सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!
By किरण अग्रवाल | Published: August 18, 2024 02:18 PM2024-08-18T14:18:55+5:302024-08-18T14:19:25+5:30
नेत्यांच्या दौऱ्यातुन पक्षीय सक्रियता, लोकहिताच्या मुद्यांवर श्रेयवाद रंगण्याची चिन्हे
किरण अग्रवाल
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तारखांची प्रतीक्षा असताना विविध पक्षीय नेत्यांचे दौरे वाढून गेल्याने राजकीय तापमान वाढून जाणे स्वाभाविक आहे. ही सर्वपक्षीय राजकीय सक्रियता मतदारांच्या उपयोगी किती पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
विधानसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते तयारीला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून सध्या सर्वत्र नेत्यांचे दौरे व राजकीय कार्यक्रम वाढीस लागले असून घोषणा व आश्वासनांचा पाऊस बरसू लागला आहे. खानदेशातही तेच होताना दिसत आहे.
जळगाव येथे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा मेळावा पार पडला, यास मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजित पवार यांनी हजेरी लावून 'अपप्रचार करणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहण्याचा सल्ला' देत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. जळगावच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी व विस्तारित एमआयडीसीला मान्यता, यासह नारपारचे पाणी कोणी अडवू शकणार नाही आदी घोषणा झाल्या. यावर काँग्रेसने लगेच पत्रकार परिषद घेत या घोषणा फसवणूक करणाऱ्या असल्याची भूमिका मांडली. जळगावातील रस्त्यांसाठी या अगोदर आलेले कोट्यवधी रुपये कसे खड्ड्यातच गेलेत व खड्डे आहेत तसे कायम राहिलेत, हा विषयही यानिमित्ताने चर्चेत आला. पण असो, नेत्यांचे दौरे आणि घोषणांचा सुकाळू यापुढील काळात अधिक बघायला मिळणार आहे. विविध योजना व प्रकल्पांना आता मंजूरी मिळू लागल्याने त्याच्याही श्रेयवादाचे ढोल बडवले जाऊ लागले आहेत. ही आगामी निवडणुकांची नांदीच म्हणायला हवी.
उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस अगोदर अमळनेरलाही येऊन गेले. त्यावेळी त्यांच्या राष्ट्रवादीतीलच काही लोकांनी खासगीत नाके मुरडली होती म्हणे. जिल्ह्याचे ठिकाण सोडून अमळनेरातच त्यांनी कार्यक्रम का घेतला असा त्यांचा प्रश्न होता. बरे, तेथे अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यात दिलजमायी झाल्याचे कितीही बोलले जात असले तरी पवार यांना घरी चहाला बोलावून स्वतः साहेबराव पाटीलच घरी थांबले नव्हते. त्यामुळे चहा न घेताच अजितदादांना परतावे लागले होते. यातून कार्यकर्त्यांना जो संदेश मिळायचा तो मिळून गेला. शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यादेखील जळगावी मेळावा घेऊन गेल्या. ठाकरे सेनेचे नेते खा. संजय राऊत देखील येणार आहेत. या तुलनेत भाजपाची तयारी काहीशी कमी वाटत होती, पण खानदेशातील पक्षीय वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणे निश्चित आहे.
धुळे जिल्ह्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदे हे गोंदूर विमानतळावर उतरले, पण धुळ्याला न थांबता सरळ साक्रीला गेले. तेथे आयोजित कार्यक्रमात महायुतीसोबत असलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी अधिकृतरित्या शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांना साक्री मतदारसंघातून शिंदेसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याचे कयास लावले जात आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने धुळे शहरात येऊन गेले. त्यांनी महिला मेळावा आणि पॉवरलूम कामगारांना संबोधित केले. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातच हा कार्यक्रम झाल्याने ही जागा महायुतीच्या अजित पवार गटाला मिळू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पण महायुतीचे घटक असूनही या दोन्ही कार्यक्रमांपासून भाजपाचे स्थानिक नेते मंडळी लांबच राहिलेली दिसून आली, त्यामुळे पुढच्या काळात उपमुख्यमंत्री फडणवीस किंवा अन्य भाजपा नेते जिल्ह्यात येऊ शकतात. काँग्रेसला खासदारकीची लॉटरी लागल्यानंतर हा पक्षही फार्मात असून, उद्धव सेनेच्या हालचाली स्पष्ट व्हायच्या आहेत. तेव्हा आगामी काळात कोण काय भुमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नंदुरबारमध्येही झेंडावंदनाच्या निमित्ताने पालकमंत्री अनिल पाटील आलेले होते, त्यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक विषयक चर्चा केली; तर तत्पूर्वी ठाकरे सेनेचे कैलास पाटील यांनीही येऊन चाचपणी केली आहे. केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांनी भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला आहे. लवकरच मुख्यमंत्री शिंदे नंदुरबार दौऱ्यावरही येत आहेत. थोडक्यात सारेच पक्ष कामाला भिडले आहेत.
सारांशात, वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय परिघावरील वातावरण ढवळून निघत आहे. आणखी काही दिवसात हा गलबला वाढेल, नित्य नव्या घोषणा होतील आणि आरोप प्रत्यारोपही वाढतील. यात मतदार राजा संभ्रमित होऊ नये म्हणजे झाले.