राजू नायक पणजी - गोव्यात चालू असलेला ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्ररसिकांची विलक्षण गर्दी खेचतो आहे. एरवी गोव्यामध्ये चित्रपटांऐवजी चित्रपटबाह्य दर्शनासाठीच गर्दी लोटत असल्याचा अनुभव यायचा. मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. अनेक राज्यातून विशेषत: दक्षिणेकडील राज्यातून जाणकार चित्ररसिक महोत्सवासाठी आले असून चित्रपट पाहण्याबरोबरच ते चर्चेतही भाग घेताना दिसतात. मात्र या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यास इफ्फीची आयोजन क्षमता अपुरी पडते आहे. चित्रपटगृह भरल्याच्या सबबीखाली अनेक रसिकांना परत पाठवले जात असून काही वेळा तर यातून प्रतिनिधी आणि आयोजकांमध्ये संघर्षही झाला व पोलिसांना पाचारण करावे लागले.
एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या प्रतिनिधींना सामावून कसे घ्यायचे हा यक्षप्रश्न आयोजक गोवा मनोरंजन संस्था आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाला सतावतो आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यानी सांगितले की यावर्षी तबब्ल ६००० प्रतिनिधींनी नावनोंदणी केलेली आहे. मात्र महोत्सवासाठी पणजीत सात चित्रपटगृह उपलब्ध झाले असून त्यांची सामायिक आसनक्षमता २३०० आहे. साहजिकच दर शोच्या वेळी १०० ते २०० प्रतिनिधांनी विन्मुख परतावे लागते.
राजेंद्र तालक म्हणाले की दोना पावला येथे इफ्फी संकुल होऊ घातले असले तरी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. अगदी आत्तापासून सुरुवात केली तरी संकुल पुर्णत्वास येण्यास किमान दोन वर्षे लागतील. पण विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर या संकुलासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो. शहरात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीतून चित्रपटगृहे उभारायची ठरवली तरीही येत्या महोत्सवात ती उपलब्ध होणार नाहीत. शिवाय मल्टीप्लेक्सची आसनक्षमता मर्यादीत असते. इफ्फीला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे पर्याय अपुरेच ठरतात.
चित्रपटांविषयी सजगता वाढत चालल्याचे समाधान असले तरी वाढत्या संख्येने महोत्सवासाठी येणाऱ्यांना कसे सामावून घ्यायचे यावर गोवा मनोरंजन संस्था आणि चित्रपट महोत्सव संचालनालयात खल सुरू झाला आहे.