डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे जगभर प्रसिद्धी पावलेले चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी गेल्याच आठवड्यात ‘ऑक्सफर्ड डिबेट’मध्ये सहभागी होण्यास नकार दिला, तेव्हा त्याच्या बातम्या झाल्या. विवेक २०२२ साली ऑक्सफर्डमधील एका कार्यक्रमात सहभागी होणार होते, तेव्हा ऐनवेळी तो कार्यक्रमच रद्द केला गेला हे आपणास ठाऊक आहे काय? कारण?- मूठभर पाकिस्तान्यांनी त्या कार्यक्रमाला विरोध केला होता.
विवेक अग्निहोत्री यांना ऑक्सफर्डमध्ये पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केले गेले. ‘सभागृहाचा स्वतंत्र काश्मीर राज्यावर विश्वास आहे’ (द हाऊस बिलिव्हज् इन ॲन इंडिपेंडन्ट स्टेट ऑफ काश्मीर) हा चर्चेचा विषय होता. अशा एकतर्फी विषयावरील चर्चेत सहभागी होण्याचे आमंत्रण कुणा भारतीयाने का स्वीकारावे? जम्मू- काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे हे सगळ्या विश्वाला ठाऊक आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील आणि पाकिस्तानकडून चीनला गैरमार्गाने भेट म्हणून दिलेल्या काश्मीरचा भागही भारताचे अभिन्न अंग असताना अशा प्रकारच्या विषयावर चर्चा आयोजित करण्याचा प्रश्नच खरे तर उद्भवत नाही.
विवेक यांनी ऑक्सफर्डला योग्य असे उत्तर दिले. त्यांनी म्हटले, ‘चर्चेचा विषय भारताच्या सार्वभौमत्वाला सरळ सरळ आव्हान असून, मला ते मान्य नाही. हा विषय केवळ स्वीकारता तर येणारच नाही, शिवाय तो अपमानजनक आहे!’
... काश्मीर हा चर्चेचा नव्हे तर मानवी दृष्टीकोनातून त्रासदायक विषय आहे. बौद्धिक खेळ करून ऑक्सफर्डने आमच्या जखमा पुन्हा उघड्या करू नयेत, असेही त्यांनी म्हटले.
विवेक यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. ऑक्सफर्डच नव्हे तर जगातील कुठल्याही विद्यापीठाचे / देशाचे सभागृह जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडण्याची केवळ भाषा जरी करीत असेल तरी आपल्याला ती कदापि मंजूर असता कामा नये. ऑक्सफर्डच्या बाबतीत बोलायचे तर मनात असा प्रश्न येतो की, खुद्द ब्रिटनमधील परिस्थिती चांगली नाही. तो देश भीषण समस्यांचा सामना करत आहे. बेरोजगारी, आर्थिक संकट आणि आरोग्य सेवांमधील उणिवांशी सगळा देश लढतो आहे. यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून कशाला पाहावे?
थंड हवेच्या ब्रिटनमध्ये काश्मीरवरून वातावरण का तापले, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ त्याच्या अदृश्य मालकाची भाषा बोलणारा पोपट झाले आहे काय? ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ नीतीचा जमाना आता गेला हे ब्रिटनला समजले पाहिजे. अशा उचापतीपासून आता त्याने दूर राहिले पाहिजे.
कलम ३७० रद्द केले गेले तेव्हा ऑक्सफर्डमध्येच चर्चा आयोजित केली गेली होती. ‘काश्मीरचे विशेषाधिकार काढून घ्यायला हवे होते काय?’ हा चर्चेचा विषय होता. चर्चेत भाजपचे जय पांडा आणि डाव्या पक्षाचे अलीकडेच निधन पावलेले नेते सीताराम येचुरी यांनी भाग घेतला होता. त्यावेळीच माझ्या मनात विचार आला होता की, अशा चर्चांमध्ये भारतीयांनी भाग तरी कशासाठी घ्यायचा?
एका लोकशाही देशाचा स्वतंत्र विचारांची बाजू घेणारा स्वतंत्र नागरिक म्हणून मी हे स्पष्ट करू इच्छितो, की प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे हे मला मान्य आहे; परंतु एखाद्या षडयंत्राचा भाग म्हणून चर्चा आयोजित केली असेल अशी शंका आली तर आपण जावे कशासाठी? विवेक यांना ज्या चर्चेसाठी बोलावले गेले होते त्यामध्ये पाकिस्तानच्याही कोण्या वक्त्याला आमंत्रण होते. या चर्चेच्या माध्यमातून काश्मीरप्रश्न वैश्विक चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न झाला असता हे उघडच होते. पाकिस्तानने चर्चेत भाग घेण्याचे वावडे आपल्याला असण्याचे कारण नाही. आक्षेप आहे तो चर्चेच्या विषयावर. भारत सरकारनेही अशा प्रकारच्या विषयांवर विरोध केला पाहिजे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आतापर्यंत ४० हजारहून अधिक बळी घेतले आहेत. एक संपूर्ण पिढी जन्माला येऊन तारुण्यात पोहोचली; परंतु तिने जग पाहिले नाही, शाळा पाहिली नाही, ना खेळाची मैदाने! चित्रपट त्यांना माहीत नाहीत. बालपण हिरावून घेणारा दहशतवाद त्यांच्यावर लादला गेला आहे. त्यांचे तारुण्य हिरावले गेले. महिलांना विधवा केले गेले, मातांची कूस उजाड केली गेली. - चर्चा करायचीच असेल तर यावर चर्चा ठेवा.
चीनमध्ये १० लाखांपेक्षा जास्त बिगरमुस्लीम हलाखीचे जीवन जगत आहेत. या विषयावर ऑक्सफर्ड चर्चा का आयोजित करत नाही? त्यांना केवळ काश्मीर का दिसते? चीनच्या गळ्यात गळा घातल्यामुळे ब्रिटन चीनच्या वाटेला जात नाही. उलट ऑक्सफर्डमध्ये ‘चायना फोरम’ मंच’ नावाची संस्था चालते.
कोणता देश काय करत आहे या विषयात मी जाऊ इच्छित नाही; परंतु भारताविरुद्ध सर्व प्रकारचे कट केले जात आहेत हे मात्र नक्की!
जगातील प्रगत देशांचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही, असे आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. त्यांच्याशी मी पूर्णत: सहमत आहे. ज्यांनी एकेकाळी भारतावर राज्य केले, त्याही देशाला मागे टाकून जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती बनण्याच्या दिशेने असलेली भारताची घोडदौड अनेकांच्या नजरेत सलते. आपल्या शेजाऱ्यांचा तर जळफळाट होतच असतो. म्हणून तर दहशतवादासारखी शस्त्रे वापरून भारताच्या रस्त्यात धोंडे घालण्याची चाल खेळली जाते... पण आता असल्या चालींना भारत बधणार नाही, हे जगाने ध्यानात ठेवावे!
इतिहास के पन्नों पर दफन हो गई त्रासदियां
ये नए दौर का भारत है हम न रुकेंगे, न हम झुकेंगे
मेरे प्यारे दुश्मनों...
हम तो अब आँख में आँख डालकर देखेंगे.