इथे पृथ्वीतलावर माणसांमाणसांमध्ये पाण्याच्या एकेका थेंबासाठी मारामाऱ्या सुरू असताना, सजीवसृष्टीमुळे सूर्यमालेचा मुकुटमणी बनलेली वसुंधरा तापमानवाढीच्या चक्रातून जात असताना, तिचा युगायुगाचा सोबती-सखा चंद्राकडून दिलासादायक बातमी आलीय. पृथ्वीच्या या उपग्रहाच्या पृष्ष्ठभागावर किंचित ओलाव्याच्या रूपात का होईना पाणी आढळले आहे. त्यामुळे चंद्रावर वस्ती करू इच्छिणाऱ्या किंवा तिथे अंतराळ स्थानक उभारून पलीकडच्या खोल अंतराळात, दुसऱ्या सूर्यमालेत मुशाफिरी करू पाहणाऱ्यांना आनंद झाला नाही तरच नवल. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या ‘सोफिया’ या जगातल्या सर्वांत मोठ्या उडत्या वेधशाळेने चंद्रावर पाण्याचा शोध लावलाय. बोईंग ७४७ विमानाचे रूपांतर २.७ मीटर व्यासाच्या दुर्बिणीसह वेधशाळेत करण्यात आले आहे. तिने सतत सूर्यप्रकाशात राहणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर जलस्फटिके टिपली आणि त्यावरून नि:संदिग्धरीत्या चंद्रावर पाणी असल्याचे अनुमान शास्रज्ञांनी काढले. नासाचे हे निरीक्षण, संशोधन अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहे. कारण, स्पेसएक्ससारख्या संस्थांनी घेतलेला पुढाकार, सामान्यांमध्येही निर्माण झालेले अवकाशाचे आकर्षण, चंद्रावर वस्ती करण्याची स्वप्ने या सगळ्यांना या शोधामुळे नवा आयाम प्राप्त होणार आहे. तत्पूर्वी, १९६९ मधील अपोलो या मानवी चांद्रमोहिमेपासून असे मानले जात होते, की चंद्रावर पाणी नक्की असेल. परंतु ते कधीही सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशा अंधाऱ्या, कायमस्वरूपी छायांकित ध्रुवीय भागातल्या विवरांमध्ये बर्फाच्या रूपात असेल. चंद्र स्वत:भोवती फिरत नसल्याने त्याचा निम्माअधिक भाग कायमचा अंधारात असतो. पाणी असलेच तर तिथे असेल, उजेडातला टापू या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल आहे. हा समज २००९ मध्ये नासाने दक्षिण ध्रुवावर खोल विवरांमध्ये जलकण शोधले तेव्हा दृढ झाला.
भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेने गेल्या एप्रिलमध्ये वर्षभराचे भ्रमण पूर्ण करताना चंद्राच्या जवळपास ४० लाख चाैरस किलोमीटर भूपृष्ठाचे मानचित्रण केले. तेव्हाही, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाणी मिळू शकणारे टापू शोधण्यात यश आले. सोबतच, आतापर्यंत आढळले ते खरे पाणी म्हणजे एचटूओ होते की हायड्रोजन व ऑक्सिजनचा एकेकच अणू असलेले हायड्राेक्सील होते, हा संभ्रम आहेच. आता मात्र जलरेणूंच्या स्वरूपातील अत्यल्प प्रमाणात का होईना पाण्याचा शोध लागला आहे. त्यातही पृथ्वीवरून साध्या डोळ्यांनी दिसते त्या क्लेव्हिअस नावाच्या सूर्यप्रकाशातील सरोवराच्या परिसरातील जलस्फटिकांमुळे कित्येक दशकांचा गैरसमज दूर होणार आहे.पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राला आपण लाडाने चांदोबा, चांदोबा भागलास का, असे विचारत आलो. आता पाण्याच्या शोधामुळे भिजलास का, असे विचारावे लागेल. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होण्याचा कयासही उत्कंठा वाढवणारा आहे. सततचे छोटे-छोटे उल्कापात, पृष्ठभागावर आदळणारे लघुग्रह किंवा धूमकेतू आणि साैरवाऱ्यांमधून येणारे ऊर्जाभारित कण यांमुळे हे पाणी तयार होत असावे, असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. अर्थात या पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी, एक घनमीटर मातीत मिसळलेले १२ औंस अर्थात अंदाजे सव्वातीनशे ग्रॅम इतके आहे. सहारा वाळवंटापेक्षा हे प्रमाण शंभर पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर पाणी ही उत्साह वाढवणारी बातमी असली तरी प्रत्यक्ष त्याचा वापर हा खूप दूरवरचा पल्ला आहे. लोकजीवनाचा, संस्कृती व सणावारांचा, मिथके व दंतकथांचा अविभाज्य भाग असलेला चंद्र अंतराळ वैज्ञानिकांनाही सतत खुणावत आला आहे. तेव्हा, चंद्रावर मिळू शकणारे पाणी केवळ अवकाश जिंकू पाहणाऱ्या माणसांची शारीरिक तहानच भागवील, असे नाही. त्याचा उपयोग अंतराळ प्रवासाला निघालेल्या माणसांना पिण्यासाठी, श्वसनासाठी आवश्यक प्राणवायूसाठी तसेच राॅकेटमध्ये इंधनासाठीही होऊ शकेल.
२०२४ मध्ये पहिली महिला चंद्रावर पाठविण्याची ‘अर्टेमिस’ मोहीम नासाने आखली आहे. मंगळावर माणूस पाठविण्याच्या मोहिमांवरही विविध देश काम करीत आहेत. चंद्रावर पाणी उपलब्ध असण्याच्या शक्यतेमुळे या मोहिमांना गती मिळेल. सध्या अब्जावधी सूक्ष्म जलकणांच्या रूपात चंद्रावर असलेले पाणी वापरात येऊ शकले तर मंगळाच्या दिशेने जाणाऱ्या मानवी अंतराळ मोहिमा, तसेच त्याहीपुढे दूरवर खोल अंतराळाकडे प्रवास आणि ब्रह्मांडातील अज्ञाताच्या शोधाची तृष्णा, ज्ञानाची असोशी चंद्रावरच्या पाण्याने भागवली जाईल.