‘टू ओपन द पँडोराज बॉक्स’ अशी एक म्हण इंग्रजी भाषेत आहे. तिचे मूळ ग्रीक पुराणकथांमध्ये आहे. पँडोरा या जगातील पहिल्या स्त्रीने एक पेटी उघडली आणि त्यामधून मानवजातीला आजतागायत चटके देत असलेली शारीरिक व मानसिक दुःखे बाहेर पडली, अशी ती कथा आहे. एकदा सुरू झाली की अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना जन्म देणारी प्रक्रिया, असा अर्थ असलेल्या म्हणीचा उगम त्या कथेतूनच झाला. ‘पँडोरा पेपर्स’ या नावाने समोर आलेल्या दस्तावेजांमुळे जगातील अनेक बड्या धेंडांना ती म्हण नक्कीच आठवली असेल. पाच वर्षांपूर्वी ‘पनामा पेपर्स’ प्रकरण बरेच गाजले होते. तब्बल ११.५ दशलक्ष गोपनीय दस्तावेज पनामा पेपर्स या नावाने ३ एप्रिल २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. धनाढ्य मंडळी कशा प्रकारे करचुकवेगिरी करते, याचा भंडाफोड त्या माध्यमातून झाला होता. पँडोरा पेपर्स हे त्याच प्रकारचे प्रकरण आहे. जगभरातील शोधपत्रकारांचा समावेश असलेल्या अमेरिकास्थित इंटरनॅशनल कन्साॅर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (आयसीआयजे) या संस्थेने हा भंडाफोड केला आहे.
‘आयसीआयजे’ने उघडकीस आणलेल्या दस्तावेजांमुळे अनेक देशांमधील आजी व माजी सत्ताधारी, उद्योगपती, सेलिब्रेटीज तसेच गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, किरण मजुमदार शॉ, नीरव मोदी, नीरा राडिया इत्यादी नामवंत लोकांसह एकूण ३८० भारतीयांचाही समावेश आहे. मालमत्ता दडविणे, अवैध मार्गांनी कमाई करणे, करचुकवेगिरीसाठी अवैध मार्गाने देशाबाहेर गुंतवणूक करणे अशा प्रकारचे कारनामे जगभरातील बड्या धेंडांनी केल्याचे आयसीआयजेने उघडकीस आणलेले दस्तावेज सांगतात. अर्थात सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी अशा काही जणांनी लगोलग त्याचा इन्कार केला आहे. आपली देशाबाहेर गुंतवणूक असली तरी ती वैध मार्गाने केली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ज्या देशांमध्ये करांचे प्रमाण मोठे आहे, त्या देशांमधील धनाढ्य मंडळी कर चुकविण्यासाठी ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करतात, हे एक उघड सत्य आहे. स्वित्झर्लंड हे टॅक्स हेवन देशांमधील सर्वात मोठे नाव. त्याशिवाय पनामा, सिंगापूर, लक्झेम्बर्ग, बर्म्युडा, ब्रिटिश वर्जिन आयलंड्स, नेदरलँड्स इत्यादी देशांची नावेही त्यासंदर्भात चर्चेत असतात.
धनाढ्य लोक त्यांचा पैसा शेल कंपन्या किंवा ट्रस्टच्या माध्यमातून टॅक्स हेवन देशांमध्ये पाठवतात आणि स्वदेशात भराव्या लागणाऱ्या करापासून मुक्तता मिळवतात. कधी कर्जदार अर्थसंस्थांना चकविण्यासाठीही पैसा देशाबाहेर धाडला जातो. कधी धूर्त राजकारणीही असा पैसा विदेशातून परत आणून भारताला पुन्हा एकदा ‘सोने कि चिडिया’ बनविण्याचे स्वप्न दाखवतात; पण अशी स्वप्ने आजवर तरी पूर्ण झालेली नाहीत. पँडोरा पेपर्सच्या माध्यमातून पहिल्यांदाच धनाढ्यांचे आर्थिक व्यवहार अथवा गैरव्यवहार उघडकीस आले आहेत असे नव्हे. यापूर्वीही पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स, ऑफशोअर लिक्स इत्यादी माध्यमांमधून असे व्यवहार उघडकीस आले होते. त्याचे पुढे काय झाले? विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी इत्यादी बडी धेंडे भारतातील बँकांना अब्जावधी रुपयांचा चुना लावून विदेशांमध्ये सुखनैव आयुष्य जगत आहेतच ना? त्यांनी टॅक्स हेवन देशांमध्येच तर त्यांचा पैसा दडविला आहे. त्यामुळे, पँडोरा पेपर्सच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचे दस्तावेज उघडकीस आले म्हणून अथवा भारत सरकारने हातोहात या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा केली म्हणून, बड्या धेंडांना चाप लागेल, विदेशात दडवून ठेवलेला पैसा भारतात परत येईल, असे स्वप्नरंजन करण्यात काही अर्थ नाही.
आणखी काही दिवस या प्रकरणाची प्रसारमाध्यमांमधून चर्चा होईल आणि मग पनामा पेपर्सचा जसा विसर पडला, तसा या प्रकरणाचाही विसर पडेल. ‘पैसा सब कुछ नही’ अशी एक म्हण हिंदी भाषेत आहे. ‘पैसा सब कुछ नही, लेकिन बहोत कुछ है’ असा त्या म्हणीचा नर्मविनोदी प्रतिवादही कधी कधी केला जातो. देशात चांगल्या मार्गाने कमावलेला पैसा कर वाचविण्यासाठी अथवा वाईट मार्गाने कमावलेला पैसा कायद्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी विदेशात धाडणाऱ्या धनाढ्यांचे काहीही बिघडत नाही हे बघून त्या म्हणीपेक्षा तिचा प्रतिवादच मनाला पटू लागतो. ‘पँडोरा’ने मानवजातीला छळणाऱ्या दुःखांची पेटी उघडली होती की नाही, हे माहीत नाही; परंतु असे कितीही ‘पँडोरा पेपर्स’ प्रसिद्ध झाले तरी बड्या धेंडांसाठी ‘पँडोराज बॉक्स’ काही उघडत नाही, हे मात्र नक्की!