनची गरज आहे. चीन वगळता कोणत्याही देशाचा पाकिस्तानवर विश्वास नाही आणि दहशतवादी कारवाया तेथूनच चालतात, यावर सर्व देशांचे एकमत आहे. पंजाब, बलुचिस्तान, गिलगिट आणि एकूणच पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान सरकारविरोधात कमालीचा असंतोष आहे. आता तर लष्कराचा सिंध प्रांतातील जवानांवरही विश्वास राहिल्याचे दिसत नाही. सीमेवरून सिंधमधील जवानांना हलवून तिथे अन्य प्रांतातील जवान तैनात करण्याची तयारी सुरू झाली आहे. कराचीमध्ये इतका असंतोष आहे की लोक सरकारी वाहने, कार्यालये यांची नासधूस करीत आहेत, मॉल लुटत आहेत आणि परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अशावेळी नेहमीप्रमाणे ‘या घटनांत भारताचा हात आहे’ अशी ओरड इम्रान आणि त्यांचे सहकारी सुरू करतील, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सीमेवर गडबड करू शकतील, अशी शक्यता भारतातील माजी लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यात तथ्यही आहे. त्यामुळे पाकिस्तानातील विस्फोटक स्थितीबद्दल आपण आनंद व्यक्त करण्याचे कारण नाही, किंबहुना अधिक सावध राहण्याची ही वेळ आहे. शिवाय इम्रान खान यांना हटवून लष्कराने पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली, तर शेजारी राष्ट्र म्हणून आपल्या अडचणीत भरच पडेल. त्या तुलनेत इम्रान खान, नवाझ शरीफ वा भुट्टो यांचा पक्ष आपल्यासाठी दगडापेक्षा वीट मऊ ठरू शकतात.