शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

Coronavirus : शांतिदूतांनाही पडले शांततेचे कोडे!

By किरण अग्रवाल | Published: March 26, 2020 8:21 AM

Coronavirus : अंग टाकून विसावायच्या संधीचा शोध मात्र प्रत्येकालाच असतो. ही संधी सध्या ‘कोरोना’ने अपवादवगळता सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे.

किरण अग्रवालधावाधाव... ही तशी अव्याहत चालणारी क्रिया आहे. रोजीरोटीच्या झगड्यात आज प्रत्येकाचीच धावाधाव सुरू आहे. या धावण्याची गती ज्याच्या त्याच्या गरजेनुसार कमी-अधिक असेल; पण कुणी म्हणता कुणी त्याला अपवाद नाही. त्यामुळे या धकाधकीत दोन घटका जरा विसावायला मिळणे अवघडच! तशी संधी मिळाली तरी त्यातील दृश्य-अदृश्यता त्या संबंधितालाच ठाऊक असते. कारण प्रथमदर्शनी दृश्य स्वरूपात एखादी व्यक्ती निवांतपणे पहुडलेली अगर आरामात विसावलेली आढळून येत असली तरी तिचे मन कोणत्या विवंचनेत गुंतले आहे, हे अदृश्य असते, जे दुसऱ्याला कळणारे नसते. अर्थात तसे असले तरी अंग टाकून विसावायच्या संधीचा शोध मात्र प्रत्येकालाच असतो. ही संधी सध्या ‘कोरोना’ने अपवादवगळता सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे.

विसावण्याच्या किंवा आरामाच्याही प्रत्येकाच्या आपापल्या त-हा असतात. कुणी चक्क पलंगावर पाठ टाकून लोळण घेत आराम करतो, तर कुणी खुर्चीत निवांत पडून. ब-याच जणांना कार्यालयीन सेवेदरम्यान खुर्चीत मानेखाली हात घेऊन स्थिरावण्याचीही सवय असते. हा स्थिरावणे शब्द मुद्दाम यासाठी की, काम असो अगर नसो, अशांना सतत फिरफिर करण्याची सवय असते. आपण खूप कामात व परिणामी ताणात आहोत असे प्रदर्शन ते नेहमी करत असतात. त्यामुळे मिळाली संधी की, ते पद्धतशीरपणे खुर्चीत स्थिरावतात. तेव्हा हे स्थिरावणे व विसावणे एकच. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी शब्दकोशाचा आधार याला आहे. शरीर थकले, अवयव - गात्र थकले की विश्रांतीची-विसावण्याची गरज भासतेच. पण हल्ली थकावट न बाळगता अगर दर्शवता सतत पळावे-धावावे लागते, हीच खरी समस्या आहे. सामान्य माणसाला तर मरायला जिथे फुरसत नसते, असे म्हटले जाते; तिथे विसावायला कुठे संधी मिळणार? त्याच्यासाठी हक्काचा एकच विसावा असतो, तो अंतिम यात्रेत पार्थिवाला मिळणारा! त्यामुळे रोजच्या धबडग्यात विसावायला मिळण्यासाठी सारेच आसुसलेले असणे अगदी स्वाभाविक आहे.

माझ्या विसाव्याचे स्थान म्हणजे, माझ्या दिवाणखाण्यातील आरामखुर्ची. सकाळी उठल्या-उठल्या बाल्कनीचे दरवाजे उघडून प्रसन्न वारा अंगावर घेत या खुर्चीत विसावायचे व एकेक करून घरी येणारी सारी वर्तमानपत्रे हातावेगळी करायची अशी रोजची परिपाठी. पण, ‘कोरोना’ने त्यात खंड पाडला. अमुक-तमुक वर्षात असे घडले नाही, फर्स्ट टाइम इन हिस्ट्री... यासारख्या संदर्भांनी सध्या अनेक संस्था, आस्थापना ‘लॉकडाउन’ झाल्या आहेत. त्यांच्याही कामात वा सिस्टीममध्ये खंड पडला आहे तसा. त्यामुळे वृत्तपत्रांऐवजी हाती मोबाइल घेत ऑनलाईन वाचन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. यासंबंधीची आतापर्यंत रूढ झालेली सिस्टीम बदलल्याने दार बंद आहे, खुर्ची रिकामी आहे. हे रिकामपणच खरे तर आज मनाची कवाडे सताड उघडी करायला भाग पाडून गेले आहे. एरव्ही गांभीर्याने असो, की अलवार-अलगदपणे; कुठल्याही विषयावर मन:पूत मनात डोकावायला तरी कुठे मिळते? त्यामुळे ‘कोरोना’च्या आपत्ती काळात का होईना, अशी रिकाम्या मनातील भुंग्याची भुणभुण आत्मपरिक्षणाला, चिंतन-मननाला निमंत्रण देणारीच ठरली नसती तर नवल!

विचार आला, कोरोनाच्या धास्तीने आपले जे रिकामपण ओढवलेय; दारावर बसलेल्या कबुतर पक्ष्याच्या दाम्पत्याला त्याची काही कल्पना असेल का? स्वच्छंद-मुक्तपणे विहरण्याच्या गप्पा आपण करतो ख-या, पण तशी मुक्तता-स्वच्छंदता लाभते का कधी आपल्याला? कबुतराच्या गुटर्गुची बोली आपल्याला कळत नाही खरी; पण एरव्ही खुर्चीत पहुडणारी व्यक्ती आज त्यावर दिसत नसल्याबद्दलची चर्चा तर होत नसावी त्यांच्यात? जिवाच्या जिवलगाची ही जोडी रिकाम्या खुर्चीकडे काय म्हणून बघत असावी, व्यक्तीचे नसणे निर्भयतेचे असल्याचे आनंदनिधान त्यांच्या गुटर्गुत असावे, की दाणा-पाण्याची सोय टळण्यासंबंधीच्या हवालदिलतेचे रुदन? कबुतरांकडे आपण नेहमी शांतिदूत म्हणून पाहतो. शांततेचा संदेश देण्यासाठी कबुतरे उडवतो, पण आज या शांतिदूतांनाही ही शांतीच तर खटकत नसावी?.. एक नव्हे, असंख्य अशा प्रश्नांनी रिकामपणातल्या निवांततेतही मनाच्या कवाडावर जणू किलबिलाटच घडवून आणला. खरेच, आपण अशा बाबींकडे इतक्या मोकळ्या व प्रांजळपणे कधी बघतो का, हा प्रश्न त्यातून अधिकच गडद झाला.

सहज म्हणून हे छायाचित्र मी आमच्या साहित्यिक सुहृदाला, स्वानंद बेदरकर यांना पाठविले. त्यांनी लगेच त्यावर प्रसवले,‘कबुतरांना पडले कोडे, शांततेचे हे कुठले रूप?आरामखुर्चीचेही म्हणे, बसून बसून वाजले सूप...’

खरेच तर आहे, कबुतरांनाच काय; कुणाही सुजाण-संवेदनशील मनाला शांततेचे हे रूप कोड्यात टाकणारेच ठरावे. शांतता, निरवता, विसावा आदी. काहीही म्हणा, ते हवेहवेसे असले तरी कधी कधी ही शांतता व त्यातून येणारे रिकामपण मनाला खरवडणारेच ठरते. नदीकाठी बसून व पाण्याच्या प्रवाहात पाय सोडून आनंददायी शीत-शांती अनुभवण्याची परिस्थिती राहिली नाही. आता इतक्या कोलाहलाची सवय झालीय की शांतताही खायला उठते. आजची शांतता व त्यातून ओढवलेल्या विसाव्याला तर भयाची किनार आहे. आणि भय कसलेही असो, ते तर अस्वस्थ वर्तमानाच्या विटेवर अस्थिर भविष्याचा इमला उभारू पाहते. तेव्हा त्याला घाबरून चालत नाही. आत्मविश्वास व धीराच्या बळावर भयमुक्ती नक्कीच साधता येते. तेव्हा सद्यस्थितीत ‘कोरोनो’च्या संकटामुळे अनुभवास येणारे भय टाळून, स्वत:च्या, कुटुंबीयांच्या व समाजाच्याही स्वास्थ्यासाठी घरातच विसावणे गरजेचे ठरले आहे. ते सक्तीचे आहे, तसे सावधानतेसाठीचेही आहे. दारावर बसलेल्या कबुतरांचा सांगावाही तोच तर नसेल?

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या