अन्यायाविरुद्ध संघर्ष हा आमचा नारा आहे, त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट उपसण्याची तयारी आहे, अशा निर्धाराने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे नेतृत्व करणारे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक नेते प्रा. नारायण ज्ञानदेव ऊर्फ एन. डी. पाटील थांबले. अखेरचा श्वास घेईपर्यंत मी कष्टकरी माणसांसाठी लढतच राहणार, असा उल्लेख अलीकडे स्मृतिभ्रंश झाला तरी एन. डी. भेटणाऱ्यांजवळ करत असत. त्यांचे जीवन म्हणजे सामाजिक न्यायासाठीची अखंड जीवननिष्ठा होती. वयाच्या नव्वदाव्या वर्षीदेखील वाचन, मनन, चिंतन आणि न्याय्य हक्कासाठी लढा देण्याची ऊर्मी बाळगून असलेले ते नेते होते. त्यांनी सत्तेचे राजकारण कधी केले नाही. अनेक निवडणुका लढविल्या, पण हार-जीत महत्त्वाची मानली नाही. लोकशाहीत राजकारण अधिकाधिक मूल्याधिष्ठ व्हावे, यासाठी निवडणुका हादेखील आंदोलनाचाच एक भाग आहे, अशी मांडणी ते करीत.महाराष्ट्र विधानसभेच्या १९८५ च्या निवडणुकीत कोल्हापूरच्या गांधी मैदानावरील सभेत लाखभर लोकांसमोर अखंड सव्वातीन तास त्यांचे भाषण झाले होते. संपूर्ण महाराष्ट्राची वाटचाल आणि पुढील दिशा त्यांनी मांडली होती. विचाराची बैठक स्पष्ट होती. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर समाजाच्या परिवर्तनासाठी आहे, यावर त्यांची ठाम निष्ठा होती. त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन संघर्ष केला. सहकारात शिरलेल्या अपप्रवृत्तींविरुद्धचा लढा, सेझ उभारताना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील लढा, कोल्हापूरचा टोलविरोधी लढा, मोफत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे, अंधश्रद्धा, शेतीमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांना माफक दरात वीजपुरवठा; अशा अनेक लढ्यांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. सहकारी साखर कारखाने कवडीमाेल किमतीत विकले जात होेते. त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एन. डी. पाटील हा एकमेव नेता रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहिला. त्यांच्या आंदोलनामुळे काही साखर कारखाने सहकारात टिकून राहिले.सेझची संकल्पना आली तेव्हा हजारो एकर शेतजमीन काढून घेऊन रयतेला भूमिहीन करण्याविरुद्ध एन. डी. पाटील यांनी मोठा संघर्ष उभा करून हे कट-कारस्थान हाणून पाडले. एनडींचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळीचा. सारे कुुटुंब अशिक्षित होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या संपर्कात ते आले आणि सारे आयुष्य बदलून गेले. कमवा व शिका योजनेतून शिक्षण पूर्ण केले. कर्मवीरांच्या तत्त्वानुसार शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा विडा उचलला. जीवनाच्या अखेरपर्यंत एक पैशाचेही मानधन न घेता रयत शिक्षण संस्थेत कार्यकारिणी सदस्य ते चेअरमन पदापर्यंत काम केले. राजकारणातही साधनशुचिता पाळली. अठरा वर्षे विधानपरिषदेवर आणि पाच वर्षे विधानसभेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद मंत्रिमंडळात ते सहकार खात्याचे मंत्री होते. त्यांच्या पुढाकारानेच विदर्भ-मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कापूस एकाधिकार योजना लागू केली गेली.विधिमंडळात विरोधी बाकांवरून जनतेचा आवाज म्हणजे एन. डी. पाटील होते. त्यांच्या नैतिक दबदब्यामुळे कितीही मोठा नेता असला तरी, एनडींच्या विरोधात बोलण्याची हिंमत करत नसे. अर्थशास्त्र आणि इंग्रजीचे विद्यार्थी असलेल्या सरांचे वाचन अफाट होते. त्यांचे लिखाण देखील सतत चालू असायचे. मुंबईचे डाव्या पक्षाचे कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा दस्तावेज मांडताना मोठा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथासाठी चाळीस पानांची सविस्तर प्रस्तावना एन. डी. पाटील यांनी लिहिली आहे. ती प्रस्तावना म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची संपूर्ण पूर्वपीठिकाच आहे.राजकीय नेते सामाजिक सुधारणेच्या चळवळीपासून फटकून वागतात. त्याला एन. डी. अपवाद होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक सामाजिक चळवळीत ते आघाडीवर होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सलग चाळीस वर्षे अध्यक्ष हाेते. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाबद्दल त्यांना प्रचंड संताप होता. सत्ता, संपत्ती आणि साधनांच्या मोहापासून दूर असणारे एन. डी. यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर श्रद्धा असणाऱ्या एनडींनी पुरस्कारांचा सर्व निधी जागच्या जागीच सामाजिक कार्यासाठी वाटून टाकला. त्यांचे सीमा आंदोलनासाठीचे योगदान कधीही विसरता येणार नाही. हा प्रश्न सुटला नाही, याची खंत जखम म्हणून मला साेबत घेऊन जावी लागेल, असे अखेरच्या काळात ते नेहमी म्हणत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
एन. डी. पाटील! सर्वसामन्यांसाठी लढणारं वादळ अखेर विसावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:39 AM