- डॉ.भूषण कुमार उपाध्याय शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. याचप्रकारे मानवाचे आरोग्य जेवढे चांगले राहिले, तेवढेच मानवाचे वैयिक्तक आणि सामाजिक जीवन सुखमय आणि दृढ होईल.शिक्षण आणि आरोग्याच्या या अनन्यसाधारण महत्त्वाला समजून भारतीय संस्कृतीमध्ये या दोन्ही बाबींवर फार खोलवर जाऊन विचार केलेला आहे. शिक्षण हे ज्ञानाचे माध्यम आहे. ज्ञान ही मानवाची वैचारिक आणि बौध्दिक क्षमता आहे ज्यामुळे मानव चांगल्या किंवा वाईट या बाबी ओळखू शकतो. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे- ‘नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’. याचाच अर्थ या सृष्टीमध्ये ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही. या ज्ञानामुळेच मानव लौकिक किंवा पारलौकिक यश साध्य करू शकतो. शेवटी या ज्ञानप्राप्तीचे साधन जे शिक्षण आहे, ते सर्वांना सुलभ असणे आवश्यक आहे. ते सर्वांना सुलभ असण्याबरोबरच शिक्षण हे व्यवसायाचे रूप घेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शिक्षण देणारे पूर्णपणे त्यागाच्या भावनेने परिपूर्ण असावेत. शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत, त्या सुध्दा व्यक्ती आणि समाज निर्माणाच्या भावनेने प्रेरित असाव्यात. समाजसेवेच्या भावनेने प्रेरित व्यक्तीच या क्षेत्रांमध्ये आली पाहिजे. पैशांच्या कमतरतेमुळे कोणताही विद्यार्थी त्याच्या इच्छेनुसारच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही. हेच कारण आहे की अनेक विकसित देशांमध्ये शिक्षण-संस्था पूर्णपणे सरकारच्या अमलाखाली आहेत. दुसरीकडे सरकारकडे जमा होणाऱ्या महसुलातील एक मोठा हिस्सा शिक्षणावर खर्च केला जातो. शिक्षण-प्रणाली अशी व्हावी की जिच्यामध्ये मानवाचे शरीर, मन आणि चेतनेचा संतुलित विकास व्हावा.याच प्रकारे आरोग्य हे मानवाच्या समाज आणि सुखी जीवनासाठी आवश्यक आहे. हेच कारण आहे की आयुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की- ‘धर्मार्थकाम मोक्षाणाम् आरोग्यम् मूलमूत्तमम’. याचाच अर्थ चार पुरु षार्थ- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यासाठी आरोग्य हेच मूळ आहे. शेवटी इतक्या महत्त्वपूर्ण असलेल्या आरोग्याकरिता सर्वसुलभता आवश्यक आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी आरोग्यकेंद्र सर्वांकरिता उपलब्ध असावेत. पैसे असले तरच चांगली आरोग्य सुविधा आणि पैसे नसतील तर कमी दर्जाची आरोग्य सुविधा देणे हा व्यावसायिक वृत्तीचाच परिणाम आहे. सरकारच्या महसुलाचा मोठा हिस्सा आरोग्यावर खर्च झाला पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक देखील त्यागवृत्तीच्या भावनेने प्रेरित असावेत.
शिक्षण आणि आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:08 AM