शहरं
Join us  
Trending Stories
1
'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका
2
कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! संदीप घोष याच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता,फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार
3
इक्बालसिंह चहल यांची पुन्हा बदली; आता देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यात मोठी जबाबदारी
4
वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी...
5
गांगुलीच्या लेकीची न्यायासाठी 'दादा'गिरी! अत्याचाराच्या घटनेनं संताप; म्हणाली, "काहीही झालं तरी..."
6
अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ! दररोज ९० घटना; ममता बॅनर्जींचे PM मोदींना खरमरीत पत्र
7
"सायकल चालवल्यामुळे 'तिथे' दुखापत झाली"; पीडितेच्या कुटुंबियांनी रिपोर्ट दाखवल्यावर शाळेने सांगितले होते कारण
8
"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी   
9
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?
10
Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! 'बिग बॉस मराठी ५'चा नवा विक्रम
11
आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचा दावा.. विरोधकांची टीका...आता CM शिंदेंनी कोर्टाचे पेपरच दाखवले
12
मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!
13
पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल
14
कोणत्या धर्माच्या लोकांनी केलं सर्वाधिक स्थलांतर? कितव्या क्रमांकावर आहेत हिंदू? जाणून घ्या
15
"तुझ्यासोबत हा शेवटचा सिनेमा", असं अक्षय कुमार करीना कपूरला का म्हणाला?
16
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत
17
नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...
18
"दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोले यांचं आवाहन  
19
मंदिरातील घंटा वाजवल्याने ध्वनिप्रदूषण! प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोसायटीला बजावली नोटिस
20
फक्त १ दिवस बाकी! क्रिकेटपटूंच्या महागड्या वस्तूंचा लिलाव; अनाथ मुलांसाठी मदतीचा हात

मुस्लीम महिलांच्या पोटगीचा न्यायालयीन प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 6:47 AM

मुस्लीम महिलांना पोटगीचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सध्या चर्चा होत आहे. न्यायालयाचे असे निरीक्षण पहिल्यांदाच आलेले नाही.

ॲड. डाॅ. खुशालचंद बाहेती

निवृत्त सहायक पोलिस आयुक्त व महाव्यवस्थापक- जनसंपर्क लोकमत

‘सीआरपीसी’च्या कलम १२५ (भारतीय नागरी सुरक्षा संहिता १४४- महिला, बालक, पालकांचे भरण पोषण) अंतर्गत विवाहित मुस्लीम महिलेला पोटगीचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. परंतु न्यायालयाचे असे निरीक्षण पहिल्यांदाच आलेले नाही. शाहबानो प्रकरणानंतर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा याच धर्तीवर आदेश दिले आहेत. अशाच काही निर्णयाचा हा आढावा..

१९८५ मध्ये शाहबानो खटला म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. एकमताने दिलेल्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने ‘सीआरपीसी’ कलम १२५ मधील पोटगीची तरतूद धर्मनिरपेक्ष असून, ती मुस्लीम महिलांनाही लागू असल्याचा निर्णय दिला.

या निकालाकडे काही घटकांकडून धार्मिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक कायद्यांवरील आघात म्हणून पाहिले गेले. मुस्लीम महिला कायदा, १९८६ अंमलात आणून हा निकाल निरस्त करण्यात आला. या कायद्याने मुस्लीम महिलांचा भरण-पोषणाचा अधिकार घटस्फोटानंतर ९० दिवसांच्या इद्दत कालावधीपर्यंत मर्यादित करण्यात आला.

२००१ मध्ये, या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला (डॅनियल लतिफी वि. भारत सरकार) सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने या कायद्याची वैधता कायम ठेवली. तथापि, १९८६च्या कायद्यानुसार घटस्फोटित पत्नीची देखभाल करण्याची मुस्लीम पतीची जबाबदारी केवळ इद्दत कालावधीपुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

२००७ मध्ये ‘इक्बाल बानो विरुद्ध उत्तर प्रदेश’ या खटल्यात मुस्लीम महिला सीआरपीसी कलम १२५ अंतर्गत याचिका करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यानंतर दोन वर्षांनी, ‘शबाना बानो विरुद्ध इम्रान खान’ प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या खंडपीठाने असे ठरवले की घटस्फोटित मुस्लीम महिला इद्दत कालावधी संपल्यानंतर पुनर्विवाह करत नाही तोपर्यंत सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत पतीकडून भरण-पोषणाचा दावा करण्यास पात्र आहे.

‘शमीमा फारुकी विरुद्ध शाहीद खान’ (२०१५) मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित मुस्लीम महिलेचा भरण-पोषणासाठी सीआरपीसी कलम १२५ याचिकेचा अधिकार आहे म्हणणारा कौटुंबिक न्यायालयाचा हायकोर्टाने रद्द केलेला आदेश अवैध ठरवला व कुटुंब न्यायालयाचा आदेश पुनर्स्थापित केला.

सन २०१९ मध्ये न्यायमूर्ती ए. अमानुल्ला यांनी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना मुस्लीम महिलेची पोटगीची याचिका फेटाळणारा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करत मुस्लीम महिलेला भरणपोषणासाठी १९८६चा कायदा व सीआरपीसी अंतर्गत पर्याय निवडण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले. जर त्या महिलेने सीआरपीसी निवडले तर ती घटस्फोटित मुस्लीम महिला आहे म्हणून तिला या कायद्यानुसार प्रतिबंधित करता येणार नाही, असेही कोर्ट म्हणाले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘शकिला खातून विरुद्ध उ. प्र. (२०२३) मध्ये म्हटले की, घटस्फोटित मुस्लीम महिला सीआरपीसी कलम १२५ नुसार इद्दतनंतरच्या कालावधीसाठी आणि तिच्या संपूर्ण आयुष्यासाठी भरण-पोषणाचा दावा करण्यास पात्र आहे. जोपर्यंत ती दुसरा विवाह करत नाही तोपर्यंत ती अपात्र ठरत नाही.

‘रझिया विरुद्ध उ. प्र.’ (२०२२), मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले, घटस्फोटित मुस्लीम महिला पुनर्विवाह करत नाही तोपर्यंत इद्दत कालावधी संपल्यानंतरही पतीकडून भरण-पोषणाचा दावा करण्यास पात्र असेल.

‘अर्शिया रिझवी वि. उ. प्र’ (२०२२) मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले की, मुस्लीम महिला तिच्या गरजा भागवण्यासाठी पतीकडून भरण-पोषणाचा दावा करू शकते. केरळ उच्च न्यायालयाने ‘नौशाद फुल्लिश वि. अखिला नौशाद’ (२०२३) मध्ये ठरवले की ‘खुला’ घोषित करून घटस्फोट घेणारी मुस्लीम पत्नी ‘खुला’ लागू केल्यानंतर सीआरपीसी कलम १२५ अंतर्गत तिच्या पतीकडून भरण-पोषणाचा दावा करू शकत नाही.

‘मुजीब रहिमन विरुद्ध थस्लीना’ (२०२२)मध्ये केरळ हायकोर्टाने निर्णय दिला आहे की, घटस्फोटित मुस्लीम महिला जोपर्यंत तिला मुस्लीम महिला कायदा, १९८६ अंतर्गत सवलत मिळत नाही तोपर्यंत सीआरपीसी कलम १२५ अंतर्गत भरण-पोषण मागू शकते.

आता पुन्हा सुप्रीम कोर्टाने पोटगी ही भीक नसून अधिकार आहे. पोटगीची तरतूद धर्मनिरपेक्ष आहे व ती वैयक्तिक कायद्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय