किरण अग्रवाल
देशपातळीवरील बदलती राजकीय समीकरणे पाहता शिवसेना-भाजपा ‘युती’ होणार की ठरल्याप्रमाणे स्वबळच आजमावले जाणार, हा प्रश्न औत्सुक्याचा ठरला आहे खरा; पण या दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या कडवट उद्गारांची धार दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्यावरून काही अंदाज बांधले गेले तर ते सपशेल धुडकावता येऊ नयेत. नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह उभय पक्षीयांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळत एकमेकांची जी पाठराखण केलेली दिसून आली, त्यावरूनही या अंदाजांना बळ लाभणारे असून, संबंधितांची पाऊले ‘युती’च्या दिशेने पडत असल्याचेच ते निदर्शक म्हणावे लागेल.भाजपात नरेंद्र मोदी - अमित शहा पर्व अवतरल्यानंतर या पक्षाच्या शिवसेनेसोबतच्या सर्वात जुन्या ‘युती’त मिठाचा खडा पडल्याचे एव्हाना लपून राहिलेले नाही. गेल्यावेळी विधानसभेला या दोघांनी आपले स्वबळ अजमावूनही पाहिले; परंतु एकट्याचे गणित न जुळल्याने अखेर ‘युती’नेच सत्ता स्थापन करावी लागली. अर्थात, सत्तेत सोबत असतानाही या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना आडवे जाण्याची संधी सोडली नाही. शिवसेना तर सत्तेत असल्याचे विसरून बऱ्याचदा विरोधकांचीच भूमिका बजावताना दिसून येते. बरे, हे केवळ अंतस्थ पातळीवर चालते असे नव्हे तर थेट जाहीरपणे एकमेकांच्या वस्रहरणाचे प्रकार व प्रयत्न त्यांच्यात सुरूच असतात. महाराष्ट्रात आपल्या खांद्यावर मान ठेवून भाजपा रुजली, वाढली व आता ते आपल्यालाच बाजूला सारून शतप्रतिशत राज्य पादाक्रांत करायला निघाल्याच्या रागातून शिवसेनेने यापुढे येऊ घातलेल्या निवडणुकीसाठीही आपली ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केलेली आहे. भाजपानेही हे आव्हान स्वीकारल्याचे वेळोवेळी म्हटले आहे. पण, आता एकूणच देशात भाजपाविरोधकांच्या एकत्रिकरणाचे जे प्रयत्न चालले आहेत आणि त्याला यशही लाभते आहे ते पाहता, आहे त्या सोबत्यांना सोडून वा दुखावून चालणार नाही हे भाजपाच्याही लक्षात आले आहे. परिणामी उभयतांकडून कडवटपणा टाळून ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे प्रत्यंततर घडून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रमाप्रसंगीही त्याचीच चुणूक दिसून आली.शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या पिंपळगाव बसवंत येथील कार्यक्रमाप्रसंगी उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील एकाच वाहनाने तर आलेच; परंतु दोघांनी परस्परांची स्तुतीही केली. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते सर्व मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाठपुरावा केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तर आपण सरकारच्या चांगल्या कामात खोडा घातला नाही, असे ठाकरे म्हणाले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्यावेळी मराठवाड्यासाठी पाणी सोडले म्हणून जे आमदार अनिल कदम त्यावेळी विरोधासाठी आघाडीवर होते, त्याच कदम यांनी यावेळी मात्र महाजनांकडून नाशिक व मराठवाड्यात चांगला समन्वय साधला गेल्याची पावती दिली. आपल्यातील वाद मिटल्याचेही दोघांनी जाहीर केले. महत्त्वाचे म्हणजे, महाजन यांना उद्देशून, ‘तुम्ही नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास न्या; राजकारण गेले चुलीत, मी तुमच्या सोबत येईन’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगून आपली जुळवून घेण्याची मानसिकता दर्शवून दिली.शिवसेना-भाजपातील ताणल्या गेलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’च्या दारी जाण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्या शिवाजी सहाणे यांचे विधान परिषद उमेदवारीचे तिकीट कापले गेल्याचा इतिहास अजून विस्मृतीत गेलेला नाही. पण तरी शिवसेना आमदाराने आपल्या कार्यप्रमुखांच्या साक्षीने भाजपा मंत्र्यांचे व सरकारचे कौतुक करण्याचे धाडस दाखविले व तितकेच नव्हे; तर मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या प्रश्नावर खंबीरपणे लढलेल्या भाजपाच्या आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कारही करविला. या साऱ्या गोष्टींतून शिवसेना-भाजपाचे सूर पुन्हा जुळू लागल्याचेच संकेत मिळणारे आहेत. अर्थात, राजकारणात जे दिसते तेच पूर्णसत्य असते असेही नाही. परंतु पेटलेपणातून आलेला कडवटपणा जेव्हा समजूतदारीच्या कौतुकात बदलताना दिसतो, तेव्हा त्यातून सहोदराच्याच वाटा प्रशस्त होण्याची शक्यता वाढते. पिंपळगाव (ब)च्या कार्यक्रमात तेच दिसून आले.