भन्नाट म्हणा, अफलातून म्हणा, लहरी म्हणा की धनवान अवलिया म्हणा, पण इलॉन मस्क हा माणूस एकदम मस्त आहे. त्यांची विचार करण्याची पद्धत, स्वप्ने, व्यवहार आणि महत्त्वाचे म्हणजे हाताशी गडगंज पैसा असल्यामुळे मनात येईल ती जोखीम घ्यायची तयारी... सारे काही जगावेगळे आहे. आपणा बापुड्या भारतीयांसाठी तर इलॉन मस्क यांनी चुटकीसारखी कैक अरबो-खरबोमध्ये मनाला वाटेल ती कंपनी विकत घेण्याच्या गोष्टी किंवा गुंतवणूक किंवा थेट अरब अमिरातीच्या राजपुत्राशीच घेतलेला पंगा हे सारे काही सिंदबादच्या सफरीसारखे स्वप्नवत आहे. मुळात स्पेस-एक्सच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी लावलेले अंतराळ सफरीचे वेड पाहता ते पृथ्वीतलावरचे बिच्चारे मनुष्यप्राणी वाटतच नाहीत. त्यांना वेड आहे अंतराळाचे, सूर्यमालेतील ग्रहांचे.
केवळ आपण स्वत:च नव्हे, तर ज्यांच्याकडे भरपूर पैसे खर्च करण्याची ताकद आहे त्या सगळ्यांनाच घेऊन अंतराळ सफारीवर निघण्याचा त्यांचा बेत भन्नाट आहे. अशा एका कुपीत बसवून त्यांनी काहींना ती सफर घडवून परत आणलेही. एकीकडे असे ब्रह्मांडाचा ठाव घेण्याचे वेड जगाला आकर्षित करते, तर दुसरीकडे टेस्ला कारच्या रूपाने विजेवर चालणाऱ्या, चालकाशिवाय प्रवास घडविणाऱ्या गाडीच्या निमित्ताने जगातल्या प्रत्येकाच्या तोंडी त्यांचेच नाव असते.
बरे, माणसाने हे दोन उद्योग चांगले चाललेत तर शांतपणे पैसा कमवावा, जगातला श्रीमंत उद्योजक म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यांत फिरून भाषणे द्यावीत. पण, इलॉन मस्क यांना हे असे चाकोरीत चालणे, व्यवसाय करणे, स्वत:ला बांधून घेणे अजिबात आवडत नसावे. गेल्या जानेवारीत त्यांनी टेस्ला कारवर भारतात लावल्या जाणाऱ्या आयात शुल्काचा विषय काढला आणि महाराष्ट्र, तेलंगण, पंजाब, पश्चिम बंगालच्या मंत्र्यांनी मस्क यांना गुंतवणुकीसाठी आवाहन केले. जणू काही उद्याच टेस्लाचे भूमिपूजन होईल अशी आठवडाभर चर्चा रंगली. आता बघा... ट्विटर कंपनीचे नऊ टक्के शेअर त्यांनी रोखीने खरेदी केले. ते त्यांनीच जगापुढे आणले. सर्वाधिक शेअर त्यांच्याकडे असल्यामुळे साहजिकच ते संचालक मंडळात जाणार असे बोलले गेले. ते आले की काय होईल यावर आधीचे संचालक चिंतेत पडले. मग त्यातून काहीतरी मार्ग निघाला आणि सीईओ पराग अग्रवाल यांनी जाहीर केले, की इलॉन मस्क संचालक मंडळावर नसतील. त्याचवेळी उगीच कशाला आगीशी खेळायचे म्हणून कंपनीच्या मालमत्ता सांभाळणाऱ्या व्हॅनगार्ड समूहाने जास्तीचे शेअर घेतले आणि मस्क यांच्यापेक्षा थोडे अधिक म्हणजे १०.३ टक्के शेअरसह सर्वांत मोठा गुंतवणूकदार हा मस्क यांचा बहुमान काढून घेतला.
दरम्यान, जगात चाळीस कोटी लोक ट्विटर वापरत असले तरी ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटी-कोटींमध्ये आहे ते महिनोन महिने ट्विट करीत नसतील, तर कंपनी कशी टिकणार व वाढणार असा सवाल करीत मस्क यांनी सगळ्या सेलेब्रिटींना कामाला लावले. तरीदेखील संचालक मंडळातून बाहेर ठेवले गेल्याने मस्क यांचा अहंकार दुखावला असेल. तेव्हा, ‘तुमच्या कंपनीची किंमत किती, रोख पैशात खरेदी करतो’, अशी जाहीर ऑफर त्यांनी दिली व निळ्या चिमणीला घाम फुटला.
ट्विटर कंपनीची वर्षाची कमाई तीन-चार अब्ज डॉलर्स असली तरी ती रोखीने खरेदी करायची असेल तर मस्क यांना ४३ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागतील. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम तब्बल सव्वातीन लाख कोटी रुपये होते. कारण, कंपन्यांच्या, ब्रॅन्डच्या किमतींचा कमाईशी थेट संबंध नसतो. कंपनीची उपयुक्तता, तिचे एकूण शेअर, त्यांचा दर, त्यातील चढ-उतार व त्यांची मिळून एकूण किंमत, ब्रँड व्हॅल्यू असा हा एकंदरित मामला असतो. विशेषत: विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती व दळणवळण क्षेत्रातील कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू नवनवीन संशोधन, भविष्याचा वेध, आदी कारणांमुळे आपल्या कल्पनेच्या पलीकडे असते.
इलॉन मस्क यांची एकूण मालमत्ता २७३ अब्ज डॉलर्स असली तरी रोख स्वरूपात इतकी मोठी रक्कम उभी करणे हा पोरखेळ नाही. मस्क यांच्याकडे तीन अब्ज डॉलर्स तयार आहेत. साधारपणे पावणेतीन अब्ज डॉलर्सचे ट्विटर शेअर त्यांच्या मालकीचे आहेतच. उरलेले ३६ अब्ज डॉलर्स ते कसे उभे करतील, कर्ज किती मिळू शकेल, अशी गणिते मांडण्यात गोल्डमन सच, माॅर्गन स्टॅन्ले किंवा ब्लूमबर्गसारखे आंतरराष्ट्रीय हिशेबनीस व गुंतवणूकदार सध्या व्यस्त आहेत. थोडक्यात जेमतेम पन्नाशी ओलांडलेल्या मस्त मस्त मस्क यांनी सगळ्यांनाच कामाला लावले आहे.