‘तीन राजकीय पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ‘पाॅवर’ किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं !’ अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या सहा जागांच्या निकालावर दिली आहे. ही प्रतिक्रिया केवळ बाेलकीच नव्हती, तर निकालानंतर आकलन झाल्याने भानावर आल्यासारखी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भानावर येण्याची शक्यता दिसत नाही. ‘असेल हिंमत तर एक एकट्याने लढा’ असे प्रतिआव्हान दिले आहे. ‘भाजपने ही हिंमत बिहारमध्ये दाखवायला हरकत नव्हती,’ असा काेणी पलटवार केला तर...? केवळ वाचाळवीरांनी महाआघाडीची ‘पाॅवर’ भक्कम केली. महाविकास आघाडीचा जन्म काेणत्या राजकीय पार्श्वभूमीवर झाला आहे, याचेही भान भाजपला राहिलेले नाही.
‘भाजप विरुद्ध सर्व’ या मस्तीत ते आहेत. भाजप एवढा माेठा भाऊ झाला आहे की, सर्व एकत्र येऊनदेखील पराभव करू शकत नाहीत आणि विधान परिषदेच्या सहाही जागा जिंकू शकताे, असाच दावा करत चंद्रकांत पाटील फिरत हाेते. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पाेटनिवडणुका अशा निवडणुकीत शरद पवार अलीकडे सहभागी हाेत नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील प्रचारात नव्हते. तरीदेखील चंद्रकांत पाटील यांनी त्या दाेघांवर टीका करून राज्यभर फिरत हाेते. त्याला पवारांच्या अनुयायांनीच उत्तरे दिली. शरद पवार यांनी ‘ब्र’ही काढला नाही. यातच भाजपचा पराभव दडला हाेता. साेलापूरच्या एका सभेत फडणवीस यांना सांगावे लागले की, ‘शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर टीका करताना मर्यादा पाळाव्यात.’ पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला. पुणे आणि नागपूर हा तर भाजप आपला बालेकिल्ला मानत आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काेथरूडची सुरक्षित जागा घेऊन मेधा कुलकर्णी या सक्षम, कार्यक्षम आमदारांना घरी बसवून ठेवले. त्यावर भाजपला मानणाऱ्या मतदारांत प्रचंड नाराजी आहे.
‘पुणे पदवीधर’मधून मेधाताईंना उमेदवारी दिली जाईल, असे मानले जात हाेते. पण त्यांना मराठा उमेदवाराची गरज वाटत हाेती. नागपूरचा निकाल तर भाजपसाठी धक्कादायक आहे. सलग अनेक निवडणुका या मतदारसंघातून भाजपने जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे नागपूर म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच फडणवीस यांची भाषा एकदम बदलली. सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने काेराेना महामारीच्या भीतीने जनता गर्भगळीत झाली असताना समाजात फार माेठा असंताेष आहे, ताे प्रकट हाेणार आहे, आणि महाआघाडीचे सर्व उमेदवार पराभूत हाेणार आहेत. हे भाजपचे आकलनच चुकीचे हाेते. जनताही सरकारला समजून घेते. जनता लाटेवर स्वार हाेऊन सत्ता मिळाली हाेती. त्यानंतर पावणेतीन वर्षांतच सर्व काही विसरून भारतीय जनतेने इंदिरा गांधी यांच्या हाती सत्ता दिली हाेती. याची आठवण सर्वच राजकीय पक्षांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. जनतेचेही आकलन चालू असते, शिवाय महाआघाडीतील घटक पक्षांना एकत्रित ‘पाॅवर’ दाखविण्याची ही पहिलीच संधी हाेती.
मुंबईसह काेकणात शिवसेना स्वत:च्या बळावर आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शिवसेनेत पूर्वाश्रमीच्या काॅंग्रेसवाल्यांचा भरणा आहे. त्यांना काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेणे अवघड जात नाही. एकनाथ खडसे, मेधा कुलकर्णी आदींना दिलेल्या वागणुकीचाही एक परिणाम सुप्तपणे मतदारांत हाेता. सत्ता, पैसा आणि विभाजनवादी राजकारणाने काेणतीही निवडणूक जिंकता येते, असा एक गैरसमज भाजपमध्ये पसरला आहे. ही निवडणूक सुशिक्षित वर्गात आणि महाराष्ट्रातील छत्तीसपैकी चाेवीस जिल्ह्यांत पार पडली आहे. त्यामुळे राज्यात विद्यमान सरकारविषयी असंताेष आहे की नाही, याचीही चाचपणी हाेती. आगामी काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार आहेत. त्यात महाविकास आघाडीचाच कस लागणार आहे. भाजपने या पराभवातून धडा घेतला किंबहुना परिस्थितीचे नीट आकलन करून घेतले तर मतदार साथ देतील. धुळे, नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची निवडणूक साडेचारशे मतदारांपुरती हाेती. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विराेधी पक्षाने अधिक सामंजस्यपणा दाखवून राजकारण करावे लागेल, अन्यथा महाआघाडीची ‘पाॅवर’ बळकट हाेत जाईल, याबाबत संदिग्धता नाही.