काँग्रेस संपणे देशासाठी धोकादायक! - अनंतराव गाडगीळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 05:07 AM2019-06-25T05:07:38+5:302019-06-25T05:10:31+5:30
इंग्रजीत एक म्हण आहे ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स अॅण्ड डिफिट इज अॅन आॅर्फन.’ लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होताच राहुलजींना टीकेचे लक्ष्य केले जात आहे.
(काँग्रेस प्रवक्ते)
इंग्रजीत एक म्हण आहे ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स अॅण्ड डिफिट इज अॅन आॅर्फन.’ लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होताच राहुलजींना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. पण अवघ्या ७-८ महिन्यांपूर्वी याच राहुलजींच्या नेतृत्वाखाली राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड जिंकले होते, हे आता टीकाकार सोयीस्करपणे विसरत आहेत.
काँग्रेसच्या पराभवाचा दोष हा एका व्यक्तीचा नसून गेल्या २० वर्षांपासून बदलत असलेल्या आर्थिक वातावरणाचा परिणाम आहे. २०११ मध्ये लिहिलेल्या माझ्या एका लेखात मी एक सिद्धांत मांडला होता. तो असा की, डॉ. मनमोहन सिंग यांनी देशात नवे आर्थिक धोरण आणून देश फार पुढे नेला. पण हे होत असताना ‘गरीब काँग्रेसपासून कुठेतरी दूर होत चालला आहे, अशी शंका मी त्या वेळी व्यक्त केली होती. गरीब म्हणजे केवळ आर्थिकदृष्ट्या गरीब नव्हे तर दलित व अल्पसंख्याकही त्यात आले. कारण या दोन्ही समाजांत आर्थिक मागासलेपणा मोठ्या प्रमाणावर आहे. काँग्रेसला जर हे लवकर उलगडले नाही तर भविष्यात काँग्रेसला निवडणुका जिंकणे अवघड जाईल, अशी भीती मी व्यक्त केली होती. दुर्दैवाने कालांतराने माझा अंदाज खरा ठरत आहे.
पूर्वीच्या आणि आताच्या काँग्रेसमध्ये आणखी एक मोठा फरक म्हणजे पक्षात ‘अकाउंटिबीलिटी’च राहिलेली नाही. पूर्वी नेता कितीही मोठा असू दे, त्याच्या राज्यात वा जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव झाल्यास राजीनामा घेतला तरी जायचा किंवा नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला तरी जायचा. २०१४ नंतर लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद व तत्सममध्ये काँग्रेसचा पराभव होऊनसुद्धा राज्याराज्यातून कुणी राजीनामा दिल्याची फारशी उदाहरणेच दिसत नाहीत.
जो मतदारसंघ काकासाहेब गाडगीळ, मोहन धारिया, बॅ. गाडगीळ, विठ्ठल तुपे यांनी लाखो मतांनी जिंकला त्याच पुणे शहरात गेल्या दोन लोकसभा निवडणुका काँग्रेसने ३ लाखांहून अधिक मतांनी गमावल्या. विधानसभेला आठही जागांवर काँग्रेस हरली. महापालिका ताब्यातून गेली. एवढे होऊनही ना कोणी राजीनामा दिला ना कोणी कोणाकडे मागितला. महापालिका निवडणुकीनंतर ४-५ मंडळींनीच उमेदवार नक्की केले. विद्यमान आमदार असून उमेदवार निवड बैठकीला बोलावलेही नाही. इतर अनेक प्रमुख नेत्यांची तीच अवस्था. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २ आकडीसुद्धा नगरसेवक निवडून येणार नाहीत, असे मी काही कार्यकर्त्यांना म्हणालो. महापालिका निवडणुकीचे जेव्हा निकाल लागले तेव्हा १६४ पैकी काँग्रेसचे केवळ ९ नगरसेवक निवडून आले. दुर्दैवाने याही वेळी माझा अंदाज तंतोतंत खरा ठरला. बॅ. गाडगीळ यांच्या काळात ६० ते ७० टक्के नगरसेवक हे काँगे्रसचे असायचे याची याप्रसंगी आठवण येते.
काँगे्रस पक्षाला पूर्वी एक शिबिराची परंपरा होती. यशवंतराव चव्हाणजींच्या काळात नाशिक येथे झालेल्या शिबिरात रोजगार हमी योजना मांडली गेली जी कालांतराने देशाने स्वीकारली. १९५५ च्या आघाडीच्या शिबिरात काँग्रेसने समाजवादी समाजरचना लोकांपुढे आणली. तर १९५६ च्या नागपूर शिबिरात सहकारातून समृद्धी (को-आॅपरेटिव्ह) धोरण मांडले. दिवंगत गोविंदराव आदिकांच्या काळात लोणावळ्याला पक्षाचे आठवडाभराचे अत्यंत यशस्वी शिबिर झाले तर रणजीत देशमुख यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यातून सर्वप्रथम शिबिर पूर्ण करणारे महाराष्टÑ हे पहिले राज्य ठरले. या दोन्हीही जबाबदाऱ्या प्रामुख्याने माझ्यासकट इतर ३-४ पदाधिकाऱ्यांवर होत्या. देशावर, समाजावर प्रभाव टाकणारी शिबिराची महाराष्टÑ काँग्रेसची परंपराच गेल्या काही वर्षांत खंडित झाली आहे.
राजकीय पक्ष कुठलाही असू दे, प्रसारमाध्यमांशी पक्षाचे संबंध सांभाळायचे काम हे प्रामुख्याने प्रवक्त्याचे असते. प्रवक्ता हा वास्तविक मूळचा त्या पक्षाचाच असला पाहिजे. पक्षाचा इतिहास त्याला पाठ पाहिजे. प्रथमपासून त्याची विचारसरणी पक्षाशी जुळणारी पाहिजे. थोडक्यात एक प्रकारे तो त्या पक्षातच जन्मलेला पाहिजे. पण हल्ली काँगे्रसमध्ये पक्षात नवीन प्रवेश करणाºयांना ‘अॅडजस्ट’ करण्याकरिता प्रवक्तेपद देण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. तथापि काही राज्यांत त्याचे भयानक दुष्परिणाम अनुभवायला मिळाले.
विरोधकांनी गेल्या काही वर्षांपासून राहुलजींची प्रतिमा इतकी जाणीवपूर्वक खराब केली की त्यातून त्यांना प्रथम बाहेर येणे आवश्यक होते. राहुलजींनी ज्याप्रकारे प्रचारात कष्ट घेतले. त्यामुळे शेवटी भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा यूपीए विरुद्ध एनडीए ऐवजी मोदीजी विरुद्ध राहुलजी असे स्वरूप आले हे एक प्रकारे राहुलजी व काँग्रेसचे यश म्हणावे लागेल. पण त्याचवेळी शेतकरी आत्महत्या, देशाची अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई, नोटाबंदी या प्रश्नांवरचे लक्ष उडत आहे, हे कदाचित काँग्रेसच्या लक्षात आले नाही. हेच नेमके भाजपच्या फायद्याचे ठरले.
आजपर्यंत काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहेत. ७७ ला संपूर्ण देशात पराभूत झालेली काँग्रेस ८० साली लोकसभेच्या ३२५ जागा जिंकून सत्तेत आली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण कालच्या पराभवातून बोध घेऊन प्रत्येक निवडणुकीनंतर आत्मचिंतन वा आत्मपरीक्षण करण्याची जुनी पद्धत काँग्रेसने पुन्हा सुरू केली पाहिजे. शेवटी काँग्रेस ही एक चळवळ आहे.