गेल्या काही दिवसांपासून 'वारिस पंजाब दे' या नावाच्या दहशतवादी संघटनेचे नाव देशपातळीवर चर्चेत आले होते. कट्टरपंथी असलेला केवळ एकोणतीस वर्षांचा अमृतपाल सिंग सध्या या संघटनेचे नेतृत्व करीत होता. मागील फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अमृतसरमधील अजनाला पोलिस ठाण्याच्या समोर तलवारी आणि बंदुका घेऊन अमृतपाल सिंगच्या पुढाकाराने हल्ला करण्यात आला. तुफान सिंग नामक कट्टरपंथीयाची सुटका करावी, या मागणीसाठी अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांचा हा हल्ला होता. अजनाला पोलिस ठाण्यात सर्व कट्टरपंथीयांनी घुसखोरी केली. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांना तुफान सिंगला सोडून द्यावे लागले, तेव्हा पंजाब पोलिस आणि केंद्र सरकारचे डोळे उघडले. कारण या कट्टरपंथीयांनी अजनाला पोलिस ठाण्यात घुसखोरी करताना त्यांच्या खलिस्तानच्या मागणीचा अंदाज आला.
अमृतपाल सिंग याने पंजाब पोलिसांना शरण येण्यासाठी जे स्थळ निवडले त्यावरून तरी 'वारिस पंजाब दे' ही संघटना पुन्हा एकदा स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राच्या मागणीसाठी शीख समाजातील तरुणांना संघटित करीत आहे हे स्पष्ट होते. मोगा जिल्ह्यातील रोडे गावातील गुरुद्वारामध्ये आपण शरण येऊ, असा निरोप अमृतपाल सिंग याने पंजाब पोलिसांना धाडला आणि तो जेथे कोठे लपला होता तेथून रोड़े गावात शनिवारी रात्री आला. त्याच्यासोबत नेहमीच बंदूकधारी अंगरक्षकांचा गराडा असतो. त्याच्यासह रोडे हा खलिस्तानवादी कट्टरपंथीय जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्या जन्मगावी पोहोचला. रविवारी पहाटे शरण येण्याचा निरोप धाडत आपल्या सहकाऱ्यांसमोर छोटेसे भाषणही त्याने केले. अमृतपाल सिंग याला पोलिसांनी वेढा घालून अटकेची प्रक्रिया पूर्ण करीत असताना जर्नेल सिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या तेथे हजर होता. फेब्रुवारीत अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला केला तेव्हा डोळे उघडलेल्या पंजाब पोलिसांनी कारवाई सुरू केली गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी सुमारे ७८ जणांना अटक केली. याच दरम्यान इंग्लंड आणि अमेरिकेसह खलिस्तानच्या मागणीला सर्वाधिक बळ देणाऱ्या कॅनडातील शीख समुदायांनी जोरदार निदर्शने करीत हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भारत सरकारचेही डोळे उघडले आणि संबंधित देशाच्या राजदूताकरवी भारताने स्पष्ट शब्दांत नापसंती दर्शविली. इंग्लंडमधील भारतीय दूतावासावर हल्ला करण्यात आला. तेथील सरकार भारतीय दूतावासास संरक्षण देण्यात कमजोर ठरले होते. फुटीरवादी कारवाया करणारा दुसरा भिंद्रनवाले तयार होत असल्याची जाणीव केंद्र सरकार आणि पंजाब सरकारला झाली.
केंद्रीय सुरक्षा दलाचे विविध विभाग आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे अमृतपाल सिंगला पकडण्याची मोहीम सुरू केली. संपूर्ण देशाची अंतर्गत कायदा-सुव्यवस्था पाहणाऱ्या यंत्रणा कामाला लागल्यानंतर काल, रविवारी पस्तिसाव्या दिवशी अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आली. अमृतपाल सिंगची अटक ही त्याची शरणागती होती का? ती शरणागती जरी असली तरी त्याला पकडण्याची मोहीम सुरू झाल्यानेच त्याने शरण येण्याची तयारी दर्शविली असणार आहे. अमृतपाल सिंगला अटक करून आसामच्या उत्तर भागात असलेल्या दिब्रुगढ सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यासाठी त्याची खास विमानाने रवानगी करण्यात आली. त्याची आणि तो ज्या संघटना बांधत होता, त्यांच्या हालचाली आणि उद्देश राष्ट्रविरोधीच होता. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्यास अटक करण्यात आली. त्याच्या आठ प्रमुख साथीदारांनाही गेल्या महिन्याभरात अटक करून याच जेलमध्ये डांबण्यात आले आहे. देशातील पंजाब या सुपीक प्रांताने दहशतवादाने एकदा स्वतःला जाळून घेतले आहे. काँग्रेस पक्षाच्या राजवटीत हे घडले आणि काँग्रेस सरकारने लष्करी कारवाई करीत जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्या गटाची दहशत मोडून काढली होती. त्यातून पुढे इंदिरा गांधी यांची हत्या झाली. हा सारा इतिहास आपणास माहीत आहे.
अमृतपालसारखी विषवल्ली पुन्हा वाढू देणे भारताच्या अखंडतेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे खलिस्तानी पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. पंजाबमधील दहशतवादाची कारणे आणि त्या प्रांताच्या शेजारी असणारी पाकिस्तानची सीमा याचाही खूप जवळचा संबंध आहे. लढाऊ आणि शूरवीर असणाऱ्या पंजाबच्या तरुणांचा पाकिस्तानला गैरफायदा घ्यायचा आहे. तो प्रयत्न पाकिस्तानने पुन्हा एकदा चालू केला होता. अमृतपाल सिंगच्या अटकेने हे कटकारस्थान उद्धवस्त होईल अशी आशा करूया!