(ओट्यावरुन)- भक्ती सोमण
चर्रर्रर्र अशा आवाजाने वातावरणात खमंग सुगंध पसरवणारा पदार्थ म्हणून सिझलरकडे पाहिले जाते. वन पॉट मिल असणारे हे सिझलर्स एकाच तव्यावर विविधांगी, पण पूर्ण जेवणाचा आनंद देतात. येत्या होळीला संपूर्ण दिवस घराबाहेर राहण्याआधी या परिपूर्ण जेवणाचा आस्वाद मात्र नक्की घ्या. हॉटेलमध्ये गेल्यावर मेन्यू कार्ड पाहून अनेक पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात, पण दर वेळी हे शक्य होतेच असे नाही. म्हणून भात वा नूडल्स, वाफवलेल्या भाज्या, बटाट्याचे चिप्स यांचे भरपूर मिश्रण असलेले सिझलर खाण्याकडे अनेकांचा कल असतो. वेटर जेव्हा गरमागरम सिझलिंग प्लेट घेऊन येतो, तेव्हा त्याच्या जळक्या, पण हव्याहव्याशा सुगंधाने खाणाऱ्याची भूक चाळवते. अशी भूक चाळवण्याचं काम करतात, ते स्पायसी सिझलर्स सॉस. कांदा, टॉमेटो केचप, बटर, साखर, व्हिनेगर, लिंबाचा रस, काळीमिरी पावडर, लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (चिली फ्लेगक्स) मीठ यांचे मिश्रण असलेल्या या सॉसमुळे सिझलर खाण्याची मजा वाढते. अस्सल चवीचे सिझलर हे याच सॉसपासून बनतात. अस्सल सिझलर सिझलर्ससाठी बनवलेल्या लोखंडाच्या तव्यावरच केले जातात. हा तवा भरपूर गरम करून, तो लाकडाच्या खोबणीत ठेवला जातो. हा तवा गरम असतानाच त्यावर कोबीची पाने ठेवली जातात. मग त्यावर आपल्याला हवे ते पदार्थ घेता येऊ शकतात. ही थोडीशी करपलेली कोबीची पानेही या निमित्ताने खाल्ली जातात. अन्नाचा एकही कण उरू नये, ही यामागची भावना म्हणूनच महत्त्वाची ठरते, पण कोबीच्या पानाव्यतिरिक्त पालेभाजीही वापरता येऊ शकते. पालकाची पाने यासाठी मजा आणतात, असे शेफ तुषार देशमुख सांगतो. कारण मसालेदार सिझलर खाताना पौष्टिकपणा जपण्यासाठी या पानांचा उपयोग होऊ शकतो, शिवाय त्याचा एक वेगळा फ्लेवर मजा आणतो. सिझलिंग तव्यावरच असे सिझलर अस्सल चव देतात हे खरे, पण ज्यांच्याकडे असे तवे नाहीत, त्यांना जर अशाप्रकारे सिझलर खायचे असतील, तर त्यांनी काय करावे, हा प्रश्न पडतो. त्यालाही पर्याय आहे. नेहमीच्या वापरातला लोखंडी तवा भरपूर गरम करायचा. त्यावर कोबी किंवा आवडीच्या पालेभाजीची पाने टाकून वर बटाट्याचे तळलेले चिप्स, कोणत्याही प्रकारचा भात किंवा मॅगी, मसाल्याची कोणतीही भाजी, बटाटेवडा आणि वरून तूप घालायचे. ही चवही वेगळी लागेल. थोडेसे वेगळे प्रयत्न करून पाहायचे असतील, तर जेवढी जास्त कल्पनाशक्ती लढवू, तेवढे सिझलरचे असंख्य प्रकार तव्यावर अगदी सहज करता येऊ शकतात. महाराष्ट्रीयन वळणाचे सिझलरसिझलर हा खरं तर अमेरिकन प्रकार, पण यात भारतीय मसाल्यांचा वापर करत, वेगळे सिझलर देण्यावर शेफ पराग जोगळेकर यांनी भर दिला आहे. सिझलर प्लेटवर मसाले भात, मसाल्याची भरली वांगी, बटाट्याची भाजी हे प्रकार एकत्र करून, त्यात तूप मिसळून सिझलर्स तयार केले आहेत. याशिवाय साबुदाणा वडा, खिचडी अशा उपवासांच्या पदार्थांचे एकत्रीकरण करूनही त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. तर गोडात पुरणपोळी विथ सिझलिंग आईस्क्रीम हा प्रकार तर खायला खूपच वेगळा लागतो. चायनीजव्यतिरिक्त खास महाराष्ट्रीयन पद्धतीनेही हे पदार्थ सहज करता येऊ शकतात, असे जोगळेकर सांगतात.