शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

पी. के. काय करणार..?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 8:24 AM

Prashant kishore : चित्रपटाप्रमाणेच एक नवा पी.के. (प्रशांत किशोर) राजकीय पटावर विविध शक्यता व्यक्त करतो. तो अंदाजही बांधतो. त्यासाठी सामुदायिक मानवी वर्तनाचा, सरकारकडून मतदारांच्या अपेक्षांचा आणि विविध राजकीय पक्ष तसेच जातीय-धार्मिक समुदायांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करतो.

पी.के. चित्रपटातील नायक आमीर खान परग्रहावरून येतो आणि पृथ्वीतलावरील मानवी व्यवहारातील विरोधाभास पाहून अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. नकळत आपणही अशा अनेक गोष्टी करत असतो, याच्या जाणिवेने प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडतो. तसाच एक नवा पी.के. (प्रशांत किशोर) राजकीय पटावर विविध शक्यता व्यक्त करतो. तो अंदाजही बांधतो. त्यासाठी सामुदायिक मानवी वर्तनाचा, सरकारकडून मतदारांच्या अपेक्षांचा आणि विविध राजकीय पक्ष तसेच जातीय-धार्मिक समुदायांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करतो. २०१७ मध्ये प्रशांत किशोर यांनी (पी.के.) काँग्रेस पक्षाबरोबर काम करीत उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरविली आणि ती पूर्णत: फसली होती. त्याला काँग्रेसचे नेतृत्व आणि संघटन पातळीवरील कामाला दोष दिला जातो.

पंजाबमध्ये काँग्रेस, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस पक्ष, तामिळनाडूत द्रमुक, बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि २०१४च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपबरोबर प्रशांत किशोर यांनी व्यूहरचनाकार म्हणून काम केले आहे. अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेसह पाच राज्य विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाबरोबर सुमारे दोन वर्षे काम करून या पक्षाला दणदणीत यश मिळवून दिले. दहा वर्षांच्या सत्तेनंतर ममता बॅनर्जी यांचा विजय होणार नाही, शिवाय भाजपने पूर्ण ताकद लावून धार्मिक   ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला होता. भाजपचे पारडे जड आहे, असे वाटत असताना तृणमूल काँग्रेसच विजयी होईल, दोनशेहून अधिक  जागा मिळतील आणि भाजपला शंभरपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला होता. 

निवडणुका सुरू होताच बंगाली भाषा, माणूस तसेच संस्कृतीचा विषय मुख्य प्रचार प्रवाहात आणण्याची त्यांची नीती योग्य ठरली. तेव्हापासून प्रशांत किशोर यांची चर्चा जोरदार होऊ लागली. शिवाय त्यांनी बंगालचा अंदाज चुकला तर व्यूहरचना आखून देण्याचा व्यवसाय सोडून देण्याची घोषणाही केली होती. राजकीय नेत्यांपेक्षा प्रशांत किशोर यांच्याच मुलाखती अधिक गाजत होत्या. बिहार राज्यातून आलेले प्रशांत किशोर यांनी आपली राजकीय विचारधारा कधी स्पष्ट केलेली नाही. भाजप, काँग्रेस, जनता दलासह अनेक राजकीय पक्षांसाठी त्यांनी काम केले असल्याने त्यांच्या राजकीय मताविषयी जनतेच्या मनात संभ्रमच आहे. ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरून त्यांनी अलीकडे अनेक राजकीय नेत्यांशी चर्चा करण्याचा सपाटा लावला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आदींशी चर्चा केली; पण कोणत्या पक्षासाठी, कोणत्या निवडणुकीसाठी व्यूहरचनाकार म्हणून काम करणार याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे पी. के. (प्रशांत किशोर) नेमके काय करू आणि काय साध्य करू इच्छितात, हे स्पष्ट होत नाही. 

गांधी कुटुंबीयांना भेटताच ते काँग्रेस पक्षात सामील होतील, अशा वावड्या उठल्या, शरद पवार यांच्याशी तीन बैठका केल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतिपदासाठी त्यांना विरोधी पक्षांचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास भाग पाडण्यात येईल, अशी चर्चा झाली. काँग्रेस पक्षात सामील होणे आणि राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता  पवार यांनी फेटाळली आहे. आता पी.के. काय करणार? निवडणुकीतील व्यूहरचना, त्यातील पक्षांची भूमिका निश्चित करणे, त्याआधारे त्या पक्षाला विजयापर्यंत पोहोचविण्यास मदत करणे, आदी गोष्टी मागे पडून पी.के. थेट राजकारणात उडी घेणार का? यापूर्वी त्यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता. त्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही त्यांना देण्यात आले होते. परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावरील पी. के. यांची भूमिका न पटल्याने नितीशकुमार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. ते भाजपविरोधी आहेत, असेदेखील स्पष्ट वाटत नाही. 

काँग्रेस पक्षात जाण्यापेक्षा व्यूहरचनाकार म्हणून काम केल्याने त्यांच्या मतास अधिक मूल्य राहील. पी. के. यांच्या नावाचा आज जो दबदबा आहे, तो निवडणुकीचे व्यूहरचनाकार म्हणून. ती भूमिका महत्त्वपूर्ण आहे; पण एखादी अभ्यासू व्यक्ती आपली राजकीय मते बनवून समाजासाठी किंवा देशासाठी ठरावीक भूमिका घेऊ शकते. एकेकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेल्या सुधींद्र कुलकर्णी भाजपमध्ये प्रवेश करून वरिष्ठ पातळीवर धोरणनिश्चितीचे कार्य करीत होते.  पी.के. यापुढे काय करणार याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरPoliticsराजकारणElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा