साधना शंकर
यंदा जगातल्या पन्नासहून अधिक देशांत निवडणुका होत असून, ही अगडबंब प्रक्रिया सुमारे ४ अब्ज २० कोटींहून अधिक लोकांशी संबंधित असेल. या पार्श्वभूमीवर एआयचा वापर करून बनवलेले डीपफेक आणि बनावट व्हिडीओ हे मतदार आणि उमेदवार या दोघांसाठीही प्रचंड डोकेदुखी ठरणार आहे, हे निश्चित! अगदी परवापरवापर्यंत आपल्या समोर एखादा व्हिडीओ किंवा कुणा महत्त्वाच्या व्यक्तीचा ऑडिओ बाइट आला तर आपण तो खरेपणाचा पुरावा मानायचो; हे खरेच असे घडले आहे, व्हिडीओत दिसते म्हणजे संबंधित व्यक्ती नक्कीच तसे बोलली असणार, असे म्हणायचो. पण, सध्या ही परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेत प्रचंड सुधारणा होत असल्याने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेल्या प्रतिमा, व्हिडीओबद्दल आता सगळ्यांनाच शंका वाटू लागली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या प्रतिमांचा खोटेपणा ओळखणे प्रारंभी इतके कठीण नव्हते. ते तंत्र अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्याने जाणकार नजरेला त्यात खोटेपणाच्या खुणा सरळसरळ दिसायच्या. पण, आता जसजसे हे खोटेपणाचे तंत्र अधिकाधिक प्रगत होत चालले आहे, तसतसे खरे काय आणि खोटे काय हे ओळखणे फारच कठीण होऊन बसले आहे.
अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुकांच्या धामधुमीत ख्यातनाम अमेरिकन पॉपस्टार टेलर स्विफ्ट हिने डोनाल्ड ट्रम्प यांचा पुरस्कार करणारा झेंडा हाती घेतला आहे असा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला. ४५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला. परंतु, तो व्हिडीओ बनावट होता, हे नंतर सिद्ध झाले. परंतु, तोवर व्हायचा तो परिणाम होऊन गेलेला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता खोटे पण हुबेहूब खरे वाटणारे व्हिडीओ तयार करू शकते. प्रतिमेची तोतया प्रतिमा करता येते किंवा आवाजाचीही नक्कल होते. भामटे लोक तर याहीपुढे जाऊन आता आपल्या प्रियजनांच्या गोष्टी विचित्र पद्धतीने नकलून आपल्यासमोर घेऊन येतील हे भयावह आहे. कुणाचेही छायाचित्र पोर्नोग्राफीत बदलता येईल किंवा महत्त्वाचा राजकीय नेता भलत्याच गोष्टी करताना दाखवला जाईल. अशा खोट्या गोष्टी निर्माण करणारे आणि त्यातला खोटेपणा शोधून काढणारे यांच्यामधल्या स्पर्धेत बहुधा बनवेगिरी करणाऱ्यांचीच सरशी होईल. आता या लढाईत डिजिटल छायाचित्रे, व्हिडीओज यावर वॉटरमार्किंग करण्याचा एक प्रयत्न चर्चेत आहे. मजकूर किंवा प्रतिमा खरी आहे की खोटी हे सूक्ष्मपणे पाहिले तर त्यातला खरे-खोटेपणा ओळखण्यासाठी त्यावर काही चिन्हे टाकता येतील का, असा हा विचार आहे. मानवी नजरेला हुडकणे थोडे कठीण आहे. पण, यंत्र ते काम करू शकेल. या प्रस्तावित वॉटर मार्किंगवर अधिक संशोधन सुरू आहे. कारण खऱ्या विरुद्ध खोट्याच्या लढाईत खऱ्याच्या हाती कसलेच संरक्षण, ढाल नसणे हे काही योग्य नाही.
तंत्रज्ञ त्यांच्या परीने वॉटर मार्किंगवर काम करताहेत किंवा इतरही पद्धती शोधत आहेत; पण आपले काय? आपले म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तूंचे, आशयाचे ग्राहक किंवा शेवटचे वापरकर्ते. नागरिक किंवा ग्राहक म्हणून आपण सर्वार्थाने तंत्रज्ञानावर अवलंबून राहाणे हे यापुढे काही कामाचे असणार नाही हे तर अवघडच आहे. जगभरात निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या लोकशाही व्यवस्थांमधल्या नागरिकांवर तर या काळात मोठीच जबाबदारी पडणार आहे. कारण निवडणूक प्रचाराच्या काळात खरेखोटे तपासण्यासाठी आपली सद्सद्विवेकबुद्धी आपल्याला सतत जागी ठेवावी लागेल. सर्वच नव्या तंत्रज्ञानाबरोबर काही गैरवापराचे धोके संभवतात; पण समाजाने नेहमीच हे स्वीकारले आहे. आताही समोर येणारी प्रत्येक प्रतिमाव्हिडीओ किंवा ऑडिओ हा नकली असू शकेल, जे घडलेले दाखवले आहे, ते कदाचित खोटेही असू शकेल हे समाजाने आता लक्षात ठेवले पाहिजे. ऑनलाइन आशय यापुढे सत्यतेची साक्ष देणार नाही. तो कोणी पाठवला आहे हे महत्त्वाचे असेल. मजकुराचा स्रोत आणि विश्वासार्हता नेहमीच महत्त्वाची राहील. आपण जेव्हा ऑनलाइन काही वाचू किंवा पाहू त्या प्रत्येक वेळी संशयाचे हे भूत मानेवर बसलेले असेल, हे नक्की! या असल्या गजबजाटात मुद्रित शब्दाला कदाचित पुन्हा महत्त्व प्राप्त होईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेने बनवेगिरी सोपी केली आहे आणि जे समोर येते त्यावर पटकन विश्वासही बसू शकतो. अशा वेळी आपण थोडे थांबून आपल्या समोर काय ठेवले जात आहे हे तपासून घेतले पाहिजे. कधी नव्हती एवढी या गोष्टीची आज गरज आहे. बनावट प्रतिमा, नकली व्हिडीओ शोधणे यंत्राला शक्य होईल तोपर्यंत आपण आपली बुद्धी वापरली पाहिजे; तेच संरक्षणाचे अंतिम शस्त्र ठरेल.
(लेखिका निवृत्त केंद्रीय राजस्व अधिकारी आहेत)