संपादकीय: थोरात आणि कमळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:33 AM2021-01-06T01:33:04+5:302021-01-06T07:32:07+5:30
Balasaheb Thorat: ‘थोरातांची कमळा’ नावाचा एक चित्रपट होता. मात्र येथे थोरातांना दूर करण्यामुळे महाराष्ट्रात कमळाबाईला आनंदाच्या उकळ्या फुटू शकतील.
जमीनदारी संपली, कठीण परिस्थिती आली तरी मूळ पिंड जात नाही तशीच काहीशी देशातील व महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही नेत्यांची अवस्था आहे. १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांत राज्यात काँग्रेसप्रणीत सरकारची सत्ता होती. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, त्यामध्ये काँग्रेस आहे. किंबहुना काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे सरकार सुरू आहे. मात्र काँग्रेसची अवस्था ओसरीत पथारी टाकून दिलेल्या आश्रितासारखी आहे. काँग्रेस जेव्हा सत्तेत असते तेव्हा पक्षातील सत्तेचा लाभ न मिळालेल्यांचा एक पक्षांतर्गत विरोधी पक्ष निर्माण होतो. ही मंडळी सतत काड्या करीत राहातात.
राज्यात शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करायला दिल्लीतील काँग्रेस हायकमांड फार उत्सुक नव्हती. सोनिया व राहुल गांधी यांचे मन वळवण्याचा प्रयत्न विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला व त्यात ते यशस्वी झाले. अर्थात जे सरकार बनवण्याकरिता थोरात यांनी हातभार लावले त्या सरकारच्या गळ्याला नख लावून हातातील सत्ता सोडायला ते तयार होणे अशक्य आहे. थोरात हे शरद पवार यांच्याबाबत मवाळ असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेतल्याचा आक्षेप त्यांच्या विरोधकांनी दिल्लीत घेतला आहे. थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याकरिता दंडबैठका काढणाऱ्या पक्षातील विविध नेत्यांचा ते आक्रमक नसल्याचा आक्षेप आहे. राज्यातील काँग्रेस नेतृत्वाचे फोन मुख्यमंत्री घेत नाहीत, भेट देत नाहीत, याबाबत अस्वस्थता होती. मध्यंतरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीए अध्यक्षपद शरद पवार यांना परस्पर बहाल करण्याचा उपद्व्याप केला. गेले काही दिवस औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा वाद सुरू आहे. अशा वादविषयात थोरात आक्रमक भूमिका घेत नसल्याचा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा आक्षेप आहे. काँग्रेसमध्ये प्रभारी सरचिटणीस हे वेगळेच प्रस्थ असते. एखादे राज्य प्रभारींकडे सोपवल्यावर बाकीच्यांनी डोळ्याला पट्टी तर बांधली नाही ना, अशी शंका येईल इतका विश्वास प्रभारींवर टाकला जातो.
यापूर्वी मार्गारेट अल्वा, वायलार रवी, मोहन प्रकाश वगैरे अनेक प्रभारींवरून महाराष्ट्रात वाद झाले आहेत. अल्वा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जेरीस आणले होते, तर वायलार रवी यांनी मुरली देवरा यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळेल, याचा बंदोबस्त केला होता. मोहन प्रकाश यांनी काँग्रेसमध्ये समाजवादी साथींची कंपूशाही केल्याचा आक्षेप घेतला गेला होता. विद्यमान प्रभारी एच. के. पाटील हे शेजारील कर्नाटकमधील असून ते सीमाप्रश्नात कर्नाटक सरकारची तळी उचलून धरणारे असल्याने मराठीत बोलत नाहीत. पक्षाचे चिटणीस बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार ही मंडळी अनुक्रमे कर्नाटक, तेलंगणा येथील असल्याने त्यांच्याशी संवाद साधताना आमदार, पदाधिकारी यांना अडचणी येत आहेत. थोरात नेमस्त असल्याने त्यांना बदलून कठोर भूमिका घेणारी व्यक्ती नियुक्त करण्याचा आग्रह पाटील यांच्या गळी उतरवण्यात काही मंडळी यशस्वी झाली आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्याने प्रदेशाध्यक्षपद इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला देण्याचा आग्रह आहे. थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद व दोन्ही सभागृहांमधील नेतेपद असल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे. थोरात यांना बदलून त्यांच्या जागी राजीव सातव यांची नियुक्ती केली जाण्याची चर्चा असली तरी सातव यांच्याकडे गुजरातची जबाबदारी असून, मोदींना त्यांच्या भूमीत धूळ चारण्याचे राहुल गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याची धुरा सातव यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे सातव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा प्रस्ताव खुद्द राहुल हेच स्वीकारतील का, याबाबत साशंकता आहे. याखेरीज नाना पटोले यांच्यापासून विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत अनेकांची नावे चर्चेत आहेत.
सध्या मंत्री किंवा राज्यमंत्री असलेल्या व्यक्तीकडे प्रदेशाध्यपद दिले तर मंत्रिपद सोडण्यास ते तयार होणार नाहीत. समजा बळेबळे प्रदेशाध्यक्षपदाच्या घोड्यावर एखाद्याला बसवलेच व त्याचे मंत्रिपद काढून घेतले तर याचा अर्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दररोज आपल्या तालावर नाचवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. मात्र तुटेपर्यंत ताणणारी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष झाली तर सीमाप्रश्नासारख्या मुद्द्यावर विद्यमान प्रभारींचा शिवसेनेशी वाद होऊन महाविकास आघाडीचा डोलारा कोसळू शकतो. ‘थोरातांची कमळा’ नावाचा एक चित्रपट होता. मात्र येथे थोरातांना दूर करण्यामुळे महाराष्ट्रात कमळाबाईला आनंदाच्या उकळ्या फुटू शकतील.