महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे युती सरकार सत्तेवर असले तरी त्यावर भाजपचा वरचश्मा आहे. सगळी महत्त्वाची खाती, मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. हे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यात सेनेचा समावेश नव्हता. बरेच दिवस विनवण्या व मनधरणी केल्यानंतर सेनेचे चार मंत्री त्या सरकारात घेतले गेले व त्यांना अत्यंत कमी महत्त्वाची पदे मिळतील याची काळजी घेतली गेली. लोकसभेच्या परवाच्या निवडणुकीत सेनेने भाजपला अडवून जास्तीच्या जागा मागून घेतल्या. परिणामी तिचे १८ खासदार लोकसभेत निवडून गेले. तरीही मोदींनी आपल्या सरकारात त्या पक्षाला एकच मंत्रीपद दिले व तेही (बाळासाहेबांच्या भाषेत) रिकाम्या बॅगा घेऊन फिरण्याचे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभेच्या येत्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत असेल तर आपण तिची कीवच केलेली बरी.
सेनेला विधानसभेच्या जास्तीच्या जागा एखादवेळी मिळतील (तशीही त्या साऱ्या जागा लढविण्याची तयारी भाजपने केली आहे. त्या पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा त्यांच्या परवाच्या मुंबई भेटीत तसे म्हणालेही आहेत.) त्यामुळे सेनेने मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणे आणि आदित्य ठाकरे यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून महाराष्ट्रभर त्याची जाहिरात करीत फिरणे हे सगळेच कमालीचे हास्यास्पद झाले आहे. सेना हा प्रादेशिक पक्ष आहे. त्याला भौगोलिक मर्यादा आहे. भाजपला तिच्या सामर्थ्याची व ते आपल्या मदतीवाचून निवडून येत नाही याची चांगली खात्री आहे. एका प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्षाला गृहीत धरून त्याला आपल्या अटी सांगणे हा प्रकारच विनोदी व गमतीचा आहे. तरीही त्याची कुणी थट्टा केली नाही व करणार नाही. लहान मुलांच्या प्रत्येकच कृतीचे जसे कौतुक होते तसे कौतुक सेनेच्या वाट्याला आले. त्यातून कुणी कोणती स्वप्ने पाहावी यावर कुणाचे बंधन नाही. तरीही या बालिश प्रकाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मीच उद्याचा मुख्यमंत्री असेन, मी भाजपचाही असेन आणि सेनेचाही असेन’ असे साऱ्यांना स्पष्टपणे सांगून टाकले आहे. त्यावर सेनेची प्रतिक्रिया आली नाही, ती येणारही नाही.
युती वा आघाडीतील दुय्यम दर्जाच्या पक्षाने तसेच वागायचे असते. मोदी व शहा हे सत्ताकांक्षेने केवढे पछाडले आहेत हे देश जाणतो. हातून गेलेली राज्ये जमेल त्या प्रकाराने ताब्यात आणण्यासाठी सारे बरेवाईट करणारी ही माणसे महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातून जाऊ देईल असे ज्यांना वाटते त्यांच्या कल्पनाशक्तीचे आपण कौतुकच केले पाहिजे. मात्र काही का असेना स्वप्ने आणि कल्पनारंजन अनेकांना थोडेसे बळ देत असते. विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतात, कुपोषणाने होणारे बालमृत्यू विदर्भातच का होतात, सारा मराठवाडा भरपावसाळ्यातही तहानलेला का राहतो, तेथील धरणे सारीच्या सारी कशी आटतात आणि एवढे सारे होऊनही या प्रदेशातील माणसे शांत व स्थिर का असतात याची जरी ओळख सेनेला यामुळे पटली तर ते या दौऱ्याचे फार मोठे फलित ठरेल. अडचण एवढीच की हा दौरा पंख लावून व आकाशात उडत राहून होऊ नये. तो जमिनीवरचे वास्तव पाहत व्हावा. सेनेच्या या उड्डाणाची माहिती मिळाल्यानेच कदाचित भाजपनेही आपली राज्यभराची यात्रा परवा घोषित केली.
राहता राहिले काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष. त्या बिचाऱ्यांना त्यांचे घर अजून सावरता आले नाही. त्यातले नेते कोण, अनुयायी कोण आणि त्यात अखेरचा शब्द कुणाचा हेही जनतेला अद्याप समजले नाही. असो. निवडणुकीपर्यंत त्यांनाही या विषयाचे भान येईल अशी आशा बाळगून आपण येणाऱ्या लढतीकडे पाहू या. या साऱ्या स्पर्धेत भाजप आघाडीवर, काँग्रेस व राष्ट्रवादी अजून रेषेवर तर शिवसेना अद्याप हवेत आहे. येत्या काळात यातील कोणता पक्ष पुढे जातो व कोणते मागे राहतात हे दिसेल. तथापि, सेनेने केलेली यात्रेची तयारी साऱ्यांचे कुतूहल जागविणारी व करमणूक करणारी आहे.