आता बसल्या जागेवरून इलेक्ट्रॉनिक युद्धं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 07:59 AM2024-10-08T07:59:11+5:302024-10-08T08:00:07+5:30

हमासचा एक मास्टरमाइंड याह्या अय्याश जागीच मारला गेला! 

electronic warfare from your seat now | आता बसल्या जागेवरून इलेक्ट्रॉनिक युद्धं!

आता बसल्या जागेवरून इलेक्ट्रॉनिक युद्धं!

स्थळ : गाझा पट्टी. तारीख- ६ मार्च १९६६. हमासचा एक मास्टरमाइंड याह्या अय्याश आपला लहानपणीचा मित्र ओसामा हमदच्या घरी त्यादिवशी मुक्कामाला आला होता. त्याचवेळी हमदच्या घरातील फोन वाजला. अय्याशला सांगितलं गेलं, तुझ्या वडिलांचा फोन आहे. ते तुझ्याशी बोलू इच्छितात. आपल्या मित्राच्याच घरी आणि मित्रानंच सांगितलं म्हटल्यावर अय्याश लगेच फोनजवळ गेला. त्यानं फोन उचलला. बोलायला लागला आणि तेवढ्यात मोठा धमाका झाला. हमासचा एक मास्टरमाइंड याह्या अय्याश जागीच मारला गेला! 

इस्रायलची गुप्तचर संस्था शिन बेटचे माजी संचालक कार्मी गिलोन यांचं म्हणणं आहे, त्यांच्याच संघटनेनं अय्याशला या आधुनिक पद्धतीनं ठार केलं होतं. अय्याशला मारण्यापूर्वी शिन बेटच्या एका एजंटनं पैशांची लालूच दाखवून हमदच्या काकांकडून अय्याशची माहिती घेतली होती, तो हमदकडे केव्हा येणार, किती वाजता येणार वगैरे. आम्हाला फक्त हमद आणि अय्याश यांच्यातील बोलणं ऐकायचं आहे, असं सांगून त्याचे खिसे भरपूर गरम केले गेले. या आमिषाला तो भुलला आणि त्यानं अय्याशची सगळी माहिती पुरवली. त्या फोनमध्ये १५ ग्रॅम आरडीएक्स फिट करण्यात आलं होतं. अय्याशनं फोन उचलताच रिमोट कंट्रोलच्या साहाय्यानं स्फोट केला गेला आणि अय्याशला आपला जीव गमवावा लागला. 

या घटनेनंतर हमास, हिजबुल्लाह आणि जगातील अनेक अतिरेकी संघटना सतर्क झाल्या आणि हमासनं तर असे धोके टाळण्यासाठी त्यानंतर सॅटेलाइट फोनचा वापर सुरू केला, तर हिजबुल्लाहनं रेडिओ वेव्हवर चालणाऱ्या पेजरचा आधार घेतला. गेल्यावर्षी सात ऑक्टोबरला इस्त्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहनं पेजर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवला होता. इस्त्रायलची गुप्तचर संस्था आपल्याला ट्रॅक करू नये यासाठीची ही चाल होती.
 
आता काही दिवसांपूर्वीचीच घटना. लेबनॉनमधील अनेक शहरांतील घरांत, रस्त्यात, बाजारात असलेल्या लोकांच्या खिशातील आणि हातातील पेजरचे एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले. या सिरियल ब्लास्टमध्ये अनेक लोक ठार झाले तर हजारो लोक जखमी झाले. लेबनॉनची राजधानी बैरुतपासून ते अगदी सिरियापर्यंत हे सिरियल पेजर ब्लास्ट झाले. हिजबुल्लाहचे सदस्य तर यात मारले गेले, जखमी झालेच, पण सर्वसामान्य नागरिकही यात रक्तबंबाळ झाले. या पेजर ब्लास्टमुळे संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा नव्यानं या आधुनिक युद्धाची चर्चा सुरू झाली आहे. 

मुळात हे पेजर म्हणजे काय? त्याचा स्फोट कसा होतो? हिजबुल्लाहचे सदस्य आणि नागरिकही एवढ्या मोठ्या प्रमाणात पेजर का वापरत होते? - पेजर हे एक वायरलेस डिव्हाइस आहे. १९५०मध्ये न्यूयॉर्क शहरात पहिल्यांदा त्याचा वापर केला गेला. त्यावेळी ४० किलोमीटरच्या परिघात याद्वारे संदेश पाठवता यायचा. १९८० च्या दशकांत संपूर्ण जगात पेजरचा वापर सुरू झाला, पण २००० नंतर वॉकीटॉकी आणि मोबाइलनं पेजरची जागा घेतली. 

पेजरच्या सहाय्यानं व्हॉइस मेसेज आणि अल्फान्यूमेरिक संदेश पाठवता येतात. त्यासाठी रेडिओ वेव्हचा उपयोग केला जातो. बेस स्टेशनवर असलेल्या ट्रान्समीटरच्या साहाय्याने हे संदेश पाठविले जातात. ॲडव्हान्स पेजर्सना फोन नंबरप्रमाणे कोड नंबर दिले जातात. हा कोड डायल केला की फक्त त्या ठराविक पेजरवर संदेश ट्रान्सफर होतो. संवादासाठीचं हे अतिशय सुरक्षित माध्यम मानलं जातं. हे माध्यम सहजासहजी ट्रेस करता येत नाही. पेजरचा नंबरही सहजपणे बदलता येतो. त्यामुळे पेजरचा पत्ता शोधणं अतिशय अवघड होऊन बसतं. एकदा चार्ज केला की हा पेजर आठवडाभर सहज चालतो. त्यामुळे रिमोट लोकेशनमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

या पेजर्सचे एकामागोमाग एक स्फोट झाले तरी कसे? काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, पेजरमधील लिथियम बॅटऱ्या ओव्हरहीट करून त्यांचा स्फोट घडवून आणला गेला, पण बहुतांश तज्ञांच्या मते पेजर्सची निर्मिती करतानाच त्यात स्फोटकं पेरली गेली. एक विशिष्ट संदेश पाठवल्यावर त्याचा स्फोट होईल अशी व्यवस्था त्यात करण्यात आली. इस्त्रायलची मुख्य गुप्तहेर संघटना मोसादनं हिजबुल्लाहच्या पाच हजार पेजर्समध्ये ३ ग्राम स्फोटकं पेरली होती, असाही दावा केला जातोय. 

युक्रेननं रशियावर उलटवला होता डाव

युद्धासाठी आणि इतर कारणांसाठी जगाला प्रत्यक्ष सैन्याची गरज यापुढेही लागेल, पण आता अशा छुप्या, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनंच पुढची युद्धं होतील. आपल्या हातातील मोबाइल आपल्यालाच मारू शकेल. इलेक्ट्रॉनिक हत्यारे बनवण्यात रशियाचा हातखंडा, पण त्याच तंत्राचा वापर करताना युक्रेननं त्यांच्यावरच डाव उलटवला होता. एकाच ठिकाणी लपलेले रशियाचे चारशे सैनिक मोबाइलचा वापर करत होते. त्यांचं लोकेशन मिळताच त्यांना उडवलं गेलं होतं!


 

Web Title: electronic warfare from your seat now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.