शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून आरंभ होत आहे. भक्ती, शक्ती आणि मुक्ती अशा त्रिगुणशक्तींची आदिम प्रेरणा असलेल्या आदिमायेचा जागर अनादी अनंत काळापासून मांडला जात असला तरी यंदाच्या जागराला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावरच राज्यभरातील देवालयांची दारंही उघडली जाणार असल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. या नवरात्रोत्सवास शारदीय म्हणण्याचे कारण एवढेच की, दुर्गापूजेचा हा उत्सव शरद ऋतूच्या आरंभी येतो. ऋतू परिवर्तनाचा हा कालखंड नवीन ऊर्जा, नवा उत्साह, नवी उमेद आणि नवी शक्ती प्रदान करणारा असतो. दुर्गा ही तर साक्षात शक्तीची प्रेरक मानली जाते. असुराचा विनाश करून सकळांचे जीवन सुखकारक करणारी शक्ती, अशीदेखील दुर्गेची महती सांगितली जाते. कोरोना विषाणूने समस्त मानवी जातीच्या अस्तित्वालाच आव्हान दिलेले असल्याने या संकटावर मात करण्याची प्रेरणा या आदिशक्तीकडून मिळावी, अशीच सर्वांची अपेक्षा आणि मनोकामना असणार.
आजवर अनेक संकटांवर आपण मात केली आहे. कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटे येतच असतात. गेल्या काही वर्षांपासून तर, संकटांची जणू मालिकाच सुरू आहे. नानाविध प्रकारचे विषाणूजन्य आजार, तौक्ते, निसर्ग, गुलाब यासारखी चक्रीवादळं, वर्णद्वेषातून उफाळणारा हिंसाचार, दहशतवाद, नक्षलवाद, प्रांतवादातून लाखो निष्पाप जीवांचे हकनाक बळी जाताहेत. जातीय, धार्मिक, राजकीय आणि भाषिक भेदाने सामाजिक सलोख्यालाच नख लावले जात असल्याने सध्याचे वर्तमान दिवसेंदिवस अस्वस्थ होत चालल्याचे जाणवते. अशा अस्वस्थ सामाजिक पर्यावरणात क्षणभर विसावा आणि मनशांती लाभेल अशा ठिकाणाचा शोध मंदिरांच्या पायऱ्यांवर थांबणार असेल तर, असे थांबे हवेतच.
कोरोनाच्या संकटाने ही जाणीव अधिकच गडद झाली आहे. औषधोपचार, सामाजिक अंतर आणि लसीकरण करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यात काही अंशी का, होईना आपण यशस्वी झालो असलो तरी हे संकट अजून पूर्णत: संपलेले नाही. कोरोनाच्या अदृश्य सापळ्यातून सुटका करून घेण्याचे आव्हान आज वाटते तितके सोपे नव्हते. या विषाणूच्या उगमापासून उपचारापर्यंत सगळे जग जणू अंधारातच चाचपडत होते. उपचाराची खात्रीशीर मात्रा हाती लागेपर्यंत या अदृश्य संकटाने लाखो जिवांचा बळी घेतलेला होता. शिवाय, संसर्गाच्या भीतीने सहजीवन सोडून सक्तीचा एकांतवास भोगावा लागल्याने अनेकांची मानसिकदृष्ट्या कोंडी झाली. मनुष्य हा तसाही समाज प्रिय प्राणी आहे. जगण्यासाठी त्याला जसा ऑक्सिजन हवा असतो, तसा अवतीभोवती माणसांचा गोतावळाही लागतो. घरकोंडी झालेली माणसं मानसिकदृष्ट्या विकलांग होतात, हा अनुभवही याच काळात आला.
एरवी दिवसभराच्या श्रमाने दमून-थकून गेलेली माणसं संध्याकाळ होताच घराकडचा रस्ता धरतात. मात्र, कोरोनाकाळात घराबाहेर पडण्यासाठीच धडपड करावी लागली. मानवी सहजीवन आणि समाज जीवनावर मर्यादा लादली गेली तर, किती नाना प्रकारची संकटे उभी राहू शकतात, हा नवा अनुभवही याच काळात जगभर आला. संकटकाळात जिथे विज्ञानाचे हात टेकतात, तिथे देवाचा धावा केला जातो म्हणतात. मात्र, या महामारीच्या काळात देवांचीही दारे बंद होती. त्यामुळे घरबसल्या केवळ मनोभावे धावा करण्याखेरीज भाविकांपुढे दुसरा पर्याय नव्हता. देवाचे अस्तित्व मानणाऱ्या आणि देव नाकारणाऱ्या आस्तिक-नास्तिकांचा झगडा, देवाधर्माच्या नावे होणारी लुबाडणूक, अंधश्रद्धा सोडली, तर, या अनामिक शक्तीच्या केवळ आभासाने लक्षावधी सश्रद्धांना मिळणारी मनशांती नाकारता येत नाही. टाळ्या, थाळ्या वाजवून जसा कोरोना गेला नाही, तसे धर्मस्थळे उघडूनही तो जाणार नाही, हे खरेच. परंतु घरकोंडी झालेल्या माणसांना मानसिक विसावा लाभण्यासाठी देवाची द्वारे उघडली जात असतील तर, त्यात वावगे काहीच नाही.
हा, या देवाच्या दारातूनच कोरोनाचा पुन्हा शिरकाव होणार नाही, याची दक्षता बाळगावी लागणार. ‘देव बघून घेईल’ या अंधविश्वासावर राहता कामा नये. कोरोनाच्या संकटातून आपला जीव वाचला, हीच देवाची कृपा मानून सर्वांचे उर्वरित आयुष्य सार्थकी लावणे, हीच खरी प्रार्थना होय. शारीरिक व्याधीवर आपण उपाय शोधला, आता मानसिक स्वास्थ्यासाठी देवाची दारेही उघडली जात आहेत. या निमित्ताने समस्त मानवजातीला नवी ऊर्जा, शक्ती प्राप्त होऊन कोरोनाचे कायमचे ‘सीमोल्लंघन’ घडो, हीच आदिशक्तीपुढे प्रार्थना !