-प्रा. नागनाथ कोत्तापल्लेप्रा. प्रल्हाद लुलेकर विद्यार्थी असल्यापासूनच एक कवी, लेखक आणि चळवळे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्धीस आलेले होते. पुढे त्यांनी ही ओळख अधिक ठळक केली. प्राध्यापक, पत्रकार, वक्ता, प्रशासक, विचारवंत, संशोधक आणि समीक्षक म्हणून समाजहितैषी भूमिकेतून काम करीत महाराष्ट्रात आपली नाममुद्रा उमटवली. या साऱ्या कार्यामागे एकच सूत्र होते, ते म्हणजे आपण समाजाचे देणे लागतो. गोरगरीब, पीडित, शोषितांना न्याय देणे हेच महत्त्वाचे आहे, हा विचार त्यांच्या कृती, वक्तृत्व आणि लेखनातून प्रबळ ठरलेला दिसतो. वैचारिक बैठक असली की, जीवनातील कुठलेही क्षेत्र कसे उजळून निघते, याचे प्राध्यापक लुलेकर एक जिते-जागते उदाहरण आहे. म्हणूनच या कार्याच्या गौरवार्थ हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.जीवनातील बऱ्या-वाईटाच्या परिणामाचा पहिला आविष्कार जर कोठे पाहावयास मिळत असेल, तर तो कलांमध्ये पाहावयास मिळतो. त्यातही साहित्यामध्ये हे परिणाम सर्वाधिक पाहावयास मिळतात. कारण साहित्य इतर कलांच्या तुलनेत प्रत्यक्ष जीवनामध्ये अधिक वावरत असते. म्हणून तर या गौरव ग्रंथात ‘मराठी साहित्य आणि मराठी भाषा यावर जागतिकीकरणाचा परिणाम झाला?’ त्याचा शोध घेतला गेलेला आहे. या ग्रंथामध्ये चार विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागात जागतिकीकरण म्हणजे काय? त्याचे एकूण समाजावर, भाषा आणि साहित्य क्षेत्रावर नेमके काय परिणाम झाले, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिकीकरण म्हणजे नेमके काय हे सांगणारा डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे यांचा लेख ‘जागतिकीकरण : अर्थ आणि अनर्थ’ अभ्यासपूर्ण आहे. जागतिकीकरणामुळे झालेल्या ग्रामीण इलाख्याच्या उद्ध्वस्तीकरणाचा अभ्यासपूर्ण वेध प्रा. यशपाल भिंगे यांनी घेतला आहे. शहरापासून खेड्यापर्यंत तयार झालेले असंख्य प्रश्नांचे मोहोळ किती दाहक आहे, हे दोन लेख वाचले की, सहज लक्षात येते. जागतिकीकरणामुळे धर्म, संस्कृती, समाज, राजकारण हे सारेच बदलले आहे. याचा परिणाम मराठी साहित्यावर दिसू लागला. या परिणामांचा वेध घेणारे दोन लेख प्रा. वसंत आबाजी डहाके आणि प्रा. रणधीर शिंदे यांनी लिहिले आहेत. त्यांनी एकूण सर्व वाङ्मय प्रकारांची आणि सर्व प्रवाहांची अंतर्मुख करणारी निरीक्षणे जागतिकीकरणाच्या संदर्भात तपासली आहेत.वाङ्मय प्रकारनिहाय परिवर्तने शोधण्याचा प्रयत्न दुसऱ्या भागात करण्यात आला आहे. यासंबंधीचे ९ लेख यात समाविष्ट आहेत. या विभागात प्रमुख वाङ्मय प्रकाराबरोबर साहित्याच्या सीमारेषांवर वावरणाऱ्या चरित्र-आत्मचरित्र लेखनातील स्थिती-गतीचाही विस्ताराने वेध घेण्यात आला आहे. अर्थशून्यता, असंबद्धता आणि वस्तुकरण या जागतिकीकरणानंतरच्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. या दृष्टीने कवींनी प्रतिसाद दिल्याचा डॉ. वसंत पाटणकरांचा निष्कर्ष आहे. मराठी कथा विविध भौगोलिक प्रदेश, विविध सामाजिक स्तर आणि भिन्न समूहांकडून लिहिली जात असताना कूस बदलते आहे. त्यामुळे तिचे दुय्यमत्व गळून पडले आहे, असे आसाराम लोमटे यांना वाटते. १९९० नंतरच्या कादंबरीचा विचार करताना, डॉ. महेंद्र कदम यांनी प्रयोगशीलतेच्या अंगाने केला आहे. मानवी अस्तित्वालाच वस्तुरूपत्व प्राप्त होत आहे, हे चिंतन या लेखातून येते. आजच्या नाटकावर प्रा. प्रवीण भोळे यांनी प्रकाश टाकला आहे.१९९० नंतर ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, दलित आत्मकथन यासंबंधीचे अनुक्रमे डॉ. दत्तात्रय घोलप, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. वासुदेव मुलाटे यांनी केलेले विवेचन महत्त्वपूर्ण आहे. १९९० नंतरच्या नियतकालिकांचे स्वरूप आणि मूल्यमापन करणारा प्रवीण दशरथ बांदेकर यांचा महत्त्वाचा लेख यात समाविष्ट करण्यात आला आहे. यासोबतच ‘अभिधा’ आणि ‘अभिधा’नंतरच्या नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या समीक्षेचा विचार डॉ. आशुतोष पाटील यांनी केला आहे.तिसऱ्या भागात १९७५ नंतर निर्माण झालेल्या वाङ्मयीन प्रवाहासंबंधीचे लेख आहेत. ग्रामीण साहित्य प्रवाह आणि ग्रामीण जीवन यात झालेल्या परिवर्तनाचा सूक्ष्म भेद (डॉ. माधव पुटवाड), जागतिकीकरणासंदर्भात दलित साहित्याचा वेध (डॉ. महेंद्र भवरे), जागतिकीकरणानंतरचे आदिवासींचे जीवन (डॉ. विनोद कुमरे) यांच्याबरोबरच प्रा. फ. म. शहाजिंदे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अलका वालचाळे, निरंजन घाटे व डॉ. पृथ्वीराज तौर यांचे अनुक्रमे मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, विज्ञान व बाल साहित्यावरील लेख महत्त्वाचे आहेत. ग्रंथाच्या चौथ्या भागात डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि लेखकाचा परिचय करून देणारे चार लेख आहेत. डॉ. यशवंत मनोहरांसह अन्य निकटवर्तीयांनी लिहिलेले हे लेख मुळातून वाचलेच पाहिजेत, असेच आहेत.(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
जागतिकीकरणाचा मराठी संस्कृतीवरील परिणाम
By admin | Published: June 25, 2017 1:37 AM