अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तब्बल साडेअकरा वर्षांनंतर पुण्याच्या सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोन मारेकऱ्यांना जन्मठेप सुनावली. तथापि, हत्येचा कथित म्होरक्या व सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे तसेच हिंदू विधिज्ञ संघटनेचे संजीव पुनाळेकर व विक्रम भावे हे तिघे सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले आहेत. आधी महाराष्ट्राचे पोलिस, नंतर दहशतवादविरोधी पथक तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयच्या तपासात कथित म्होरक्या व सूत्रधारांचे पुरावे मिळवता आले नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निकालाचे स्वागत करतानाच तावडे व इतर दोघे सुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दाभोलकरांची कन्या मुक्ता हिने तावडे व इतरांना निर्दोष सोडण्याच्या निकालाला आव्हान देण्यात येईल असे म्हटले आहे. या प्रतिक्रिया पाहता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या एका काळ्याकुट्ट हत्यासत्रातील पहिला निकाल थोडासा दिलासादायक असला तरी संपूर्ण न्याय म्हणता येणार नाही. तरीदेखील दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल पाहता एक बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे, की मारेकऱ्यांचे दाभोलकरांशी वैयक्तिक शत्रुत्व अजिबात नव्हते. वैचारिक मतभेद हेच हत्येमागील कारण होते. दाभोलकरांचे वय, त्यांची वैचारिक बैठक, त्यांचे कार्य आणि अगदी खुनाची पद्धत असे सगळ्या बाबतीत ज्यांच्याशी साम्य, साधर्म्य आहे ते कॉम्रेड गोविंद पानसरे किंवा एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्याशीही हल्लेखोरांचे वैयक्तिक शत्रुत्व नसावे. हल्लेखोर व त्यांच्या सूत्रधारांच्या नजरेत या मंडळींचा गुन्हा इतकाच होता, की ते धर्माची कठोर चिकित्सा करीत होते. अतार्किक व चमत्कारी गोष्टींचा पर्दाफाश करीत होते. त्याआधारे समाजात फोफावणाऱ्या अंधश्रद्धा व त्यातून शोषणाच्या विरोधात जनजागृतीचे व्रत त्यांनी हाती घेतले होते. भारतीय राज्यघटनेचा पाया असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन व बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रह धरीत होते. थोडक्यात, समाजाला धर्मांधतेपासून दूर ठेवण्याचा आणि जनमानसात विवेक रुजविण्याचा प्रयत्न करीत होते. पानसरे व कलबुर्गी थोडे अधिक पुढे गेले होते.
पानसरेंनी ‘शिवाजी कोण होता?’, हे पुस्तक लिहून छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचे वेगळे पैलू पुढे आणले, सामान्य रयतेसोबतची त्यांची नाळ अधोरेखित केली. तर कलबुर्गींनी बंडखोर महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीचे सच्चे सार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळात शिवाजी महाराज व बसवेश्वरांच्या नावाने उभ्या राहिलेल्या झुंडींना व त्यांच्या हातून होणाऱ्या कर्मकांडांना पानसरे, कलबुर्गींच्या प्रबोधनाने धक्का बसला. ज्यांची दुकाने कर्मकांड व थोतांडावर उभी असतात अशांना हे सारे रुचणारे नव्हते व नाही. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी तसेच संतपरंपरेने आखून दिलेल्या वाटेवर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आदी समाजसुधारकांनी प्रशस्त केलेल्या रस्त्याने निघालेले, प्रबोधनाची पताका खांद्यावर घेतलेले अनेकजण या धर्मांध मंडळींचे शत्रू बनले. एरव्ही विचारांची लढाई विचारानेच लढायची असते, अशी सुभाषिते सांगणाऱ्या मंडळींनी हे शत्रू शस्त्राने टिपण्यासाठी कट रचले. दुचाकीवर आलेले हल्लेखाेर, अगदी जवळून झाडलेल्या गोळ्या अशा सारख्या पद्धतीने एकापाठोपाठ एक असे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांना जेमतेम दोन वर्षांच्या कालावधीत संपविले गेले. या हत्यांमधून स्पष्ट दिसत होते, की चौघांनाही सुनियोजितपणे टिपण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार पहिल्या हत्येनंतर खडबडून जागे झाले असते व दाभोलकरांचे मारेकरी, हत्येचे सूत्रधार वेळीच पकडले गेले असते तर बाकीचे तिघे वाचले असते. तसे झाले नाही. उलट कर्नाटक पोलिसांच्या सक्रियतेमुळे दाभोलकर, पानसरेंच्या हत्येचे धागेदोरे गवसले. तरीदेखील दोषारोपपत्रातील सर्व आरोपींच्या कृत्याचे पुरावे जमा झाले नाहीत. हा निकाल व सध्या सुरू असलेले अन्य तिघांच्या हत्येचे खटले बाजूला ठेवून एक बाब नक्की आहे, की प्रबोधनकारांची शरीरे अशी नष्ट केल्याने विचार कधीच संपत नाहीत. किंबहुना ते अधिक उफाळून येतात. विचारांचे आयुष्य वाढत जाते. ७८ व्या वर्षी छातीवर गोळ्या झेलणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांनी तेच सिद्ध झाले. ६८ वर्षांचे दाभोलकर, ८० वर्षांचे पानसरे, ७६ वर्षांचे कलबुर्गी किंवा साठीकडे झुकलेल्या गौरी लंकेश ही म्हातारी माणसे शरीराने आपल्यात नसली तरी त्यांच्या बलिदानाने प्रबळ झालेले विवेकी विचार पुढची अनेक युगे समाजाचे रक्षण करीत राहतील.