- नंदकिशोर पाटील, कार्यकारी संपादक, लोकमत
मायकेल जॅक्सन या जग्विख्यात पॉपस्टारच्या सुमारे २४ वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमाचा करमणूक कर सरकारने माफ केल्याची बातमी वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. कोण हा मायकेल जॅक्सन? तो कधी आला होता, काय दिवे लावून गेला, सरकारने एवढी मेहरबानी का दाखवली, असे एक ना अनेक प्रश्न देखील अनेकांना पडले असतील. कारण, माफीची रक्कम थोडीथोडकी नव्हे तर चांगली पावणेचार कोटी एवढी बक्कळ आहे.मायकेल जॅक्सन हा नामांकित पॉपस्टार आहे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. हल्ली हा ताईत जस्टिन बिबरच्या नावे आहे, हा भाग वेगळा. परंतु कधीकाळी तरुणाईवर मायकेलचं गारुड होतं. लहानथोर पोरं अंगविक्षेप करत स्वत:ला मायकेल समजत. आपल्याकडं त्याचा तेवढा बोलबाला नव्हता. पण पाश्चात्त्य देशांत तो विलक्षण लोकप्रिय होता. चार-चार वर्ष त्याच्या कार्यक्रमाच्या तारखा मिळत नसत. मायकेलविषयी बातमी नाही, असा एकही दिवस उजाडत नसे. त्याच्याविषयी अनेक दंतकथाही प्रसिद्ध होत. अनेकांचा तो फॅशन आयकॅानही होता. तो कसले कपडे परिधान करतो, कोणत्या कंपनीचे बूट घालतो... त्याचा हेअर स्टायलिस्ट कोण आहे. वगैरे वगैरे बाबींची खूप चर्चा होत असे. मायकेल जॅक्सन? हा अमेरिकन गायक, नर्तक, संगीतकार आणि अभिनेता होता. ‘पॅापचा राजा’ अशी बिरुदावली त्याला मिळाली होती. थ्रिलर, बॅड, डेंजरस हे त्याचे विक्रमी खपाचे अल्बम. संगीत क्षेत्रातील महत्वाचा असा ‘ग्रॅमी’ पुरस्कार तब्बल तेरावेळा जिंकणारा तो एकमेव कलावंत. गुरुत्वाकर्षाणाचे सर्व नियम विसरायला लावेल असे त्याचे पदलालित्य असे. पण आता मायकेलयुग संपले आहे. त्याची जादूही ओसरली आहे. त्याची जागा जस्टिन बिबरच्या सारख्या अनेक नव्या पॉपस्टारने घेतली आहे.मधल्या काळात मायकेलवर लहानमुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोपही झाले. त्या आरोपांवरील खटले चालू असतानाच २००९ साली हृदयविकाराने त्याचे निधन झाले. अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त असा मायकेल जॅक्सन १९९६ साली मुंबईत आला होता. वांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर त्याचा कार्यक्रम झाला. राज्यात त्यावेळी युतीचे सरकार होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत मायकेलचा समाचारही घेतला होता. तोच मायकेल ‘मातोश्री’वर येऊन पायधूळ झाडून गेला. या भेटीचा फायदा विझक्राफ्ट नावाच्या आयोजक कंपनीला झाला. मनोहर जोशींनी त्या कार्यक्रमाचा तब्बल ३ कोटी ३४ लाख रुपयांचा करमणूक कर माफ करून टाकला. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध ग्राहक पंचायत न्यायालयात गेली. न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढताच ‘विझक्राफ्ट’ ने कोर्टात पैसे जमा केले. हा सगळा मामला इतिहासजमा झालेला असताना अचानक काल राज्य सरकारने मायकेलच्या २४ वर्षापूर्वी झालेल्या त्या कार्यक्रमाचा करमणूक कर माफ करण्याचा निर्णय घेतला. सरकार अचानक एवढे मेहरबान का झाले? विझक्राफ्ट ही तद्दन व्यावसायिक कंपनी आहे आणि मायकेल हा काही कुणी संत, समाजसुधारक अथवा प्रबोधनकार नव्हता. मग तरीही सुमारे पावणे चार कोटींची करमाफी मिळाली, याचा अर्थ यामागे निश्चितच कुणाचा तरी ‘राज’कीय हात असला पाहिजे. बंधूप्रेमापोटी वर्षावर ही करमाफीची फाईल तयार झाल्याची चर्चा आहे. खरेखोटे ‘वर्षा’ला माहीत!मुद्दा करमाफीचा नाही, तर ती कुणाला आणि कशाकरिता दिली गेली हा आहे. एवढ्या पैशात तर एखाद्या गावातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती. सरकारचे निर्णय लोककल्याणकारी असावेत असा संकेत आहे. मग या करमाफीतून नेमके कोणाचे कोटकल्याण झाले? मायकेलच्या कार्यक्रमाला करमाफी मिळते पण लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या लोककलावंताना त्यांचे फड सुरु करण्याची परवानगी मिळत नाही. यातून सरकारचा प्राधान्यक्रम दिसून येतो. समजा, उद्या असाच कुणी मायकेल आणून आम्ही आमच्या शिवारात नाचवला तर सरकार एवढी मेहरबानी दाखवेल का?