- धर्मराज हल्लाळे
सद्या सोशल मीडियात एक संदेश फिरतोय, महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पावसात भिजण्याने आणि ममतांच्या खुर्चीवरून प्रचार करण्याने कमळ कोमेजले. निमित्त म्हणून त्याकडे पाहू शकतो. मात्र सत्ता बदलाची, अनंत कारणे असतात. आता पश्चिम बंगालच्या निकालानंतर कोणाचा तरी करिश्मा संपला, एकाधिकारशाहीला लगाम लागला असे म्हटले जाईल. मुळात अखंड भारत देशात कोणा एकट्याचा करिश्मा असू शकत नाही. त्यामुळे तो संपण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. अर्थातच कोणाची एकाधिकारशाही इथे अवतरू शकत नाही, हे राजकीय वास्तव आहे. जगातील सर्वाधिक समृद्ध लोकशाही भारतातच नांदते. विविधतेने नटलेला देश, नानाविध भाषा, परंपरा हे वैविध्यच आपली लोकशाही कायम जिवंत ठेवत आहे आणि ठेवणार आहे. जे उत्तरप्रदेशात उगवते ते पश्चिम बंगालमध्ये पेरले जाऊ शकत नाही. त्यामुळे एकच फुल सगळीकडे डोलू शकत नाही, हे प. बंगालच्या निकालाने स्पष्ट केले. घटनाकारांनी विचारपूर्वक संघराज्य पद्धत देशाला दिली. केंद्राला सर्वाधिक अधिकार देताना राज्याचे हित जपले आहे. केंद्राची जशी सूची आहे, तसे सामायिक आणि स्वतंत्र राज्य सूचीत राज्याचे विषय, अधिकार अबाधित आहेत. त्याला अनुसरून कायदे आहेत. घटना सर्वोच्च आहे. ज्यामुळे देश एकसंघ आहे. त्यात केंद्राने राज्यांवर अतिक्रमण करू नये आणि राज्यांनी स्वतःचे अस्तित्व जपताना स्वायत्त होण्याची भूमिका घेऊ नये, हे अपेक्षित आहे. परंतु अलिकडे केंद्र आणि राज्याच्या कुरघोड्या आपण पाहत आहोत. आरोप प्रत्यारोप होत आहेत. ममतांनीही असेच ललकारले होते. सीबीआय प्रकरण गाजले. राज्याची पोलीस आणि केंद्राची यंत्रणा आमने सामने आली. असे प्रसंग पेच निर्माण करणारे आहेत. महाराष्ट्रातही हे घडले. ममता ज्या तऱ्हेने बहुमत घेऊन पुढे आल्या त्यावरून काय सिद्ध होते? त्या-त्या राज्यातील प्रभावी नेतृत्व, प्रादेशिक पक्ष देशातील राजकीय समतोल साधणार, हे दिसते. त्यावरून सर्व अंदाज मांडणे घाईचे ठरेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकष वेगळे आहेत. आजच्या विजयाचा संदर्भ उद्या तसाच राहणार नाही. मात्र आव्हान उभे राहिले आहे हे पक्के. जे एकहाती सत्तेला जबर हादरा देऊ शकते. अर्थात सर्व प्रादेशिक पक्षांची मोट मजबूत झाली तरच.प. बंगाल निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार, ही चर्चाही आता काही काळ थांबेल. मुळात त्या चर्चेला काही अर्थ नव्हता. राष्ट्रवादी-शिवसेनेने गाठ बांधणे, त्यात काँग्रेसने सत्तेत सहभागी होणे हे समांतर रेषा एकत्र येण्यासारखे आहे. ज्या तीव्रतेने तीन पक्ष एकत्र आले आहेत, त्यामागची जी कोणती ऊर्जा आहे, ती सहज विस्कटणारी नाही. तिन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर जाणे परवडणारे नाही. त्यामुळे ते एकमेकांना सावरतील, अगदी कितीही वादळे आली तरी. शेवटी राजकारणात काहीही घडू शकते हे गृहित धरावे लागते !