नोबेल पारितोषिक विजेते महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी १९२२ साली जपान भेटीदरम्यान हॉटेलमधील कुरियर बॉयला टीपच्या रूपात एका कागदावर लिहून दिलेल्या या आनंदाच्या सिद्धांताचा नुकताच जेरुसलेममध्ये लिलाव झाला. आईन्स्टाईन यांनी ज्या कुरियर बॉयला ही चिठ्ठी लिहून दिली होती त्याच्या नातेवाईकांनी तिची विक्री केली.‘यशाच्या मागे धावण्याने नेहमी अस्वस्थताच पदरी पडते. याउलट शांत आणि साधेपणाचे जीवन अधिक आनंद देते.’ हा आनंदी जीवनाचा सिद्धांत महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी १९२२ साली जपानच्या एका हॉटेलमधील कुरियर बॉयला कागदावर लिहून टीप म्हणून दिला होता. कारण त्यावेळी त्यांच्याजवळ त्याला टीप द्यायला पैसे नव्हते, आणि आता तब्बल ९५ वर्षांनंतर त्यांचा हा फॉर्म्युला लिलावात १५ लाख डॉलर्सला (सुमारे १० कोटी रुपये) विकला गेला आहे. विशेष म्हणजे, तू भाग्यवान असशील तर कुठल्याही टीपपेक्षा ही चिठ्ठी अधिक मौल्यवान ठरेल, असेही आईनस्टाईन यांनी त्या कुरियर बॉयला सांगितले होते. आणि ते तंतोतंत खरेही ठरले. लिलावात मिळालेली ही किंमत आईनस्टाईन यांच्या हस्तलिखितासाठी असली तरी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणाºया या महान शास्त्रज्ञाचा आनंदाचा हा सिद्धांत या भौतिकवादाच्या जगातही किती प्रासंगिक आहे.विशेषत: आजच्या धकाधकीच्या परिस्थितीत जेथे माणूस यश प्राप्त करण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेत अक्षरश: जीवाचे रान करीत आहे. यशाच्या मागे धावत असताना आपली सुख-शांती गमावून बसला आहे. सुख कशात असते? मानले तर एखाद्या लहानशा गोष्टीत नाहीतर अब्जाधीश होऊनही ते मिळत नाही, असे सांगितले जाते. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आताशा या सुखाच्या व्याख्या विविध परिमाणांवर तयार केल्या जात आहेत. सुख पैशाने विकत घेता येत नाही, असा आजवरचा समज होता. पण संशोधकांनी तो नाकारला असून पैशाने सुख विकत घेता येते असा त्यांचा दावा आहे. सुखाच्या आसक्तीसोबतच जीवनासक्तीनेही माणसाच्या आनंदाच्या व्याख्या कालपरत्वे बदलत आल्या आहेत. मानव आज मृत्यूवर विजय मिळविण्याची स्वप्ने बघत असून त्यांच्या पूर्णत्वाच्या दिशेने त्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. पुढील काही दशकात कदाचित विज्ञानाने प्रगतीचे एवढे उच्च शिखर गाठले असेल की मानवाच्या शरीरातील एकएक अवयव अगदी सहजपणे बदलविता येईल. एकाअर्थी ती अमरत्वाच्या दिशेने केलेली वाटचालच असेल. इंग्लंडमधील एका १४ वर्षीय कर्करोगग्रस्त मुलीने आपल्याला जगण्याची दुसरी संधी मिळावी अशी याचना न्यायालयाकडे केली होती, आणि तिच्या इच्छेनुसार तिचे पार्थिव तिच्या आईकडे गोठविण्यासाठी देण्यात आले. भविष्यात अमरत्व प्राप्त करणारे तंत्रज्ञान विकसित झाल्यास तिला जगण्याची दुसरी संधी मिळेलही. माणूस अमर होईलही पण काय तो आनंदी राहू शकेल? आनंदी देशांच्या यादीत भारत १२२ व्या क्रमांकावर असल्याचे मध्यंतरी वाचनात आले होते. आपल्या नागरिकांच्या चेहºयावर हास्य फुलविण्याकरिता स्वतंत्र आनंद विभाग स्थापन करण्याचेही प्रयोग हल्ली केले जात आहेत. एकूणच सध्याच्या या वेगवान जगाने लोकांचा आनंदच हिरावून घेतला असताना आईनस्टाईनचा हा सिद्धांत प्रत्येक व्यक्तीस आनंदी आणि शांत जीवन जगण्यात मदतगार ठरणारा आहे.
आईनस्टाईनचा आनंदाचा सिद्धांत आणि मानव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:10 AM