किरण अग्रवाल
काळ बदलतो तशा गरजा, अपेक्षा तर बदलतातच; नव्या पिढीचे नवे विचारही आढळून येतात. ‘जनरेशन गॅप’ म्हणून पाहिले जाते याकडे. हे अपरिहार्यही असते. अर्थात, या सर्व बदल वा परिवर्तनात कसल्याही बाबतीत एकमत होणे अवघड बनते. जितक्या व्यक्ती तितक्या दिशेला त्यांची तोंडे असतात. पण अशाही स्थितीत, एका विषयावर किंवा समस्येवर मात्र सर्वांचेच एकमत होणारे असते व ते म्हणजे, ‘सर्व काही आहे परंतु वेळच नाही हो’ या रडगाण्यावर. कोणत्याही संदर्भाने होणाऱ्या चर्चा असोत, त्यात वेळ नसल्याचा कॉमन फॅक्टर असतो. अगदी व्यावसायिक कामकाज असो, की कुटुंबासाठी काही करायचे असो; सर्वांची हळहळ अगर असहायता आढळते ती वेळच नसल्याबद्दल. पण आपत्तीतून इष्टापत्ती म्हणावे तसे, कोरोनामुळे वेळेची समस्या दूर झाली आहे आता. सर्वांनाच भरपूर वेळ उपलब्ध झाला आहे. त्यामुळे किमान या वेळेचा सदुपयोग घडवीत कौटुंबिक नात्यांचे, जबाबदारीचे बंध अधिक घट्ट करायला काय हरकत असावी?
रोजी-रोटीसाठीच्या लढाईत आज प्रत्येकच जण असा काही अडकला आहे की, त्याला फावला वेळ आहेच कुठे? कुणालाही व कशाच्याही बाबतीत विचारा, एकच उत्तर मिळते ‘अहो मरायलाही वेळ नाही’. विशेषत: नोकरदारांची तर याबाबतीतली व्यथा सारखी आहे. त्यातही शहरी भागातले, म्हणजे ग्रामीण भागात कुटुंबातील ज्येष्ठांना ठेवून आलेल्यांची तर वेळेच्या बाबतीत खूपच दमछाक होताना दिसते. पती-पत्नी दोघेही नोकरदार असतील तर विचारायलाच नको. विभक्त कुटुंब पद्धतीतून ओढावलेल्या ज्या काही अडचणी आहेत, त्यात ही वेळेची कमतरता अधिक मोठ्या प्रमाणात जाणवते. अशात नातेसंबंधासाठी किती वेळ काढता येणार? नाते-संबंधातीलही काका-मामा-मावशांचे जाऊ द्या, पत्नी व स्वत:च्या मुलांसाठीही वेळ काढणे जिकिरीचेच ठरत असल्याची अनेकांची तक्रार असते. ‘बाबा कामावरून उशिरा येतात तेव्हा आम्ही झोपलेले असतो व आम्ही सकाळी शाळेला जातो तेव्हा बाबा झोपलेले असतात; म्हणजे भेट होते ती सुटीच्याच दिवशी’... अशी खंत बोलून दाखविणारी अनेक बालके आपल्या आजूबाजूस आढळतात. प्रमाण कमी-अधिक असेल; परंतु कुटुंबासाठीही वेळ देता न येऊ शकणाऱ्यांची घालमेल अनेकांमध्ये प्रत्ययास येते. पण वेळेची ही समस्या आता ‘कोरोना’मुळे काही कालावधीसाठी का होईना दूर झालेली आहे. त्यामुळे कुटुंबातील, नातेसंबंधांतील दुर्लक्षाचा बॅकलॉग भरून काढता येण्याची संधी म्हणून याकडे पाहता यावे.
‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठीच्या खबरदारीचा भाग म्हणून अनेक खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची सूट दिली आहे. शाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुटी दिली गेल्याने मुले घरातच आहेत. सिनेमागृह-मॉल्स बंद आहेत म्हटल्यावर तिथे जाण्याचा प्रश्न नाही. सार्वजनिक कार्यक्रम थांबलेले आहेत. बाहेरगावी जाण्याचा म्हणजे प्रवासाचा धोका स्वीकारायचा नाहीये. एकुणात अनेकांना घरातच बसण्याची वेळ आली आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांची अडचण होणार आहे हे खरेच; परंतु आपत्तीत समाधान शोधताना असा ज्यांना ज्यांना म्हणून वेळ उपलब्ध होणार आहे, त्यांना तो सत्कारणी लावताना कुटुंबासमवेतचे नाते अधिक दृढ करण्याची ही संधी आहे. घरात थांबताना टीव्हीसमोरच बसून न राहता, अगर मोबाइलवरून सोशल माध्यमांच्या जंजाळात स्वत:ला अडकवून न घेता मुलांबरोबर गप्पा मारता येतील. त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळता येईल. आई-बाबा व अन्य वडिलधाऱ्यांसोबत सुख-दु:खे शेअर करता येतील. नोकरीच्या व काम-धंद्याच्या धबडग्यात अनेकदा अनेकांना कुटुंबासोबत जेवण करणेही शक्य होत नसते. आता वेळ मिळालाच आहे तर कुटुंबीयांसमवेत छान गप्पांचा फड रंगवीत जेवण करण्याचा आनंद घेता येणार आहे. एरव्ही घरात असूनही नसल्यासारखे अनेकांचे राहणे असते तेव्हा यासंबंधीच्या रोजच्या धकाधकीतून मिळालीच आहे थोडी उसंत, तर नाती घट्ट करूया ना!
महत्त्वाचे म्हणजे, आजची अवस्था उद्या बदलणारच आहे. काळ हा कधी थांबत नसतोच. त्यामुळे ‘कोरोना’च्या सावटातून दूर होत पुन्हा सारे सुरळीत करताना अधिक वेळ द्यावा लागेल. झालेले नुकसान भरून काढावे लागेल, त्यासाठीची धावपळ-मेहनत करावी लागेल. तुंबलेली-खोळंबलेली कामे मार्गी लावावी लागतील. थोडक्यात, तेव्हा वेळ काढणे मुश्किलीचे ठरेल. त्यामुळे आजच्या स्थितीकडे संकट म्हणून अजिबात न पाहता, संधी म्हणून पाहता यावे. कुटुंबातले-नात्याचे बंध अधिक गहिरे करण्यासाठी या लाभलेल्या वेळेचा उपयोग करून घेता यायला हवा. असे केल्याने दुहेरी लाभ पदरी पडणारे आहेत. घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी उगाच न जाता ‘कोरोना’पासून बचावताही येणारे आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवून त्यांच्या आनंदात-समाधानात भरही घालता येणार आहे. तेव्हा ही संधी घेऊ या, आणि म्हणूया..‘कोरोना के डर से डरो ना, अब छुट्टी मिली ही है दफ्तर से तो, रिश्तों को मजबूत करो ना!...’