राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार केल्याने मकरसंक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसवरच संक्रांत आली आहे. या पक्षाचेच वजनदार मंत्री नबाव मलिक यांच्या जावयांना अमली पदार्थाच्या व्यवहारात अटक करण्यात आली आहे. दोन्ही मंत्री या पक्षात अनेक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे, तडफदारपणे काम करणारे म्हणून ओळखले जातात. परिणामी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. माजी खासदार किरीट सौमय्या यांनी निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठून मुंडे यांनी दुसरा विवाह केल्याची आणि त्या महिलेपासून दोन अपत्ये झाल्याची माहिती लपविल्याचा आरोप करीत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे . आरोप-प्रत्यारोपाने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. याची राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता कमी आहे; पण सार्वजनिक जीवनातील प्रसिद्ध व्यक्तींच्या वर्तनाची तसेच नैतिक-अनैतिक प्रश्नांची चर्चा होणार आहे.
धनंजय मुंडे यांनी दुसरा विवाह केल्याचा दावा केलेला नाही. माझे संबंधित महिलेशी परस्पर सहमतीने संबंध होते. शिवाय तिच्यापासून दोन अपत्ये असल्याची कबुली दिली आहे. विवाह न केल्याने त्याची माहिती निवडणूक लढविताना देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्या महिलेपासून झालेली अपत्ये आपली आहेत. त्यांना आपलेच नाव दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही माहिती मात्र धनंजय मुंडे यांनी लपविली आहे. ज्या महिलेशी मुंडे यांचे संबंध आहेत, तिची कोणतीही तक्रार नाही. असे असले तरी धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे तिच्यापासून संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.
मुंडे यांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेच्या बहिणीने केला आहे. अशा पद्धतीचा अत्याचार अनेक वर्षे आणि अनेकवेळा होत असला तर त्या-त्या प्रसंगी तक्रार का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ही ब्लॅकमेलिंगसाठी करण्यात आलेली तक्रार असल्याचा पवित्रा धनंजय मुंडे यांना घेतला आहे. तिच्या तक्रारीनुसार आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार पोलीस खात्याकडून चौकशी व्हावीच लागेल. बलात्काराचा आरोप धनंजय मुंडे यांनी नाकारल्यावर ते सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रारदार महिलेवर येणार आहे. तो सिद्ध करण्यासाठी पुरावा कसा देणार हा प्रश्न उपस्थित होतो. राजकीय शक्तीने प्रभावी असणाऱ्या व्यक्ती गैरफायदा घेण्याची आणि अशा प्रभावी शक्ती समाजजीवनात स्वत:च्या प्रतिमेला जपत असल्याने काही व्यक्ती त्यांचाही गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेत जाहीर भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात कायदेशीर पातळीवर अनेक घडामोडी होत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांसाठी शरद पवार यांना याची गांभीर्याने नोंद घ्यावीच लागणार आहे. हा सर्व वाद चालू असतानाच भाजपचेच नेते कृष्णा हेगडे यांनी याच तक्रारदार तरुणीने आपणासही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाने भाजपच्या मागणीतील हवा निघून जाणार आहे.
आता प्रश्न राहता तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा आणि आमदारकीच्या वैधतेचा. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रकरणाची ही काही पहिली वेळ नाही. विविध राज्यांतही वरिष्ठ राजकारण्यांबाबत अशा तक्रारी झाल्या आहेत. अशा तक्रारीवर आपला समाज कायदेशीर बाबींपेक्षा नैतिकतेच्या भूमिकेतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतो. त्यामुळेच हेगडे यांच्या आरोपानंतर महिलांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहण्याच्या प्रश्नावरही संक्रांत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी ज्या महिलेवर अत्याचार होतात, तिला न्याय मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या प्रकरणातील संशयित आरोपी वरिष्ठ राजकीय नेता असल्याने त्याचे महत्त्व अधिक गडद होते आहे. त्यातून राजकारण साधता येईल का, याचीही संधी सर्वच पक्षीय नेते शोधत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच आता पक्षाची प्रतिमा सांभाळण्यासाठी भूमिका घ्यावी लागणार आहे, तशी त्यांनी घेतली आहे. धनंजय मुंडे यांनाही कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे. यातून या सत्ताधारी पक्षावर संक्रांत आली, हे मात्र निश्चित!