संपादकीय - पहाटेच्या प्रीतीची जखम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:17 AM2023-02-15T06:17:36+5:302023-02-15T06:18:14+5:30

अजित पवारांबरोबर सत्तासंग म्हणजे अतिच झाले, अशी सखेद आश्चर्याची  प्रतिक्रिया ‘परिवारा’तूनही उमटली होती.

Editorial - Wounds of early morning love of devendra fadanvis and ajit pawar | संपादकीय - पहाटेच्या प्रीतीची जखम

संपादकीय - पहाटेच्या प्रीतीची जखम

googlenewsNext

व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला एखादे जुने प्रेम आठवणे साहजिक असते. माणूस मग नॉस्टॅल्जिक होतो. ‘त्या पहिल्या  प्रीतीच्या आज लोपल्या खुणा, वाळल्या फुलांत व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा’ अशी मनोवस्थादेखील होत असावी. तीन वर्षांपूर्वी काही तासांसाठी उमललेली आणि नंतर काही तासांतच कोमेजलेली ती प्रीती खरे तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक न आठवावी अशी जखमच आहे. म्हणूनच त्यांना पहाटेच्या त्या शपथविधीची आठवण कोणी करून दिली, की ते अस्वस्थ होतात. सारा महाराष्ट्र साखरझोपेतून उठू पाहत असतानाच तिकडे राजभवनात फडणवीस हे अजित पवार यांना पेढा भरवत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा  शपथविधी झाला अन् प्रचंड खळबळ उडाली. पण, अंगावरची हळदही सुकली नसताना घटस्फोट व्हावा तसे घडले. सरकार पडले. वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री असा लौकिक संपादन करणाऱ्या फडणवीसांवर सर्वांत कमी कालावधी मिळालेले मुख्यमंत्री असा ठप्पादेखील पडला. त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले.

अजित पवारांबरोबर सत्तासंग म्हणजे अतिच झाले, अशी सखेद आश्चर्याची  प्रतिक्रिया ‘परिवारा’तूनही उमटली होती. अशी सत्ता मिळविण्यापेक्षा विरोधात बसायला हवे होते, असा सूरदेखील राजकीय सोवळे जपणाऱ्यांकडून उमटला होता. पुढे पहाटेचा शपथविधी ही आमची चूकच होती, अशी कबुली देत फडणवीस यांनी पापक्षालनाचाही  प्रयत्न केला बरेचदा. मात्र, तरीही मानगुटीवरील ते भूत पिच्छा सोडत नसल्याने की काय, आता त्यांनी त्या शपथविधीचे खरे शिल्पकार हे शरद पवार होते, असे रहस्योद्घाटन केले आहे. राजकीय डावपेचांबाबत फडणवीस हे शरद पवारांना भारी पडणारे नेते आहेत, असे बोलले जात असतानाच पवारांनी नवे डावपेच टाकले. अजितदादा माघारी फिरले. महाविकास आघाडीचा अकल्पित  प्रयोग मोठ्या पवारांनी सत्यात उतरविला. अजितदादांचे ते बंड पवारांविरूद्ध नव्हते, तर पवारांच्या अनुमतीने केलेले होते, याचे पदर पुढच्या काळात उलगडत गेले. ‘भाजपचे लोक काय म्हणतात ते ऐकून घे, असे मीच अजितला सांगितले होते. पण, तो एकदम शपथ वगैरे घेईल, असे वाटले नव्हते’, असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत पूर्वीच म्हटले होते. याचा अर्थ अजितदादांच्या बंडाला राजकीय खेळीचा भाग म्हणून म्हणा, पण पवार यांचा सुरुवातीला आशीर्वादच होता! फडणवीस यांनी त्या आशीर्वादाचा दुसरा टप्पा आता उलगडला आहे एवढेच. एकीकडे भाजपशी सत्ता स्थापनेची चर्चा सुरू ठेवत उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढवायचा, ही पवारनीती असावी. देवेंद्र - अजित सरकारमुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ होतील, अशावेळी त्यांना मुख्यमंत्रिपद द्यायचे आणि महत्त्वाची (गृह, वित्त, जलसंपदा आदी) खाती आपल्याकडे ठेवायची, या रणनीतीअंतर्गत भाजपला सरकार स्थापनेबाबत दिलेला शब्द फिरवला गेला.

फडणवीसांबरोबर सरकार कायम ठेवले तर वर्चस्व फडणवीसांचे असेल. त्यापेक्षा अननुभवी उद्धव ठाकरे आपल्यासाठी सोपे असतील आणि सरकारवर  नियंत्रण ठेवता येईल, वरून साहेबांनी तत्त्वांशी तडजोड स्वीकारली नाही, असे चित्रही उभे करता येईल; या विचारातून तीन दिवसांच्या त्या सरकारमधून अंग काढून घेतले गेले असावे, असा तर्क काढायला मोठा वाव आहे. भाजप आणि फडणवीस यांना हूल देण्यासाठी ते औटघटकेचे सरकार आणले गेले. मुळात साहेबांना भाजपविरोधी सरकारच आणायचे होते, तशी मांडणीदेखील काहींनी त्यावेळी केली होती.  अजित पवार यांचा आम्हाला फसविण्याचा हेतू नव्हता, असे फडणवीस यांनी आधीही म्हटलेले आहे. याचा अर्थ छलकपटाबाबत त्यांनी शरद पवार यांच्याकडे बोट दाखविले आहे. पहाटेचा तो शपथविधी शरद पवार यांच्या अनुमतीनेच झालेला होता, हा फडणवीस यांचा दावा शरद पवार यांनी लगेच खोडून काढला आहे. त्यावेळचा बराच घटनाक्रम खरेतर आजही गुलदस्त्यात आहे. पुतण्याच्या त्या बंडाचे  प्रायोजक काका होते, असे पुण्यातील विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकींचा  प्रचार जोरात असताना सूचित करणे, याला फडणवीसांचे राजकीय टायमिंग म्हणायचे का? शरद पवार - अजित पवार या सुप्तसंघर्षातील फट आणखी मोठी करण्याची फडणवीस यांची खेळी दिसते. २०१९च्या निवडणूक निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला शरद पवार यांचे  राजकारण कारणीभूत होते, असे बिंबविण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न दिसतो. अन्यथा स्वत:च्या जखमेवरील खपली त्यांनी स्वत:च का काढली असती?

Web Title: Editorial - Wounds of early morning love of devendra fadanvis and ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.