राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हा देशाच्या राजकारणातला फारसा महत्त्वाचा विषय नाही. मात्र या निवडणुकीतील एखाद्या जागेसाठी राष्ट्रीय पक्ष त्यांची प्रतिष्ठा पणाला लावतात तेव्हा मात्र हा विषय देशाच्या चर्चेचा होतो. गुजरातमधून राज्यसभेवर पाठवायच्या तीन सदस्यांची निवडणूक नुकतीच झाली. तीत सत्तारूढ भाजपजवळ दोन उमेदवार सरळ निवडून आणण्याएवढे आमदारांचे संख्याबळ होते. तिसºया उमेदवारासाठी त्याला विरोधी पक्षांची काही मते मिळविणे आवश्यक होते व त्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठाही केली. विरोधी पक्षांची मते मिळविण्यासाठी भाजपने तेथे ‘घोडेबाजार केला’ अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडेही दाखल केली. मात्र त्याही स्थितीत ती निवडणूक झाली आणि भाजपचे अमित शाह आणि स्मृती इराणी हे दोन उमेदवार विजयी झाले. सारे प्रयत्न करूनही त्या पक्षाला आपला तिसरा उमेदवार विजयी करता आला नाही. त्या जागेवर काँग्रेस पक्षाचे अहमद पटेल हे निवडून आले. अहमद पटेल हे गेली काही दशके संसदेत राहिलेले काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे विश्वसनीय कार्यकर्ते आहेत. ते निवडून यावे यासाठी काँग्रेस पक्षानेही आवश्यक ते सारे प्रयत्न केले. आपले आमदार फुटणार नाहीत म्हणून त्यांना त्या पक्षाने बेंगळुरूरची वारी घडविली. ऐन मतदानाच्यावेळी त्या आमदारांना सभागृहात आणून त्यांचे मतदान त्या पक्षाने घडविले. दरम्यान ज्या राजकीय घडामोडी गुजरातमध्ये झाल्या त्या साºयांनाच त्यांचे डोळे उघडायला लावणाºया आणि अचंबित करणाºया आहेत. जदयू या पक्षाचे दोन आमदार विरोधात जातील असे आरंभी म्हटले गेले. मात्र त्याच्या एका आमदाराने भाजपच्या बाजूने मत दिले. परिणामी तो पक्ष त्या राज्यात दुभंगलेला दिसला. मात्र त्याहून जास्तीची फटफजिती शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली. पवार आणि त्यांचा पक्ष कधी काँग्रेसची तर कधी भाजपची साथ करताना अलीकडच्या काळात दिसला. सामान्यपणे सत्तेच्या बाजूने झुकण्याची भूमिका घेऊनच शरद पवार एवढी वर्षे महाराष्ट्राच्या व देशाच्याही राजकारणावर स्वार राहिले. या निवडणुकीत आम्ही कुणाला मत द्यायचे ते अद्याप ठरविले नाही हे पवारांनी प्रफुल्ल पटेलांकडून पत्रकारांजवळ अनेकवार सांगितले. स्वाभाविकच काँग्रेसला त्यांच्या मतांची आशा होती. मात्र सत्तेच्या जवळ राहण्याची पवारांची सवय भाजपलाही ती मते आपल्याला मिळतील असे वाटायला लावणारी होती. मात्र या नेत्यांच्या अगोदर राष्ट्रवादीच्या त्या आमदारांनीच आम्ही भाजपला मत देत आहोत व तसे आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलेही आहे हे उघड केले. त्यातून राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची गुजरातमधील त्यांच्या आमदारांवरील पकड सुटली असल्याचे स्पष्ट झाले. नेत्यांच्या अनुमतीशिवाय हे आमदार असे मतदान करायला राजी झाले असतील तर त्याचा एवढाच एक अर्थ होऊ शकतो. आमदारांच्या पश्चात प्रफुल्ल पटेलांनीही आम्ही भाजपला मत देणार असल्याचा ‘निर्णय’ जाहीर करून आपली ‘अग अग म्हशी’ अशी झालेली अवस्था दडविण्याचा केविलवाणा प्रयत्नच तेवढा केला. या निवडणुकीत काँग्रेसचीही दोन मते भाजपच्या पुढाºयांनी मिळविली. मात्र ती मिळविताना त्यांच्यावर त्या पक्षाने पुरेसा विश्वास ठेवला नाही. मतदान करताच आपली मतपत्रिका तुम्ही आम्हाला दाखवा असे त्यांना बजावले गेले. त्याप्रमाणे त्या आमदारांनी मतदानानंतर आपली मतपत्रिका भाजपच्या लोकांना प्रत्यक्ष दाखविली. हा प्रकार त्यांच्यात झालेल्या सौदेबाजीवर प्रकाश टाकणारा होता व तसाच तो निवडणूक अधिकाºयांनी विचारात घेतला. निवडणुकीतील मतदान गुप्त असते ही बाब ठाऊक असतानाही स्वत:ला लोकांचे प्रतिनिधी म्हणविणारे लोक जेव्हा आपल्या मतपत्रिका जाहिरातीसारख्या सौदेबाजी केलेल्या लोकांना दाखवितात तेव्हा त्यांची झालेली खरिददारी व लायकी या दोन्ही गोष्टी साºयांच्या लक्षात येतात. विधान परिषदा आणि राज्यसभा यांच्या होणाºया निवडणुका पैशाच्या प्रचंड देवाणघेवाणीतून होतात हे उघड सत्य आहे. एकेका मताचा दर ३५ लाखांपासून काही कोटींपर्यंत या निवडणुकीत जात असतो. पाच वर्षे आमदार म्हणून मिळविलेल्या पगाराहून ही रक्कम अधिक मोठी व आकर्षक असते आणि लोकनिष्ठा वा पक्षनिष्ठा यापेक्षा ज्यांना स्वार्थ मोठा वाटतो ते त्या आकर्षणाला स्वाभाविकच बळीही पडत असतात. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन आपली मते भाजपला विकणाºया आणि ती विकल्याचे त्यांना दाखविणाºया त्या दोन आमदारांच्या धाडसाचेही आपण कौतुक केले पाहिजे. सामान्यपणे पैसे घेणारी वा खाणारी माणसे आपल्या माना खाली घालून जगतात. आपली अशी कमाई ज्यामुळे उघड होईल ते पुरावे ते जगासमोर आणत नाहीत. या दोन आमदारांच्या साहसाचा भाग हा की त्यांनी भाजपशी सौदेबाजी केली आणि ती केल्याचा पुरावाही विधिमंडळाच्या कक्षातच जगाला दाखविला. या निवडणुकीने काँग्रेस पक्षाचे दुबळेपण, भाजपचे आक्रमक बाजारीपण, जदयूचे फुटीरपण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विकाऊपण या साºयाच गोष्टी एकावेळी देशाला दाखविल्या. सबब ही निवडणूक राजकीयदृष्ट्या शैक्षणिक झाली असेही म्हटले पाहिजे.
राजकीय शिक्षण समृद्ध करणारी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:15 AM