यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
लोकसभा निवडणुकीतील दमदार यशामुळे काँग्रेसला विधानसभेत किमान १२० जागा महाविकास आघाडीत लढायला मिळतील असे वाटत होते आणि तसा दावादेखील या पक्षाचे नेते करत होते; पण उद्धवसेना आणि शरद पवार गटाने त्यांना आजतरी आपल्या बरोबरीत आणून ठेवले. ८५-८५-८५ असे सूत्र ठरल्याचे नेत्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ ३३ जागांचा फैसला व्हायचा आहे. त्यात काँग्रेसला आणखी ओढून-ताणून १५-२० जागा मिळतील. याचा अर्थ १२० पासून काँग्रेस दूरच राहील असे दिसते.
शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या नेत्यांनी जोर लावला तरच चमत्कार होऊ शकतो. महायुतीतील एकमेव राष्ट्रीय पक्ष भाजप हा १५० पेक्षा अधिक जागा लढवत असताना मविआतील एकमेव राष्ट्रीय पक्षाला (काँग्रेस) त्याच्या मित्रांनी रोखले आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपने वर्चस्व राखले, काँग्रेसच्या नेत्यांना ते जमलेले दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत १७ जागा लढून काँग्रेसने १३ जिंकल्या, १४ वी सांगलीची जागा त्यांचीच आली, तरीही विधानसभेच्या जागावाटपात काँग्रेसने इतकी कच का खाल्ली असावी? ‘मित्रांना सांभाळून घ्या’ या दिल्लीच्या निरोपामुळे आक्रमक नाना पटोलेंऐवजी मध्यस्थीसाठी मवाळ आणि राजकीय सभ्य बाळासाहेब थोरातांना मातोश्री, सिल्व्हर ओकला पाठविले तेव्हाच या गोष्टीचा अंदाज आला. मविआतील दोन मित्रांनी काँग्रेसला दमवले. तिकडे महायुतीत भाजपला अजित पवारांचा जास्त त्रास नाही; पण एकनाथ शिंदे भाजपला दमवत आहेत. ते भाजपला १६० वगैरे जागा मिळू देतील, असे वाटत नाही. तरीही लोकसभेला भाजप २८ जागा लढला, त्यातल्या फक्त नऊ निवडून आल्या, या पार्श्वभूमीवर दीडशेहून अधिक जागा त्यांनी घेतल्या तर तेही यशच म्हणावे लागेल.
प्रस्थापितांनाच संधी का?
शिंदेसेना आणि उद्धवसेना, शरद पवार गटातील बहुतेक आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली याचे काही अप्रूप वाटत नाही. शिंदेंना बंडात ज्यांनी साथ दिली त्यांना उमेदवारीचे रिटर्न गिफ्ट मिळाले. आपल्यासोबत निष्ठेने राहिले त्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. अजित पवार यांनीही आपल्यासोबत आलेल्या बहुतेक आमदारांना संधी दिली; हेही अपेक्षितच. शरद पवार यांच्याकडे आमदारच कमी आहेत. त्यांनी इलाज शोधला. ते देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कृषीमालाच्या आयात-निर्यातीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे, आता ते उमेदवार आयात करत आहेत. इतर सर्व पक्ष प्रस्थापितांना उमेदवारी देत असताना शरद पवार इतर पक्षांमधील विस्थापितांना उमेदवारी देत आहेत.
शिंदे-अजित पवारांमध्ये तुलना केली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की शिंदेंनी उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान उभे केले, तुल्यबळ शिवसेना उभी केली. अजितदादांना मात्र तिकिटासाठी लोक सोडून जाताहेत. एकतर शिंदेंचे दातृत्व अफाट आहे, शिवाय मुख्यमंत्रिपद असल्याने देण्यासाठीचे अनेक मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. दिलेला शब्द पाळतात. ‘मला हलक्यात घेऊ नका’ असे शिंदे मध्यंतरी म्हणाले होते. त्यांचे हे वाक्य सोपे वाटते पण सोपे नाही. त्याचा प्रत्यय येत आहेच आणि येत राहील.
भाजपच्या पहिल्या यादीत ९९ पैकी ७९ विधानसभा सदस्य आहेत. आमदार रिपीट करण्यामागे भाजपची काय मजबुरी असावी? आमदारांशिवाय जिंकू शकत नाही, असे चित्र भाजपमध्ये का तयार झाले? एकतर महाराष्ट्रातील भाजप कधी नव्हे एवढा गेल्या तीन-चार वर्षांत आमदारांच्या दावणीला बांधला गेला. आधी मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आमदारांना ऐकावे लागायचे, आता पक्ष आमदारांचे ऐकतो. सकाळी आमदारांच्या बंगल्यावर पोहोचून, ‘साहेब! आज काय काय करायचे आहे सांगा’ असे विचारतात. तसेही एखादा पक्ष आमदारांचा पत्ता तेव्हाच कापू शकतो जेव्हा राज्यात त्या पक्षाची मोठी लाट असते किंवा एखाद्या बड्या नेत्याची लाट असते. यावेळी महाराष्ट्रात लाट दिसत नाही. लोकसभेला लाट असल्याचे अनेकांना वाटत होते; पण तसे काही नाही हे शेवटच्या टप्प्यात लक्षात आले, तोवर शर्ट उडून गेला होता; मग पँट कशीबशी सावरता आली.
सर्वपक्षीय घराणेशाही
सर्वपक्षीय घराणेशाही लोकशाहीची चेष्टा करायला निघाली आहे. पूर्वी एकाच घरातील दोन नेते एका पक्षात राहायचे, आता दोन-तीन माणसे दोन-तीन पक्षात दिसत आहेत. उद्या एखाद्या नेत्याच्या बंगल्यात गेलात तर समोरच्या हाॅलमध्ये भेटलेला कुटुंबातील सदस्य भाजपमध्ये, बेडरूममध्ये भेटलेला उद्धव सेनेत आणि दुसऱ्या बेडरूममधला सदस्य शरद पवार गटात असेही चित्र दिसू शकेल. यावेळी बंडखोरी मोठ्या प्रमाणात का दिसत आहे? कारण दोन्हीकडील तीन पक्षांच्या युती/आघाडीमुळे कोण्या एकाच पक्षाला संधी मिळते मग उरलेल्या दोन पक्षातील लोक बंडखोरी करतात. तसेच दोन-अडीच वर्षात कोणालाही नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष होता आलेले नाही किंवा कोणाला बनवता आलेले नाही. चला एकदा विधानसभेचा फड अजमावून घेऊ, हा विचार त्यातून आला आहे.
जाता जाता:
पाच-सात असे मोठे नेते महाराष्ट्रात आहेत की ज्यांच्या मुलांचे केस पांढरे व्हायला आले तरी बाप जागा सोडायला तयार नाही. मीच लढतो म्हणतात. अहो! मुलांना लढू द्या, नाही तर तुमच्याच घरात अजित पवार कधी जन्माला आले, ते कळणारही नाही. आयुष्यभर तुम्हीच गाडी चालवाल असे नसते, कधीतरी मुलाच्या हाती स्टिअरिंग द्यावे लागते.-yadu.joshi@lokmat.com